Thursday, 27 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राकडे जगातले गुंतवणूदार आकर्षित होत असल्याची पंतप्रधानांची माहिती; स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन

·      दिव्यांगांवरील अपमानजनक आणि व्यंगात्मक भाष्य टाळण्यासाठी कडक कायदा बनवण्यासंबंधी विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

·      लखपती दिदी’ उपक्रमाला मोठी गती देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ – ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आरोप

आणि

·      धाराशिव जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईनच्या पथकाला यश

****

भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात सरकारने अनेक सुधारणा केल्या असून, जगातले गुंतवणूदार याकडे आकर्षित होत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केल्यानंतर ते बोलत होते. अंतराळ संशोधन क्षेत्र खासगी नवोन्मेषासाठी खुलं करण्यात आल्यामुळे स्टार्टअप आणि उद्योगांना देशाच्या वैज्ञानिक परिसंस्थेत काम करणं सुलभ झालं, येणाऱ्या काळात जागतिक अंतराळ क्षेत्र अर्थव्यवस्था झपाट्याने वाढणार असून, देशातल्या युवावर्गाच्या रोजगार संधी कैकपटीने वाढणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राच्या भवितव्याला ३०० पेक्षा जास्त स्टार्टअप्स आकार देत आहेत, स्कायरूट इन्फिनीटी कॅम्पस हे देशाच्या नवा विचार, नवोन्मेष आणि युवा शक्तीचं प्रतीक आहे, असं ते म्हणाले.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

इस्रोने भारताच्या अंतराळ क्षेत्राला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं असून विश्वासार्हता, क्षमता आणि मूल्यं यांच्या जोरावर भारतानं जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रात नवी ओळख निर्माण केली आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

****

दिव्यांगांवरील अपमानजनक आणि व्यंगात्मक भाष्य टाळण्यासाठी कडक कायदा बनवण्यासंबंधी विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान दिव्यांगांवर व्यंगात्मक वक्तव्य केल्याप्रकरणी एस एम ए क्योर फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. दिव्यांग किंवा अनुवांशिक विकारांमुळे ग्रस्त व्यक्तींचा उपहास करणारी वक्तव्यं अनुसुचित जाती – अनुसुचित जमाती अधिनियमांच्या अधीन आणत गुन्हा म्हणून गृहीत धरण्यासाठी एक कायदा करावा असं न्यायालयानं सुचवलं.

****

आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्यात लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या.

उदगीर इथं झालेल्या सभेत त्यांनी, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘लखपती दिदी’ उपक्रमाला मोठी गती देण्याची घोषणा केली. यावर्षी ५० लाख महिलांना तर पुढील काळात तब्बल एक कोटी दिदींना लखपती बनवण्याचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून, महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी आश्वासनं देत त्यांनी, उदगीर जिल्हा निर्मितीचेही संकेत दिले.

 

त्यानंतर हिंगोली इथंही फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. हिंगोली शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

****

महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ लागली आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. ते आज बारामती इथं वार्ताहरांशी बोलत होते. हल्ली कामावर मतं मागितली जात नाहीत, तर पैसे देऊन, निधी देऊ अशी आश्वासनं दिली जातात. ही चांगली गोष्ट नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हाच दृष्टिकोन असेल, तर त्यावर भाष्य न केलेलं बरं, असं पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठिकठिकाणी गट झाले असून, या निवडणुकीत एकवाक्यता नाही असंही ते म्हणाले.

राज्य सरकारनं कर्जवसुलीला एका वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी ठरेल, पण शेतकऱ्यांचं झालेलं आर्थिक नुकसान पाहता त्यातली काही रक्कम सरकारनं द्यायला हवी होती, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं.

****

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात भूजल व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल रिचार्ज या विषयावर मागील काही दिवसांपासून काम सुरू आहे. या विषयावर जनजागृती करण्यासाठी आज धाराशिव इथल्या कृषी महाविद्यालयात शेतकरी, कृषी विभागाचे विद्यार्थी, कृषी विषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. धाराशिव जिल्ह्यात असलेल्या ४१ पाणलोट क्षेत्रांपैकी तीन पाणलोट क्षेत्र जोखीम आणि अति जोखीम या प्रकारात मोडतात, त्यावर काम करण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

सातारा जिल्ह्यात किल्ले प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. आज सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते आई भवानी मातेची महापूजा करण्यात आली. ध्वजारोहण करुन शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड शहरातल्या एका नवदांपत्याने मतदार जनजागृती उपक्रमात सहभागी होत, लोकशाही प्रक्रियेबद्दलची जाणीवपूर्वक बांधिलकी अधोरेखित केली. “अफवा टाळा, प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि मतदान जरूर करा” असा थेट संदेश त्यांनी नागरिकांना दिला. त्यांच्या या सहभागामुळे तरुण मतदारांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बालविवाहमुक्त भारत अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईनच्या पथकाला यश आलं. धाराशिव इथल्या भीमनगर आणि तुळजापूर तालुक्यातल्या पिंपळे इथं हे बालविवाह रोखण्यात आले असून, मुलींच्या पालकांचं समुपदेशन करण्यात आलं. नागरिकांनी जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

नांदेड इथले कवी आणि गझलकार बापू दासरी यांची हेमलकसा इथं होणाऱ्या पाचव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. १३ आणि १४ डिसेंबरला होणाऱ्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटन समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष सरोज अंदनकर यांनी ही माहिती दिली.

****

धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना स्व–संरक्षणाचे धडे देण्यासाठी आजपासून धुळ्यात विशेष विरांगना प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. यात सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयातल्या १० हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.

****

राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातले या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचं आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केलं आहे.

****

स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला–मुलींसाठी, संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात शिरूर कासार तालुक्यातल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या १३ कोटी एकोणाएंशी लाख रुपयांच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिली.

****

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांसाठी ई-केवायसी करण्याची मुदत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ मंगल पांचाळ यांनी ही माहिती दिली.

****

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातल्या पाच लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत असलेल्या ३०० कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात जवळपास सात हजार थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी चालू देयकासह थकबाकी भरून सहकार्य करावं आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असं आवाहन महावितरणने केलं आहे.

****

No comments: