Friday, 28 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

·      राज्यातली ७५ गावं स्मार्ट आणि इंटलिजंट व्हिलेजेस म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय; कळमनुरी तालुक्यातल्या ११ गावांचा समावेश

·      लखपती दीदी’ उपक्रमाला मोठी गती देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ – ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आरोप

आणि

·      धाराशिव जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईनच्या पथकाला यश

****

केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करण्याचे, तसंच याप्रकरणी पोलिस तक्रारी दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासंदर्भातलं परिपत्रक महसूल विभागानं काल जारी केलं. छत्रपती संभाजीनगर शहर, सिल्लोड, लातूर, परभणी, बीड, गेवराई, जालना, अर्धापूर, परळी, अमरावती, अकोला, अंजनगाव सुर्जी, अचलपूर आणि पुसद, याठिकाणी या मोहिमेवर अधिक भर दिला जाणार आहे. १६ मुद्द्यांच्या आधारे या दाखल्यांची तपासणी केली जाईल. यासाठी विशेष मेळाव्यांचं आयोजन करुन प्रकरणं निकाली काढली जातील. जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे आता सापडत नाहीत, त्यांची यादी बनवून त्यांना फरार घोषित करुन, प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. ११ ऑगस्ट २०२३ च्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरीत केलेले जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देशही या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

****

राज्यातल्या पाच जिल्ह्यांमधली ७५ गावं, स्मार्ट आणि इंटलिजंट व्हिलेजेस म्हणून राज्य सरकार विकसित करणार आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातली ११ गावं, नागपूरमधल्या काटोल तालुक्यातली १०, अमरावतीमधल्या चांदूरबाजारमधली २३, बारामतीमधली १० आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातल्या २१ गावांचा यात समावेश आहे. यासंदर्भातला शासन आदेश काल सरकारनं जारी केला. नागपूरमधल्या सातनवरीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात आला. शहरं आणि गावं यातलं अंतर कमी करणं, ग्रामीण भागातलं जीवनमान उंचावणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारनं समिती स्थापन केली आहे.

****

आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठवाड्यात लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या.

उदगीर इथं झालेल्या सभेत त्यांनी, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘लखपती दीदी’ उपक्रमाला मोठी गती देण्याची घोषणा केली. यावर्षी ५० लाख महिलांना तर पुढील काळात तब्बल एक कोटी दीदींना लखपती बनवण्याचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून, महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी आश्वासनं देत त्यांनी, उदगीर जिल्हा निर्मितीचेही संकेत दिले.

या कार्यक्रमात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक भिसे आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश झाला.

**

त्यानंतर हिंगोली इथंही फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. हिंगोली शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

****

महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ लागली आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. ते काल बारामती इथं वार्ताहरांशी बोलत होते. हल्ली कामावर मतं मागितली जात नाहीत, तर पैसे देऊन, निधी देऊ अशी आश्वासनं दिली जातात. ही चांगली गोष्ट नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हाच दृष्टिकोन असेल, तर त्यावर भाष्य न केलेलं बरं, असं पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठिकठिकाणी गट झाले असून, या निवडणुकीत एकवाक्यता नाही असंही ते म्हणाले.

राज्य सरकारनं कर्जवसुलीला एका वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी ठरेल, पण शेतकऱ्यांचं झालेलं आर्थिक नुकसान पाहता त्यातली काही रक्कम सरकारनं द्यायला हवी होती, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं.

****

गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फीचा आज समारोप होत आहे. ‘अ युजफुल घोस्ट’ या थाई चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर महोत्सवाची सांगता होईल. काल या महोत्सवात बॉलिवूड अभिनेता आमीर खान यांनी सामाजिक परिवर्तनाचे कथाकार या विषयावर मास्टरक्लास घेतला. चित्रपटांमध्ये लेखन आणि कथाकथन तसंच, अभिजात कथा आणि कल्पनाविष्कार यावेत यासाठी लेखकांना प्राधान्य देण्याची गरज आमीर खान यांनी व्यक्त केली.

****

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात भूजल व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल रिचार्ज या विषयावर मागील काही दिवसांपासून काम सुरू आहे. या विषयावर जनजागृती करण्यासाठी काल धाराशिव इथल्या कृषी महाविद्यालयात शेतकरी, कृषी विभागाचे विद्यार्थी, कृषी विषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. धाराशिव जिल्ह्यात असलेल्या ४१ पाणलोट क्षेत्रांपैकी तीन पाणलोट क्षेत्र जोखीम आणि अति जोखीम या प्रकारात मोडतात, त्यावर काम करण्याची गरज जिल्हाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या नांजावाडी इथल्या अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात अटक असलेल्या दोन आरोपींना काल न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सतीश सोनवणे आणि केशव गावंडे अशी संशयीतांची नावं आहेत. या प्रकरणातल्या अन्य एका फरार आरोपीचा शोध सुरु आहे. नांजावाडी इथं एका गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्राचा जालना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पर्दाफाश केला होता.

****

धाराशिव नगरपरिषदेतल्या तीन प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. २ अ, ७ ब आणि १४ ब या प्रभागांमधल्या काही उमेदवारांच्या अर्जावरचे आक्षेप न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या प्रभागांची निवडणूक पुढच्या आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचं उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड शहरातल्या एका नवदांपत्याने मतदार जनजागृती उपक्रमात सहभागी होत, लोकशाही प्रक्रियेबद्दलची जाणीवपूर्वक बांधिलकी अधोरेखित केली. “अफवा टाळा, प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि मतदान जरूर करा” असा थेट संदेश त्यांनी नागरिकांना दिला. त्यांच्या या सहभागामुळे तरुण मतदारांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल खुलताबाद नगरपरिषद कार्यालयात निवडणूक कामांचा आढावा घेतला. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

बालविवाहमुक्त भारत अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईनच्या पथकाला यश आलं. धाराशिव इथल्या भीमनगर आणि तुळजापूर तालुक्यातल्या पिंपळे इथं हे बालविवाह रोखण्यात आले असून, मुलींच्या पालकांचं समुपदेशन करण्यात आलं. नागरीकांनी जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची १६ वर्षीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हिनं माजी विश्वविजेती नोझोमी ओकुहारा हिला नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लखनौ इथं सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उप–उपांत्यपूर्व सामन्यात तिनं नोझोमी हिच्यावर १३-२१, २१-१६, २१-१९ अशी मात केली. याशिवाय, त्रीशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीत, तर उन्नती हुडा, इशाराणी बरुआ, मिथुन मंजुनाथ, किदंबी श्रीकांत, प्रियांशू राजावत आणि मनराज सिंह यांनी एकेरी विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

****

सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं न्यूझीलंडवर ३-२ अशी मात केली. मलेशिया इथं झालेल्या या सामन्यात भारताकडून अमित रोहिदास, संजय आणि सेल्वम कार्थी यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढचा सामना उद्या कॅनडाविरुद्ध होणार आहे.

****

नांदेड इथले कवी आणि गझलकार बापू दासरी यांची हेमलकसा इथं होणाऱ्या पाचव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. १३ आणि १४ डिसेंबरला होणार्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटन समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष सरोज अंदनकर यांनी ही माहिती दिली.

****

राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बीड आणि परभणी जिल्ह्यातले या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातल्या पाच लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत असलेल्या ३०० कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात जवळपास सात हजार थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्यात आला. ग्राहकांनी चालू देयकासह थकबाकी भरून सहकार्य करावं आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असं आवाहन महावितरणने केलं आहे.

****

No comments: