Friday, 28 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर असून उडुपी इथं दाखल झाले आहेत. उडुपी इथल्या श्रीकृष्ण मठाला ते भेट देणार आहेत. इथं होणाऱ्या आध्यात्मिक कार्यक्रमाला सुमारे एक लाख नागरिकांची उपस्थिती आहे. हे सर्व श्रीमद भगवद गीतेचे पठण करणार आहेत, त्यानंतर पंतप्रधान गोव्याला भेट देणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत शासकीय निवासस्थानी दृष्टीहीन महिला टी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाशी संवाद साधला. पंतप्रधानांनी खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक केले. खेळाडूंनी सामाजिक पूर्वग्रह आणि कौटुंबिक अडचणींसह आव्हानांवर मात करण्याचे अनुभव पंतप्रधांनांशी सामायिक केले. हे यश केवळ दिव्यांगांसाठीच नाही तर सर्व देशवासियांसाठी प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा, रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरील त्यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या १२८ व्या भागात नागरिकांना संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम आकाशवाणीची सर्व केंद्र, दूरदर्शन, आकाशवाणीचे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल अॅपवर प्रसारित केला जातील. आकाशवाणीवरच्या हिंदी प्रसारणानंतर, हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रसारित केला जाईल.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे चाणक्य संरक्षण संवादाला संबोधित केलं. संरक्षण मंत्र्यांनी ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाच्या माहितीपुस्तिकेचं अनावरण केलं. त्यांनी एकीकृत एआय प्लॅटफॉर्म, प्रक्षेपण इंडियाचे पहिले मिलिटरी क्लायमेटोलॉजी अॅप्लिकेशन, मिलिटरी नेत्यांसाठी एआय हँडबुक आणि डिजिटलायझेशन थ्री पॉईंट ओ पुस्तकाचं अनावरण केलं.

****

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी आज जाहीर होणार आहे. त्याआधी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स २३७ अंकांनी वाढून ८५ हजार ९५८ अंकांवर पोहोचला, तर निफ्टी ६० अंकांनी वाढून २६ हजार २७५ अंकांवर पोहोचला. सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आज पाहायला मिळाली. 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 28 हजार 460 रुपये इतका झाला आहे.

****

दित्वी चक्रीवादळ उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरातून तमिळनाडू, पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागांकडे सरकत आहे. यामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात १ डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिणेतील राज्यांमध्येही या काळात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागांमध्ये, मनार आणि कन्याकुमारी भागात सोमवारपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दक्षिणेकडील किनारपट्टी भागांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तमिळनाडूच्या उत्तरेकडील भागांत पुढील तीन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

****

राज्यात सध्या सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी एक दिवस वाढवण्यात आला आहे. उमेदवारांना आता सोमवार १ डिसेंबर पर्यंत निवडणुकीचा प्रचार करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं एक आदेश जारी केला असून त्या आदेशानुसार आता ३० तारखेला म्हणजे रविवारी संपणारा प्रचार एक डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत करता येणार आहे. २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

****

सुप्रसिद्ध कवी, 'मिर्झा एक्सप्रेस' नावाने ओळखले जाणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग याचं आज, अमरावती इथं निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. अनेक कवी संमेलनात त्यांनी आपल्या शैलीनं रसिकांमध्ये स्थान निर्माण केलं होते. 'मिर्झाजी कहीन' हा त्यांचा वर्तमानपत्रातील स्तंभ लोकप्रिय झाला होता. मिर्झा यांचे २० काव्यसंग्रह प्रसिद्ध असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मिर्झा बेग यांच्या निधनानं एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेलं व्यक्तिमत्व गमावल्याचं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

****

५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा आज गोव्यातील पणजीत समारोप होणार आहे. आजच्या समारोपाच्या एका कार्यक्रमात दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. २० नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या महोत्सवात ८१ देशांतील २४० हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात जागतिक चित्रपटातील सर्वोत्तम चित्रपट प्रदर्शित झाले. काल आमिर खान आणि रमेश सिप्पी यांच्या मास्टरक्लासला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

****

No comments: