Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30 November
2025
Time 01.00 to 01.05
PM
Language Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर
२०२५ दुपारी
१.०० वा.
****
‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ची भावना बळकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये
सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासियांना केलं. काशी-तमिळ संगमम उपक्रमाचा त्यांना यानिमित्त
गौरवपूर्ण उल्लेख केला. आपल्या देशामध्येही हिवाळी पर्यटनाच्या दृष्टीनं मोठी क्षमता
असून नागरिकांनी पर्यटन करावं असं ते म्हणाले. स्थानिक उत्पादनांसाठी आग्रही होण्याचा
पुनरुच्चार करत पंतप्रधान मोदी यांनी भारतात निर्मित साहित्य खरेदी करावं आणि देशांतर्गत
व्यापाराला चालना द्यावी असं नमुद केलं. २५ तारखेला अयोध्येतल्या श्री राम मंदिरावरील
धर्मध्वजाच्या आरोहणासह नोव्हेंबर महिन्यात देशभरात झालेल्या महत्वपूर्ण घडामोडींचा
आढावा त्यांनी आज घेतला. पांचजन्य ज्योतिसर, हैदराबाद इथे विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी
या क्षेत्रातली लीप इंजिन सुविधा, मुंबईत भारतीय नौदलात समावेश
करण्यात आलेलं संपूर्ण भारतीय बनावटीचं माहे जहाज यावर त्यांनी प्रकाश टाकला. स्कायरुट
इन्फिनिटी कॅम्पसनं भारताच्या अवकाश परिसंस्थेला गाठून दिलेली नवी उंची, भारतानं ३५७ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन करून स्थापित
केलेला ऐतिहासिक विक्रम आणि त्यायोगे १० वर्षांपूर्वीच्या
आकडेवारीच्या तुलनेत भारतातील १०० दशलक्ष टनांनी वाढलेलं अन्नधान्य उत्पादन, राष्ट्रकुल स्पर्धांचं भारताला देण्यात आलेलं यजमानपद
याचा पंतप्रधांनांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या
एका अनोख्या ड्रोन स्पर्धेचाही त्यांनी उल्लेख केला. या स्पर्धेमुळे तरुणांमधली कल्पनाशक्ती
आणि तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा तसंच कौशल्य बघायला मिळालं असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
यातील पुण्याच्या स्पर्धकांच्या प्रयत्नांची त्यांनी याद्वारे दखल घेतली. जम्मू-काश्मीरच्या
डोंगराळ भागात वन तुळशीपासून तयार करण्यात आलेल्या रामबन सुलाई मधाला मिळालेल्या मान्यतेची
त्यांनी माहिती दिली. देशात मधाच्या उत्पादनात झालेल्या दीड लाख टनाच्या विक्रमी वाढीबद्दल
त्यांनी समाधान व्यक्त केलं. कुरुक्षेत्रात त्रिमीतीय, प्रकाश आणि ध्वनीयोजना तसंच डिजीटल तंत्राने सादर होत असलेल्या महाभारत गाथेचा
आणि या ठिकाणी आयोजित आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवातील त्यांच्या सहभागाचा आणि जगातल्या
अनेक देशातल्या व्यासपीठांवर सादर होत असलेल्या गीता पठणाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख
केला. दक्षिण भारतात नैसर्गिक शेतीसंदर्भात सुरु असलेले उपक्रमांची पंतप्रधानांनी प्रशंसा
केली. भूतान, रशिया, मग़ोलिया, व्हिएतनाम आणि थायलंडला पाठवण्यात आलेल्या भगवान तथागत
बुद्धांचे पवित्र अवशेष आणि त्यामुळं भारताचे या देशांशी निर्माण झालेले चांगले संबंध
याचाही पंतप्रधानांनी `मन की बात` मध्ये उल्लेख केला.
भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्व चषक जिंकून जगाच्या पटलावर
आपलं नाव कोरलं असल्याचं ते म्हणाले. कबड्डी स्पर्धांमधलं महिला खेळाडूंचं यश, आणि क्रीडाक्षेत्रातल्या भारताच्या एकूण कामगिरीबाबतही
पंतप्रधानांनी प्रशंसा केली. इंड्युरन्स स्पोर्ट्स या नवीन क्रीडाप्रकाराचा उल्लेख
करत पंतप्रधानांनी या नव्या क्रीडाप्रकारांचा अनुभव घेण्याचं आवाहन खेळाडूंना केलं.
हिवाळ्यात नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज `मन की बात`च्या माध्यमातून देशवासियांना केलं आहे.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून
सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार आज सर्वपक्षीय बैठक घेत आहे. लोकसभा आणि राज्यसभेतल्या
सर्व पक्षांच्या नेत्यांशी संसदीय कार्य मंत्री किरेन रीजिजू यामध्ये चर्चा करणार आहेत.
हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
आज तंत्रज्ञानात वेगानं बदल
होत आहेत. या बदलत्या जगात आपण पदार्पण करत आहात या बदलत्या जगाला सामोरं जाण्यासाठी
आत्मविश्वास, धैर्य आणि शिस्त हे तीन सद्गुण उपयोगी पडणार असल्याचं
प्रतिपादन नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केलं आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या
१४९व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानात झाला, त्यावेळी नौदल प्रमुख बोलत होते. दीक्षांत संचलन सोहळ्यातून
३२९ छात्र सैन्यात दाखल झाले.
****
धाराशिव नगरपालिका निवडणुकीत
न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या शहरातील तीन प्रभागातील निवडणूक कार्यक्रम निवडणूक
आयोगानं जाहीर केला आहे. या तीन प्रभागातील मतदारांना नगराध्यक्ष पदासाठीचं मतदान पूर्व
नियोजित वेळेनुसार म्हणजे दोन डिसेंबरलाच करता येणार असून मतमोजणी तीन डिसेंबरला होणार
असल्याची माहिती निवडणूक प्रशासनानं दिली आहे.
****
No comments:
Post a Comment