Tuesday, 25 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 25 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

अयोध्येत श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याचं प्रतीक म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या कळसावर ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, राम मंदिराचं हे दिव्य प्रांगण भारताच्या सामूहिक सामर्थ्याचंही चेतनास्थान बनत असल्याचं नमूद केलं. हा ध्वज भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज असल्याचं ते म्हणाले.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तत्पूर्वी पंतप्रधानांनी, राम मंदिरासह, सप्तर्षी मंदिर, शेषावतार मंदिर आणि अन्नपूर्णा मंदिरातही दर्शन घेतलं.

**

पंतप्रधान मोदी आज हरियाणात कुरुक्षेत्राला भेट देणार असून धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या अनेक प्रमुख कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र शंखाला समर्पित नवनिर्मित 'पांचजन्य' स्मारकाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून, महाभारत अनुभव केंद्रालाही ते भेट देतील. यासोबतच, शीख पंथाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या ३५०व्या हौतात्म्य दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील. या प्रसंगी ते स्मारक नाणे आणि स्मारक टपाल तिकीट जारी करणार असून, जनसभेलाही संबोधित करतील.

****

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. पुरोगामी विचारांचे प्रवर्तक, सुसंस्कृत राजकारणाचे धनी आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आजही तितकीच प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांची आणि विकासदृष्टीची प्रशंसा केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना कुशल प्रशासक आणि देशाची उंच पातळीवर ओळख निर्माण करणारे नेते म्हणून अभिवादन केलं.

****

उत्तराखंड मधल्या बद्रीनाथ मंदीराचे दरवाजे आज दुपारी दोन वाजून ५६ मिनिटांनी दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहेत. यंदा सुरू झालेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर मंदीराचे दरवाजे बंद करण्यात येत असून, यासोबतच चार धाम यात्रेची औपचारीक सांगता होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

संविधान दिवस उद्या साजरा होत आहे. यानिमित्त नवी दिल्लीत मुख्य कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि सर्व खासदारांच्या उपस्थितीत दिवंगत नेत्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. "आपले संविधान - आपला स्वाभिमान" ही या दिवसाची संकल्पना आहे.

****

शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५०व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेड इथं आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने दाते रक्तदान करून अभिवादन करत आहेत. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सरदार दिलीपसिंघ सोडी आणि अवतारसिंघ सोडी यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात आतापर्यंत एक लाख ९२ हजार ३०४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक एक लाख ६१ हजार हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली असून, उर्वरित क्षेत्रावर ज्वारी, गहू, मका, करडई, जवस, आणि सुर्यफल पिकांची पेरणी झाली आहे. यावर्षी तीन लाख ८१८ हजार ६८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता असल्याचं कृषि विभागानं म्हटलं आहे.

****

महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दुसर्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली आहे. ढाका इथं झालेल्या सामन्यात त्यांनी तैवानच्या संघावर ३५-२८ अशी मात केली. या स्पर्धेतल्या सर्व सामन्यात भारतीय संघ अजिंक्य राहिला.

****

मलेशिया इथं सुरू असलेल्या सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात बेल्जियमने भारताचा २-३ असा पराभव केला. भारताकडून अभिषेक आणि शिलानंद लाक्रा यांनी गोल केले. उद्या भारताचा सामना मलेशियासोबत होणार आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारत ४७१ धावांनी पिछाडीवर आहे. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी, दक्षिण आफ्रिकेने दुसर्या डावात २६ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा त्यांच्या चार बाद १८७ धावा झाल्या होत्या. भारताचा पहिला डाव २०१ धावांवर संपुष्टात आला होता.

****

No comments: