Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 28 November 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२८ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक
आणि गोवा दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान कर्नाटकातील उडुपी इथल्या श्रीकृष्ण
मठाला भेट देणार आहेत. इथं होणाऱ्या आध्यात्मिक कार्यक्रमाला विद्यार्थी, साधू, विचारवंत आणि समाजातील विविध स्तरातील नागरिक असे सुमारे
१ लाख जण उपस्थित राहणार असून ते एका स्वरात श्रीमद भगवद गीतेचे पठण करणार आहेत. त्यानंतर
पंतप्रधान गोव्यातील पर्तगळी इथं प्रभू श्री राम यांच्या ऐतिहासिक ७७ फूट कांस्य पुतळ्याचं
अनावरण करणार आहेत. याच ठिकाणी पंतप्रधानांच्या
हस्ते १० हजार चौरस फूट संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लखनऊला
भेट देणार आहेत. दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मुर्मू सहभागी होतील. २०२५-२६ या
वर्षासाठी ब्रह्माकुमारींच्या समारंभाला मुर्मू उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती
भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित
राहून संबोधित करणार आहेत. विविध राज्यांमधून सुमारे तेहतीस हजार स्काउट्स, गाईड्स, रोव्हर्स आणि रेंजर्स आणि मालदीव, नेपाळ, श्रीलंका आणि सौदी अरेबियासह आशिया-पॅसिफिक
प्रदेशातील पंधराशेहून अधिक युवा प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
****
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक प्रचारां
जोर पकडला आहे. ज्येष्ठ भाजप नेते, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्य आज जालना, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ इथं प्रचारसभा होणार
आहेत.
****
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव
फुले यांची आज पुण्यतिथी. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त गृहमंत्री अमित शहा
यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. महात्मा फुले हे थोर समाजसुधारक होते, त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज
परिवर्तानाचे कार्य केल्याचं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित
पवार यांनीही महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली आहे.
****
बेकायदा पद्धतीनं तसंच खोट्या कागदपत्रांच्या
आधारे मिळवलेले अथवा संशयास्पद
वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि
नोंदी तत्काळ रद्द करून, यासंबंधांत तातडीनं पोलिसांकडे
तक्रार दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले
आहेत. याबाबत शासकीय परिपत्रक महसूल विभागानं काल प्रकाशित केलं. सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना
सोळा मुद्यांच्या आधारे जन्म-मृत्यू दाखल्याची तपासणी करावी असे निर्देश त्यात देण्यात
आले आहेत. नव्या निर्देशांनुसार, आधार कार्ड हा जन्माचा
किंवा जन्म ठिकाणाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही; तसंच अर्जातील माहिती आणि आधार कार्डवरील
जन्मतारीख यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
येणार आहे.
****
दित्वी चक्रीवादळ उत्तर-पश्चिम बंगालच्या
उपसागरातून तमिळनाडू, पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या
किनारपट्टी भागांकडे सरकत आहे. यामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात १ डिसेंबरपर्यंत
मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिणेतील राज्यांमध्येही
या काळात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम
भागांमध्ये, मनार आणि कन्याकुमारी भागात सोमवारपर्यंत
मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दक्षिणेकडील किनारपट्टी
भागांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तमिळनाडूच्या उत्तरेकडील भागांत पुढील
तीन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
****
महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा काल
झालेल्या 2026 वुमेन्स प्रिमिअर लिग मेगा लिलावात
महागडी खेळाडू ठरली. दीप्तीला मोठी बोली मिळताच युपी वॉरियर्जने राईट टू मॅच कार्ड
वापरून तिला तीन कोटी 20 लाख रुपयांत संघात कायम
ठेवलं. दीप्ती शर्मा डब्लुपीएलच्या इतिहासातील
सर्वाधिक मानधन मिळवणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली असून, स्मृती मानधनाच्या फक्त 20 लाख रुपयांनी मागे आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक संघात दमदार कामगिरी करणाऱ्या श्रीचरनी आणि
लॉरा वोल्वार्ड्ट यांनाही या लिलावात मोठी बोली मिळवली आहे.
****
सर्व समाजासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडणाऱ्या
ज्ञानोबा माऊली यांचे कार्य साता समुद्रापार स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात नेण्यात येईल, असं सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष
शेलार यांनी सांगितलं. श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त वाशी इथं
विष्णुदास भावे नाट्यगृहात काल झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री ज्ञानेश्वर
महाराज यांच्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सांस्कृतिक
कार्य विभागामार्फत करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment