Friday, 28 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अद्याप निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी करू नये, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

·      नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग

·      ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप

आणि

·      छत्रपती संभाजीनगर शहरात रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

****

राज्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, तिथं ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य निवडणूक आयोगाला दिले. तसंच, ज्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी झालेली आहे, त्या निवडणुकांचा निकाल या याचिकांवरच्या निकालावर अवलंबून राहील, असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं स्पष्ट केलं. राज्यात एकंदर २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, यापैकी ४० नगरपरिषदा आणि १७ नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची कमाल मर्यादा ओलांडली जात असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंह यांनी न्यायालयाला दिली. तर, २९ महानगरपालिका आणि ३४६ पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या पीठाकडे सोपवून पुढची सुनावणी २१ जानेवारी रोजी घ्यायची सूचना न्यायालयानं केली आणि ज्यांची अधिसूचना जारी झालेली आहे, त्या निवडणुका वेळापत्रकाप्रमाणे घ्यायला परवानगी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणुकांवर टांगती तलवार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते म्हणाले -

बाईट – विजय वडेट्टीवार

****

दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, विविध पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरले आहेत. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जालना, वाशीम, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विविध प्रचारसभांना संबोधित केलं.

जालना जिल्ह्यात परतूर इथं झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी, परतूर शहराला मराठवाड्यातलं आदर्श शहरबनवण्याचा निर्धार व्यक्त केला. परतूरच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असंही त्यांनी आश्वस्त केलं. खासदार डॉ.भागवत कराड, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे, अहिल्यानगर आणि रायगड जिल्ह्यात प्रचार करत आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये प्रचारसभा झाली.

****

दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारासाठीचा वेळ वाढवण्यात आली असून, एक डिसेंबर रोजी रात्री १० वाजता प्रचार बंद होईल, असं पत्रक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केलं आहे. राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित मतदारसंघांच्या बाहेर राहणाऱ्या मतदारांनाही ही सुट्टी लागू असेल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकात उडुपी इथल्या श्रीकृष्ण मठाला त्यांनी भेट दिली आणि पूजा अर्चना केली. गर्भगृहासमोरच्या सुवर्ण तीर्थ मंडपाचं उद्घाटन करुन नंतर त्यांनी संत कनकदास यांच्या पवित्र खिडकीला सुवर्ण कवच अर्पण केलं. या खिडकीतून कनकदासांना भगवान कृष्णांचं दर्शन झालं होतं असं मानलं जातं. त्यानंतर आयोजित लक्ष कंठ गीता पठण कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी संकल्प करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान मोदी आज गोव्याच्याही दौऱ्यावर गेले होते. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या पाचशे पन्नासाव्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी भेट दिली. यावेळी भगवान श्रीरामांच्या ७७ फूट उंच भव्य कांस्यप्रतिमेचं अनावरण केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२८ वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाइट तसंच न्यूज़ऑनएयर मोबाइल ॲपवर प्रसारित केला जाईल.

****

५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फीचा आज गोव्यात पणजी इथं समारोप होत आहे. समारोपाच्या कार्यक्रमात दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. २० नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या महोत्सवात ८१ देशांतले २४० हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले.

****

राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने राज्यातल्या ८५ जैवविविधता व्यवस्थापन समितींसाठी पाच कोटी ३४ लाख रुपयांचा निधी जारी केला आहे. विविध सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि त्यापासून मिळवल्या जाणाऱ्या प्रोबायोटिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी काम करणाऱ्या विविध संस्था आणि समितींसाठी हा निधी दिला जातो. यापूर्वीही राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने महाराष्ट्रातल्या १०८ जैववविविधता व्यवस्थापन समिती आणि सात संस्थांना दोन कोटी ५६ लाख रुपयांहून अधिक निधी जारी केला होता.

****

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. फुले दांपत्याच्या अथक प्रयत्नांमुळे आजच्या महिलांनी शिक्षण, प्रशासन, संरक्षण, विज्ञान, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात देशाचा गौरव वाढवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं. अजित पवार यांनी पुण्यात फुलेवाडा इथं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणं हीच फुले दांपत्याला खरी आदरांजली असल्याचं ते म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं. मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले असता, भाजपचे विधानपरिषदेचे आमदार संजय केनेकर आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी हे निवेदन दिलं. रेल्वेचा विकास व्हावा, मात्र सामान्य नागरिकांची घरे जाऊ नये, यासाठी केंद्राकडे बोलणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

****

सुप्रसिद्ध कवी, ‘मिर्झा एक्सप्रेसनावाने ओळखले जाणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग याचं आज, अमरावती इथं निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. अनेक कवी संमेलनात त्यांनी आपल्या शैलीनं रसिकांमध्ये स्थान निर्माण केलं होते. मिर्झाजी कहीनहा त्यांचा वर्तमानपत्रातील स्तंभ लोकप्रिय झाला होता. मिर्झा यांचे २० काव्यसंग्रह प्रसिद्ध असून, मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मिर्झा बेग यांच्या निधनानं एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेलं व्यक्तिमत्व गमावल्याचं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.

****

लखनौ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या तन्वी शर्मा हिने उपान्त्य फेरीत प्रवेश केला. १६ वर्षीय तन्वीने आज झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या खेळाडुचा २१ – १३, २१ – १९ असा पराभव केला. यासोबतच महिला एकेरीत उन्नती हुडा हिने, मिश्र दुहेरीत त्रिशा जॉली आणि हरिहरन यांनीही उपान्त्य फेरीत प्रवेश केला.

****

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज रेणापूर नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरच्या सुविधांची तसंच स्ट्रॉंगरूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

****

बीड जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वर्ष २०२६–२७ साठीचे परिपूर्ण नियोजन आराखडे सर्व यंत्रणांनी १५ डिसेंबर पूर्वी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. यंत्रणांनी यापूर्वीच्या कामाच्या दायित्वाबाबत तातडीने लक्ष घालून ती कामं पूर्ण करावी, असंही त्यांनी सूचित केलं.

****

कोल्हापूर इथल्या राष्ट्रीय छात्र सेना – एनसीसीच्या मुलींची स्वतंत्र तुकडी आज छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल मोहिमेसाठी रवाना झाली. खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते हिंरवा झेंडा दाखवून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. देशाच्या सर्वांगीण विकासात स्त्री शक्तीचं महत्त्वाचं योगदान असून, या शक्तीला दुर्लक्षित करून चालणार नाही, असं शाहू महाराज यावेळी म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नव साक्षरता अभियानाअंतर्गत निरक्षरांच्या पायाभूत चाचणीचा निकाल शंभर टक्के असावा, यासाठी जिल्ह्याला दिलेलं उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी दिले.

****

No comments: