Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 27 November 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
दोन बहुमार्गिका रेल्वे प्रकल्प आणि पुणे मेट्रो मार्गाच्या
विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
·
गेल्या दशकभरातली देशाची आर्थिक प्रगती ही संविधानकर्त्यांच्या
दूरदृष्टीची फलश्रुती-राष्ट्रपतींचं प्रतिपादन, विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा
·
पुढील एक वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
आणि
·
त्रिभाषा धोरणासंदर्भातील समितीची छत्रपती संभाजीनगर इथं
बैठक, समितीनं जाणून घेतली जनसामान्यांची मतं
****
केंद्रीय
मंत्रिमंडळाने महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या दोन हजार ७८१ कोटी रुपये खर्चाच्या दोन
बहुमार्गिका रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये देवभूमी द्वारका – कनालुस
दुहेरी मार्ग आणि बदलापूर – कर्जत तिसरी आणि चौथी लाईन याचा समावेश आहे. या योजना भारतीय
रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे २२४ किलोमीटरची वाढ करतील आणि सुमारे ५८५ गावांची जोडणी
अधिक बळकट करतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
पुण्यातल्या
खडकवासला ते खराडी आणि नळ स्टॉप ते माणिक बागेदरम्यानच्या नव्या मेट्रो मार्गांनाही
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या नव्या मार्गिंकांसाठी एकूण नऊ हजार ८५८ कोटी
रुपयांचा खर्च अपेक्षित आहेत. येत्या ५ वर्षात हे मार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून, त्यानंतर
पुण्यातल्या मेट्रो मार्गांची लांबी १०० किलोमीटर पेक्षा जास्त होईल.
सिंटर्ड
रेयर अर्थ परमनेंट मॅग्नेट – आर ई पी एम च्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या
योजनेलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेचा एकूण खर्च सात हजार २८० कोटी रुपये
आहे, ज्यामध्ये पाच वर्षांसाठी REPM विक्रीवर
सहा हजार ४५० कोटी रुपयांचं विक्री-संबंधित प्रोत्साहन समाविष्ट असल्याचं वैष्णव यांनी
सांगितलं. रेयर अर्थ परमनेंट मॅग्नेट हे चुंबकांच्या सर्वात मजबूत प्रकारांपैकी एक
असून, इलेक्ट्रिक वाहनं, अक्षय ऊर्जा,
इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि संरक्षण अनुप्रयोगांसाठी
ते अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
गेल्या
दशकभरातली भारताची आर्थिक प्रगती ही संविधानकर्त्यांच्या दूरदृष्टीची फलश्रुती असल्याचं
प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. संविधान दिनानिमित्त काल नवी दिल्लीत
मुख्य कार्यक्रम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत
होत्या. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय संसद,
आपल्या संविधानकर्त्यांनी मांडलेल्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुत्वाच्या आदर्शांवर पुढे जात आहे,
असं राष्ट्रपतींनी नमूद केलं.
**
संविधान
दिवसानिमित्त आज राज्यात सर्वत्र सरकारी आणि निमसरकारी कार्यालयं, आस्थापना
तसंच विविध संस्था संघटनांमधे संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करण्यात आलं. याबाबत
अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून,
Voice Cast
‘‘(मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यात डहाणू इथं आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचं
वाचन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं वंदे
मातरम् सभागृहात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान
दिनानिमित्त सामूहिक उद्देशिका वाचन करण्यात आलं. प्रत्येक व्यक्तीच्या हक्क आणि कर्तव्याचं
रक्षण होण्यासाठी प्रत्येक घरात आणि गावात संविधान पोहोचणं आवश्यक असून, हक्काबरोबर
कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी प्रत्येकानं संविधानाचे दूत व्हावं, असं आवाहन गोऱ्हे यांनी केलं. पालकमंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचं सामूहिक
वाचन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या
वतीनं आयुक्त जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेच्या प्रतीची रथयात्रा
काढण्यात आली.
नांदेड इथं समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने
संविधान रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते हिरवा झेंडा
दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली.
लातूर इथंही आयोजित संविधान
रॅलीला विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संविधान स्तंभ इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचं
वाचन करुन रॅलीचा समारोप करण्यात आला.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
सभागृहात संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. यानिमित्त जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये
प्रभात फेरीसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
धाराशिव इथं संविधान आणि मतदान
जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी संविधान उद्देशिकेचं वाचन करुन मतदार शपथ घेण्यात
आली.
छत्रपती संभाजीनगर, तसंच नांदेड
आकाशवाणी केंद्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान
प्रास्ताविकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं.
परभणी इथं झालेल्या कार्यक्रमात, संविधान सर्वांनी
आत्मसात केले पाहिजे, असं आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
यांनी केलं.)’’
****
राज्यात
यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुढील एक वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, बाधित सर्व गावातल्या शेतकऱ्यांच्या
अल्पमुदत कर्जाचं मध्यम मुदत कर्जात रुपांतरण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सहकार विभागाने यासंदर्भातलं परिपत्रक काल जारी केलं.
****
मुंबईवर
२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस
दलातले अधिकारी, कर्मचारी तसंच सुरक्षा दलातल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील स्मृती स्मारकाला पुष्पचक्र
अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं. यावेळी फडणवीस यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची
भेट घेत संवेदना व्यक्त केल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान
नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुंबई हल्ल्यातल्या हुतात्मा जवानांना
आदरांजली वाहिली.
****
शाळा आणि
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी एसटी महामंडळानं, एक आठ शून्य
शून्य दोन दोन एक दोन पाच एक, हा मदत क्रमांक जारी केला आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क साधण्यासाठी ३१ विभागातल्या सर्व विभाग नियंत्रकांचे
दुरध्वनी क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येणार
असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.
****
नगरपालिका
आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर आणि
नांदेड जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी उदगीर इथं तर दुपारी लोहा इथं त्यांची
जाहीर सभा होणार आहे.
**
धाराशिवमध्ये
काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी
प्रचार सभा घेतली.
****
राज्यातल्या
शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनानं गठीत केलेल्या डॉ. नरेंद्र
जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीची काल छत्रपती संभाजीनगर इथं बैठक झाली. समाजातल्या
विविध स्तरातल्या घटकांनी समितीच्या संकेतस्थळावर आपली मतं नोंदवण्याचं आवाहन अध्यक्ष
नरेंद्र जाधव यांनी यावेळी केलं.
****
धाराशिव
जिल्ह्यातल्या शेतकर्यांना २०२० सालचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात
दाखल झालेल्या याचिकेवर मुंबईत उच्च न्यायालयाने विमा कंपनीच्या विरोधात निकाल देत
न्यायालयात जमा असलेले ७५ कोटी रूपये व्याजासह तातडीने शेतकर्यांना वितरीत करण्याचे
आदेश दिले आहेत. तसंच विमा कंपनीची राज्य सरकारने रोखलेली देय रक्कमही शेतकर्यांना
देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकर्यांना पीक विम्याचे आणखी २२०
कोटी रूपये मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
****
परभणी जिल्ह्यात
सेलू आणि मानवत तालुक्यातल्या ५४ गावांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर जलसंपदा
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर या गावांचा
पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातल्या गावांना पूर्णा
प्रकल्पातून पाणी देण्यासाठीही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या दोन्ही मागण्यांची पूर्तता
व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर
यांनी दिली.
****
बीड जिल्ह्यात
अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव आजपासून सुरु होत
आहे. चार डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात मंदिर परिसरात आराधी बसणाऱ्या महिलांची
सोय तसंच भविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
****
संविधान
दिनाचं औचित्य साधत लातूर जिल्हा वकील मंडळ आणि शहरातल्या विविध ११ संस्थांनी एकत्र
येत काल रक्तदान महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात तब्बल ६०२ रक्त पिशव्यांचं
संकलन झालं.
****
केंद्र
शासनानं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन
खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही दलाल किंवा मध्यस्थांच्या अमिषाला
बळी पडू नये, असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
यांनी केलं आहे. पणन महासंघाकडून सात खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू
करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन
गुप्ता यांनी केलं.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या निम्न मानार प्रक्लपातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येत आहे. १४
डिसेंबर पर्यंत हे पाणी सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन पाण्याचा अपव्यय
टाळवा, असं आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष चौगले यांनी
केलं आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यातल्या शाळांमधे बालविवाहाविरोधी जनजागृती अभियान राबवलं जात आहे. यासाठी चाइल्ड
हेल्पलाईनचे सदस्य विविध शाळांमधे जाऊन विद्यार्थ्यांना बालहक्क, तसंच बालविवाहामुळे
होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल समजावून सांगत आहेत. यावेळी चाइल्ड हेल्पलाईन १०९८ वर मदत
मागण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.
****
No comments:
Post a Comment