Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 21 February 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं
आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
·
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
दीक्षांत समारंभासाठी
उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती
संभाजीनगर दौऱ्यावर
·
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम
औद्योगिक क्षेत्र करण्याचा संकल्प केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडून
व्यक्त
·
शासनाच्या फसवणूक प्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्ष कारावास आणि ५० हजार रुपये दंड - न्यायालयाकडून जामीनही मंजूर
·
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या
परीक्षेला आजपासून सुरुवात
आणि
·
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा
बांगलादेशवर सहा गडी राखून विजय
****
दिल्लीत
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते होणार आहे. तब्बल ७१ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत हे संमेलन होत आहे. संमेलनाच्या
अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्यासह संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद
पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील.
त्यापूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येईल. तालकटोरा क्रीडा संकुलातल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या
या संमेलनात, मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन,
विविध परिसंवाद, आदी कार्यक्रम होणार आहेत.
दरवर्षी
साहित्य संमेलनासाठी दोन कोटी रुपये निधी दिला जातो, मात्र वाढता खर्च आणि संमेलनाचं वेगळेपण यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी यंदाच्या संमेलनासाठी अतिरिक्त दोन कोटी रुपये, असा एकूण चार कोटी रुपये निधी देण्यास, विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे.
दरम्यान, मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा वाढवणं आणि टिकवणं, ही मराठी भाषिकांची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या...
‘‘केवळ
कुठेतरी सरकारी शिक्कामोर्तब झालं म्हणून भाषेसारख्या गोष्टीचा दर्जा एकदम वाढत नाही.
त्यातनं काही आर्थिक फायदे होण्याची शक्यता आहे. शासनाकडून मराठी भाषिकांना, संस्थाना,
विद्यापीठांना किंवा नवीन येणाऱ्या साहित्यीकांना, संशोधकांना काही आर्थिक साहाय्य
होऊ शकेल. त्याने प्रकाशन संस्था निघू शकतील आणि निघाव्यात आणि त्याच्यासाठी मराठी
जाणकार भाषिकांनी जास्त प्रयत्न करायला पाहिजे. नुसता दर्जा मिळाला म्हणून स्वस्थ बसून
चालणार नाही. तो दर्जा वाढवणं आणि टिकवणं हे माणसांच्या,भाषिकांच्या हातात आहे.’’
दरम्यान, संमेलनाध्यक्ष
भवाळकर आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी काल संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती
जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली.
****
१९ वं अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य
संमेलन छत्रपती संभाजीनगर इथल्या आमखास मैदानावर आजपासून सुरू होत आहे. या मैदानात उभारण्यात आलेल्या मलिक अंबर नगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.अशोक राणा
यांची निवड करण्यात आली आहे.
****
उपराष्ट्रपती
जगदीप धनखड उद्या छत्रपती
संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
दरम्यान, पीएम उषा
प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या चार इमारतींचं आभासी पद्धतीने भूमिपूजन,
आणि संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन
शैक्षणिक संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटनही उपराष्ट्रपती करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात वेरुळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिरालाही ते भेट देणार आहेत.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र करण्याचा संकल्प असून, येत्या
काळात मराठवाडा हे सर्वात मोठं औद्योगिक हब असेल, असं
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं
वार्ताहरांशी बोलत होते. या औद्योगिक क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र तसंच स्टार्ट
अप इन्क्युबेशन हब बनवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले...
‘‘ऑरिक की बिल्डींग है, उसमे बीस हजार स्केअर फीट का एक कौशल्य
विकास केंद्र, स्टील डेव्हलपमेंट सेंटर बनाने का कल निर्णय लिया है। साथ ही साथ लगभग दस हजार
स्केअर फीट का स्टार्टअप इनक्यूबेशन हब बनाने का भी निर्णय लिया गया है। वहा पर कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चर,
एक अस्पताल बन रहा है वहा पर, एक युनिवर्सिटी आ रही है। साथ ही साथ स्कुल हो व्हॅक्रीसीएशन
फॅसीलीटी हो इन सब चिजो की और ध्यान केंद्रीत करते हुये हम इस पुरे औद्योगीक क्षेत्र
को महाराष्ट्र की और देश की शान बनाने के लिये संकल्पीत है।’’
****
राज्याचे
कृषिमंत्री सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना काल नाशिकच्या न्यायालयानं दोन वर्षाचा
कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. १९९५ ते १९९७
या कालावधीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ शिवाजी कोकाटे यांनी, आपल्याला स्वतःचं घर नसल्याचे खोटे कागदपत्र देऊन, नाशिकमध्ये
उच्चभ्रू वसाहतीत मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवलं, तसंच आपल्या
नावावर २ सदनिका घेतल्याचा आरोप, माजी मंत्री तुकाराम दिघेाळे
यांनी केला होता. यासंदर्भातला खटला २८ वर्ष चालल्यानंतर काल न्यायालयानं ही शिक्षा सुनावली. कोकाटे बंधूंनी जामीनासाठी अर्ज दाखल केला, न्यायालयानं तो मान्य करत, जामीन मंजूर केला.
दरम्यान, राजकीय वैमानस्यातून
हा प्रकार झाला असून, यासंदर्भात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार
असल्याचं कोकाटे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तसंच काँग्रेसनं कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
****
महाराष्ट्र
राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना सामान्य भविष्य निर्वाह निधी जीपीएफ
खात्यातील शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली
आहे. प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध असून, अंतिम पेन्शन
प्रकरणांचा तपशीलही ऑनलाइन पाहता येणार आहे.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या
लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा राज्यातल्या पाच हजार १३० मुख्य
केंद्रावर परीक्षा होत असून,१६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी
नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं
वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात श्री क्षेत्र गोरठे इथल्या वरद प्रतिष्ठानच्या वतीने प्राध्यापक ललिता गादगे
यांना काशीबाई फुलारी स्मृति नारायणी पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे. येत्या २७ फेब्रुवारीला गोरठा इथं आयोजित पाचव्या मराठी साहित्य
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
****
नवव्या
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं बांगलादेशवर सहा गडी राखून
विजय मिळवला. दुबईत झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करत २२८ धावा केल्या. मोहम्मद
शमीने पाच, हर्षित राणाने तीन तर अक्षर पटेलनं दोन बळी
घेतले. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या भारताच्या संघाने शुभमन गीलच्या शतकी खेळीच्या
बळावर ४७व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. शुभमन प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा
मानकरी ठरला.
दरम्यान, शमी हा
सर्वात जलद दोनशे बळींचा टप्पा गाठणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने काल एकशे
चाराव्या एकदिवसीय सामन्यात दोनशे बळी घेत, अजित आगरकरचा १३३
सामन्यात हा टप्पा गाठण्याचा विक्रम मोडला. तर कर्णधार रोहीत शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधल्या ११ हजार धावा काल पूर्ण केल्या.
****
नांदेड
इथं राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन आज होणार आहे. महसूल विभागातले जवळपास अडीच ते तीन हजार
अधिकारी आणि कर्मचारी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दरम्यान,
याअंतर्गत क्रिकेटच्या स्पर्धांना काल सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात पुणे विभागाने छत्रपती संभाजीनगर विभागाचा सात धावांनी
पराभव केला.
****
संत गजानन
महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन काल सर्वत्र साजरा झाला. शेगाव इथं सुमारे अडीच लाखावर भाविकांनी महाराजांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. छत्रपती संभाजीनगर इथंही गजानन महाराज मंदिरासह विविध ठिकाणी गजानन विजय ग्रंथांचं पारायण करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं.
****
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल नळदुर्ग इथं ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचं तसंच इतर आरोग्य संस्थांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं.
****
हिंगोली
जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या जुनूना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेने निलगाईला उडवल्यानं
अकोला -पूर्णा मार्गावरची रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
****
No comments:
Post a Comment