Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 November 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२७ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
भारतीय अंतराळ स्टार्टअप स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
उद्घाटन करण्यात येत आहे. पंतप्रधान स्कायरूटच्या पहिल्या ऑर्बिटल रॉकेट, विक्रम-१ चं अनावरणही याप्रसंगी करणार
आहेत. स्कायरूट ही देशातली प्रमुख खासगी अंतराळ कंपनी आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून
ओडिशा आणि उत्तर प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज भुवनेश्वर इथं ओडिशा
विधानसभेच्या सदस्यांना त्या संबोधित करतील.
उद्या लखनऊ इथं ब्रह्माकुमारींच्या २०२५-२६ च्या कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित राहणार
आहेत. तसंच भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या समारोप सोहळ्याला
उपस्थित राहून संबोधित करणार आहेत.
****
संविधान दिनी पॅरिसमधील युनेस्को
मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण झाल्याबद्दल पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील
भूमिकेला ही योग्य आदरांजली असल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यावरील संदेशात म्हटलं
आहे.
****
या वर्षीच्या भारत आंतरराष्ट्रीय
व्यापार मेळावा - आईआईटीएफ चा आज समारोप होत आहे. १४ नोव्हेंबरपासून नवी दिल्लीत भारत
मंडपम इथं सुरु झालेल्या या जागतिक व्यापार मेळाव्यात देशाची समृध्दता आणि विविधतेचं
प्रदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्रासह बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश प्रदेश सरकारांनी या उपक्रमात
सहभाग घेतला तर झारखंडने विशेष सहभाग नोंदवला. या मेळाव्यात सरकार, उद्योग, आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शकांमध्ये
समन्वय, प्रौद्योगिकी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण
यासाठी जागतिक व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व ही विशेष बाब होती. या मेळाव्यात ग्रामीण
विकास मंत्रालयाच्या वतीनं सरस या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना आपली कला, आणि हस्तकलेचं प्रदर्शन करत या कलेला
जागतिक पटलावर एक ओळख निर्माण करुन दिली.
****
जळगाव जिल्यातील यावल इथं एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात
आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना कालपासून सुरुवात झाली. आदिवासी विद्यार्थ्यांना
क्रीडा आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ
घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी उद्घानावेळी केलं. क्रीडा हा केवळ खेळ
नसून शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढवणारी
जीवनशैली असल्याचं ते म्हणाले.
****
संविधान दिनाचं औचित्य साधत लातूर
जिल्हा वकील मंडळ आणि शहरातील विविध अकरा संस्थांनी एकत्र येत लातूर रक्तदान महोत्सव
2025 चं काल आयोजन केलं. या महोत्सवात
६०२ रक्तपिशव्यांचं मोठं संकलन झालं. अशा पद्धतीच्या सामाजिक उपक्रमांची समाजाला गरज
असल्याचं मत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी
प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करणं, तसंच अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ देण्यात
आली आहे. यानुसार प्रारूप मतदार यादीवर
हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आज २७ नोव्हेंबर ऐवजी ३ डिसेंबर, तर हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय
अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्याची मुदत ५ डिसेंबर ऐवजी १० डिसेंबर अशी करण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या
ठिकाणांची यादी प्रसिध्द करण्याची मुदत ८ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबर आणि मतदान केंद्रनिहाय
मतदार यादी प्रसिध्द करण्याची मुदत १२ डिसेंबर ऐवजी २२ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
****
नांदेड इथले कवी आणि गझलकार बापू
दासरी यांची लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा इथं होणाऱ्या पाचव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. साहित्य संमेलनाचे
उद्घाटन समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष सरोज अंदनकर
यांनी ही माहिती दिली. बालाजी सरोज भावकाव्य साहित्य प्रतिष्ठान नागपूरच्या वतीनं १३
आणि १४ डिसेंबर रोजी हे दोन दिवसीय साहित्य संमेलन हेमलकसा इथं होणार आहे. या साहित्य
संमेलनात विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक साहित्यिक सहभागी होत आहे.
****
नाशिक इथं नियोजित कुंभमेळ्यासाठी
बोधचिन्ह स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे
तीन, दोन आणि एक लाख रुपयांच्या पारितोषिकांसह
प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी २० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचं
आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment