Wednesday, 26 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.11.2025 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 26 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ नोव्हेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

देशभर आज संविधान दिन साजरा करण्यात येत आहे. हमारा संविधान हमारा स्वाभिमान ही आजच्या दिवसाची संकल्पना आहे. संविधान दिनाचा मुख्य कार्यक्रम दिल्ली इथं संविधान सदन मध्ये होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दोन्ही सभागृहांचे सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले जाईल. याव्यतिरिक्त, मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, वोडो, काश्मिरी, तेलगू, उडिया आणि आसामी या नऊ भाषांमध्ये संविधानाच्या अनुवादित आवृत्त्या प्रकाशित केल्या जातील. यावेळी स्मारक पुस्तिकेचं प्रकाशनही केलं जाणार आहे.

संविधान दिवसानिमित्त आज सर्व अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं जाणार आहे. राज्यातही विविध सरकारी कार्यालयांमध्ये तसंच शाळा, महाविद्यालयात व्याख्यान, संविधान वाचन, संविधान दिंडी इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.

****

संविधान दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी पत्र लिहिलं आहे. त्यात, त्यांनी संविधानाची महानता, जीवनात मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व आणि पहिल्यांदाच मतदार होण्याचा आनंद का साजरा करावा याबद्दलचे त्यांचे विचार मांडले आहेत.

****

समाजमाध्यमांवर नवीन कामगार संहितांविषयी अपप्रचार करण्यात येत आहे.  नवीन कामगार संहिता कामगारांसाठी किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास अपुरी असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा खोटा असून किमान वेतन सर्व क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांचा सामाजिक सुरक्षा योजनेत समावेश असल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य पडताळणी विभागानं स्पष्ट केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात माजलगाव इथं काल शेतकऱ्यांनी ऊसाला चार हजार रूपये प्रति टन भाव मिळावा या मागणीसाठी माजलगाव - नेवासा महामार्गावरील चौकात रस्तारोको आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनाला परवानगी नसतांनाही शेतकऱ्यांनी हे आंदोलन केल्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आश्रम शाळांतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते झालं. धाराशिव तालुक्यात वरूडा इथल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत या स्पर्धा होत आहेत.

****

आज चंपाषष्ठी आहे. त्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या सातारा परिसरातील श्री खंडोबा मंदीरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बीड शहरातील खंडेश्वरी देवी मंदिर परिसरातील श्री खंडोबा दीपमाळ मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त यात्रा भरवण्यात आली आहे. यानिमित्त मंदिरातील दीपमाळेवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या टी-ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक काल जाहीर करण्यात आला. भारतीय संघासोबत अ गटात पाकिस्तान, युएसए, नेदरलँडस, आणि नामिबिया संघाचा समावेश आहे. स्पर्धेत १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान दरम्यान कोलंबो इथं सामना होणार आहे. अंतिम सामना ८ मार्च रोजी अहमदाबाद इथं खेळवला जाणार आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर दक्षिण आफ्रिकेनं वर्चस्व प्रस्थापिथ केलं आहे. ५४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारताच्या पाच बाद ७१ धावा झाल्या होत्या. आज कुलदीप यादव, ध्रुव जुरेल आणि रिषभ पंत हे फलंदाज बाद झाले. दक्षिण आफ्रिकेडून सिमॉन हार्मरनं आतापर्यंत चार बळी घेतले आहेत.

****

हवामान

राज्यात काल सर्वात कमी १४ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद ब्रह्मपुरी इथं झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं सुमारे १७ अंश तर परभणी इथं १७ पूर्णांक नऊ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments: