Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 29 November 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२९ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
बीड जिल्हातल्या अंबाजोगाई इथं यशवंतराव
चव्हाण स्मृती समितीच्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. कमलताई
गवई यावेळी उपस्थित होत्या. समितीचे विविध पुरस्कार त्यांच्या हस्ते यावेळी प्रदान
करण्यात आले. कृषीसाठीचा पुरस्कार विजया घुले यांना, केशव वसेकर–प्रभावी यांना साहित्य, पं. मुकेश जाधव यांना संगीत, तर प्रियंका इंगळे यांना
युवा क्रीडा गौरव पुरस्कार देण्यात आला. स्मृतिचिन्ह, आणि पाच हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा वारसा जपण्याचं
काम यशवंतराव चव्हाण स्मृती समिती करत आहे, ही अतिशय आनंदाची बाब असल्याची भावना कमलताई गवई यांनी
यावेळी व्यक्त केली.
****
धाराशिवचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे
नेते प्रताप सरनाईक यांनी काल धाराशिव इथं
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ
जाहीर सभा घेतली. नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा
जाहीर केला.
****
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
यांनी काल रेणापूर नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदान
केंद्रांवरच्या सुविधांची तसच स्ट्रॉंगरूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली. निवडणूक
प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी
आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
****
वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद, निवडणुकी करिता काल वाशिम इथं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती
होती. नगरपालिका ही भाजपासाठी सत्ता नव्हे, तर सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं साधन असल्याचं
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
वाशिम सहित जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांना
पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, भुयारी गटार, रस्ते, घनकचरा व्यवस्थापनासाठी निधीची कमतरता
भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी
दिली.
****
लातूर जिल्ह्यातील उदगीर इथल्या नगर
परिषद निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस
नेते आमदार अमित देशमुख यांची काल सभा झाली. उदगीर नगर परिषद कार्यालयापुढे झालेल्या
या सभेला काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या
उमेदवार डॉ. अंजुम खादरी, बसवराज पाटील नागराळकर यांच्यासह
अनेकांची उपस्थिती होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी
सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा १२८वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाइट तसंच न्यूज़ऑनएयर मोबाइल
ॲपवर प्रसारित केला जाईल.
****
बीड जिल्हा नियोजन समिती अंतर्गत
वर्ष २०२६–२७ साठीचे परिपूर्ण नियोजन आराखडे सर्व यंत्रणांनी १५ डिसेंबर पूर्वी सादर
करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत
ते काल बोलत होते. यंत्रणांनी यापूर्वीच्या कामाच्या दायित्वाबाबत तातडीने लक्ष घालून
ती कामं पूर्ण करावी, असंही त्यांनी सूचित
केलं.
****
राष्ट्रीय अन्नधान्य आणि पोषण सुरक्षे
अंतर्गत राज्यात यंदाच्या रब्बी हंगामापासून कडधान्य आत्मनिर्भर अभियान राबवलं जाणार
आहे. या अभियानाद्वारे सुधारित कडधान्य
वाणांची लागवड, उत्पादन वाढ आणि उत्पादकता
वाढीला प्राधान्य देण्यात येणार असल्याची
माहिती पुणे कृषी आयुक्तालयातील विस्तार उपसंचालक रवींद्र पाटील यांनी दिली. खरीप आणि रब्बी हंगामात मिळून सुमारे १४३ कोटी रुपये
अनुदान या अभियानासाठी दिलं जाईल. देशाला डिसेंबर २०२७ पर्यंत कडधान्यांमध्ये पूर्णपणे
आत्मनिर्भर करणं हे या अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी
इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करणं आवश्यक आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या राज्यस्तरीय
शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मराठवाडा विभागाला रौप्य पदक मिळालं. बेलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे
सार्थक नलावडे, अवधुत कदम, अनिशौर्य देशमुख, अनुज निर्वळ आणि ओंमकार निकम या खेळाडूंनी ही कामगिरी केली.
****
लखनौ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या तन्वी शर्मा हिने उपान्त्य
फेरीत प्रवेश केला. १६ वर्षीय तन्वीने काल झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या
खेळाडूचा २१ – १३, २१ – १९ असा पराभव केला.
यासोबतच महिला एकेरीत उन्नती हुडा हिने तर मिश्र दुहेरीत त्रिशा जॉली आणि हरिहरन यांनीही
उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.
****
No comments:
Post a Comment