Tuesday, 25 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत राम मंदिराच्या कळसावर ध्वजारोहण करणार आहेत. मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याचं प्रतीक म्हणून हा कार्यक्रम होत आहे. अयोध्येत पंतप्रधानांचा रोड शो पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

त्यानंतर पंतप्रधान मोदी हरियाणात कुरुक्षेत्राला भेट देणार असून धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या अनेक प्रमुख कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र शंखाला समर्पित नवनिर्मित 'पांचजन्य' स्मारकाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून, महाभारत अनुभव केंद्रालाही ते भेट देतील. यासोबतच, शीख पंथाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या ३५०व्या हौतात्म्य दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत. या प्रसंगी ते स्मारक नाणे आणि स्मारक टपाल तिकीट जारी करण्यात येणार असून, जनसभेला संबोधित करणार आहेत.

****

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. पुरोगामी विचारांचे प्रवर्तक, सुसंस्कृत राजकारणाचे धनी आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आजही तितकीच प्रेरणादायी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांची आणि विकासदृष्टीची प्रशंसा केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना कुशल प्रशासक आणि देशाची उंच पातळीवर ओळख निर्माण करणारे नेते म्हणून अभिवादन केलं.

****

राजकीय पक्षांना रोख स्वरुपात दिल्या जाणाऱ्या देणग्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांना नोटीस बजावली आहे. राजकीय पक्षांना दोन हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या दिल्या जाणाऱ्या देणग्या बेनामी असतात, हे आयकर कायद्याचं उल्लंघन असल्याचा दावा करत दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयानं ही नोटीस बजावली.

****

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी समाजानं योगदान द्यावं, असं आवाहन, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं. राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत आयआयटी मुंबईत ७२० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. क्वांटम तंत्रज्ञान शिकवण्यासाठी देशातल्या १०० अभियांत्रिकी महाविद्यालयात सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं विज्ञान तंत्रज्ञान सचिव अभय करंदीकर यांनी सांगितलं.

****

भटक्या कुत्र्यांचं सक्तीचं लसीकरण करण्याचं आणि नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन करण्याचे आदेश राज्य सरकारनं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारनं हा शासन आदेश काल जारी केला. निर्धारित नसलेल्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही सरकारनं दिले.

****

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिकं जाहीर झाली आहेत. यामध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार तसंच सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर आणि सर्वोत्कृष्ट ॲडफिल्म पुरस्काराचा समावेश आहे. हे पुरस्कार जाहीर झाल्याने महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी विभागाचं अभिनंदन केलं आहे. उत्तराखंडमध्ये डेहरादून इथं येत्या १३ ते १५ डिसेंबरला होणाऱ्या ४७ व्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवात या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या नगरपरीषद निवडणुकांसाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या प्रचारसभेत, आगामी पाच वर्षात त्र्यंबकच्या विकासाचं नियोजन आपल्याकडे असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी सटाणा, धुळे जिल्ह्यात पिंपळनेर इथं सभा घेतली. विकासाचा अजेंडा घेऊन आलो असून, बागलाणमधल्या पर्यटनस्थळांचा पर्यटन निधीतून विकास केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

नाशिक शहरात पंचवटीतील तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यात येणाऱ्या साधुंसाठी साधुग्राम साकारण्यात येणार आहे. त्याविरोधात नागरीक, राजकीय पक्ष आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवर काल सुनावणी झाली. साधुग्रामसाठी पर्यायी जागा शोधावी, तसंच सूचनांची दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे. सर्व सूचनांचा विचार करून निर्णय जाहिर करण्यात येईल असं प्रशासनाच्या वतीने जाहिर करण्यात आलं.

****

दिल्लीच्या भारतीय विद्यापीठ संघटनेतर्फे आयोजित ३९वा आंतरविद्यापीठ आंतरराज्यस्तरीय सेंट्रल झोन युवक महोत्सव आजपासून छत्रपती संभाजीनगर इथं सुरू होत आहे. महात्मा गांधी अभिमत विद्यापीठात पुढचे तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे.

****

टोक्यो इथं सुरू असलेल्या, कर्णबधीरांच्या क्रीडा स्पर्धेत भारताच्या प्रांजली धुमाळनं महिलांच्या २५ मीटर पिस्टल नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. पुरुषांच्या ९७ किलो फ्री स्टाईल कुस्तीत सुमीत दाहियानं सुवर्ण पदक, तर ८६ किलो फ्री स्टाईल कुस्तीत अमितनं रौप्य पदक जिंकलं.

****

No comments: