Tuesday, 25 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अयोध्येतल्या राम मंदिराचा ध्वज म्हणजे संघर्षातून सृजनाचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      निवडणूक कार्यक्रम जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मर्यादा पाळण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना

·      उद्या संविधान दिन; सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन

आणि

·      गुवाहाटी क्रिकेट कसोटी विजयासाठी भारतासमोर ५२२ धावांचं आव्हान

****

अयोध्येतल्या राम मंदिराचा ध्वज म्हणजे संघर्षातून सृजनाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राम जन्मभूमी मंदिरावर आज पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…

जय श्रीरामचा जयघोष, शंखध्वनी आणि मंगलवाद्यांच्या गजरात अयोध्येत श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या कळसावर आज प्रभू राम आणि सीता यांच्या विवाहाची तिथी असलेल्या विवाह पंचमीच्या मुहूर्तावर धर्मध्वजा लावण्यात आली. दहा फूट उंच आणि वीस फूट लांब असलेल्या या त्रिकोणी भगव्या ध्वजेवर तळपता सूर्य, ओम आणि कोविदार अर्थात कांचन वृक्षाची प्रतिमा अंकित आहे. हा ध्वज प्रभू श्रीरामाचं शौर्य आणि अलौकिक तेजाचं प्रतीक असल्याचं, पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं, ते म्हणाले…

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांसह सर्व मान्यवरांनी, रामलला तसंच राम दरबारासह, सप्तर्षी मंदिर, शेषावतार मंदिर आणि अन्नपूर्णा मंदिरातही दर्शन घेतलं.   

****

दरम्यान, पंतप्रधानांनी आज हरियाणात कुरुक्षेत्र इथं विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र शंखाला समर्पित नवनिर्मित 'पांचजन्य' स्मारकाचं उद्घाटन त्यांच्या करण्यात आलं. शीख धर्मियांचे नववे गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या हौतात्म्य दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले. या प्रसंगी ते विशेष स्मारक नाणं आणि टपाल तिकीट जारी करणार आहेत.

****

राज्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत, त्याठिकाणी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडू नका, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला केली. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा सुरू असल्याची माहिती राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला आजच्या सुनावणीत दिली. त्यानंतर पीठानं या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली. राज्यात आगामी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ५७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची कमाल मर्यादा ओलांडली जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंह यांनी दिली.

****

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकींसाठी तयार केलेल्या  प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना देण्यासाठीची मुदत ७ दिवसांऐवजी १५ दिवस करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असल्याची माहिती, काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

****

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशवंतरावांच्या कार्याला उजाळा देत, त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. 

****

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची आठ फेब्रुवारीला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला होणार आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. यादिवशी नियोजित केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं ओक यांनी सांगितलं.

****

संस्कारक्षम तसंच गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवण्यासाठी दशसूत्री उपक्रमांतर्गत आज  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच वेळी एक हजार ९२० शाळांमध्ये पालक सभां घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना चांगले नागरिक म्हणून घडवण्यासाठी त्यांचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षणासोबत त्यांच्यावर संस्कार रुजवण्याची गरज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली.

****

संविधान दिन उद्या साजरा होत आहे. यानिमित्त नवी दिल्ली इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि सर्व राज्यातील खासदार यांच्या उपस्थितीत दिवंगत नेत्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. "आपले संविधान - आपला स्वाभिमान" ही या दिवसाची संकल्पना आहे.

****

संविधान दिनानिमित्त नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रातर्फे एक दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सर्व विभाग प्रमुखांनी संविधान दिवस साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. यानिमित्त शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामुहिक वाचन, जनजागृती फेरी, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा तसंच व्याख्यानांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.

****

परभणी इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत घर घर संविधान अभियानांतर्गत शिवाजी महाविद्यालय इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरीकांनी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी केलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथंही विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांमधून संविधान उद्देशिकेच्या वाचनासह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

नवीन कामगार कायद्यांमुळे ७७ लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत एक पूर्णांक तीन टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात व्यक्त केला आहे. २१ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या कायद्यांमुळं संघटित कामगारांचं प्रमाण किमान १५ टक्क्यांनी वाढून सुमारे साडे ७५ टक्क्यांपर्यंत जाईल. सध्या देशभरात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची संख्या सुमारे ४४ कोटी इतकी असून त्यापैकी जवळपास ३१ कोटी कामगारांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केली असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे.

****

नुकत्याच लागू झालेल्या या कामगार कायद्यांमुळे कामगारांना मोठा लाभ होणार असल्याचं, भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सचिव साहेबराव निकम यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी हे मत व्यक्त केलं. ते म्हणाले….

बाईट – भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सचिव साहेबराव निकम

****

कामगार कल्याण विभागाअंतर्गत संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या जास्तीत जास्त कामगारांना शासकीय योजनांचा लाभ प्रमाणात द्या, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शासकीय योजनेविषयी जागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे, यासाठी प्रसार माध्यमाचा वापर करावा, विविध समाजसेवी संस्था, समाजसेवक यांची मदत घ्यावी, असे निर्देशही अडकुणे यांनी दिले. 

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने ५ बाद २६० धावांवर डाव घोषित केला आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या दोन बाद २७ धावा झाल्या होत्या. यशस्वी जैस्वाल १३ आणि के एल राहुल ६ धावांवर बाद झाले, तर साई सुदर्शन दोन आणि कुलदीप यादव चार धावांवर खेळत आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी ५२२ धावांचं आव्हान आहे.

****

ढाका इथं झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत चायनीज तैपेइचा ३५-२८ असा पराभव करून भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वविजेतेपद पटकावलं. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय देशातील लाखो मुलींना प्रेरणा देणारा ऐतिहासिक क्षण असल्याचं. पवार यांनी म्हटलं आहे.

****

No comments: