Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 26 November 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
अयोध्येतला राम मंदिराचा ध्वज म्हणजे संघर्षातून सृजनाचं
प्रतीक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
निवडणूक कार्यक्रम जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य
संस्थांमध्ये आरक्षण मर्यादा पाळण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना
·
आज संविधान दिन; सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
·
नवीन कामगार कायद्यांमुळे ७७ लाख अतिरिक्त रोजगार निर्माण
होणार, भारतीय स्टेट बँकेचा अंदाज
****
अयोध्येतल्या
राम मंदिराचा ध्वज म्हणजे संघर्षातून सृजनाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राम जन्मभूमी मंदिरावर काल पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण
करण्यात आलं, याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…
Voice Cast
‘‘जय श्रीरामचा जयघोष, शंखध्वनी आणि मंगलवाद्यांच्या गजरात अयोध्येत श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या
कळसावर आज प्रभू राम आणि सीता यांच्या विवाहाची तिथी असलेल्या विवाह पंचमीच्या
मुहूर्तावर धर्मध्वजा लावण्यात आली. दहा फूट उंच आणि वीस फूट लांब असलेल्या या
त्रिकोणी भगव्या ध्वजेवर तळपता सूर्य, ओम आणि कोविदार अर्थात कांचन वृक्षाची प्रतिमा अंकित आहे. हा ध्वज प्रभू
श्रीरामाचं शौर्य आणि अलौकिक तेजाचं प्रतीक असल्याचं, पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं, ते म्हणाले…’’
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल,
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांसह सर्व
मान्यवरांनी, रामलला तसंच राम दरबारासह, सप्तर्षी मंदिर, शेषावतार मंदिर आणि अन्नपूर्णा मंदिरातही
दर्शन घेतलं.
**
पंतप्रधान
मोदी यांनी काल हरियाणात कुरुक्षेत्र इथं विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. भगवान श्रीकृष्णाच्या
पवित्र शंखाला समर्पित नवनिर्मित 'पांचजन्य' स्मारकाचं
उद्घाटन त्यांच्या करण्यात आलं. शीख धर्मियांचे नववे गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या
हौतात्म्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या प्रसंगी विशेष स्मारक
नाणं आणि टपाल तिकीट जारी करण्यात आलं.
****
राज्यात
ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत, त्याठिकाणी
आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडू नका, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं
निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा सुरू असल्याची माहिती
राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला काल झालेल्या सुनावणीत दिली. त्यानंतर पीठानं या
प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. राज्यात आगामी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या
निवडणुकांमध्ये ५७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची कमाल मर्यादा ओलांडली जात
असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंह यांनी दिली.
****
राज्यातल्या
महानगरपालिका निवडणुकींसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना देण्यासाठीची
मुदत सात दिवसांऐवजी १५ दिवस करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे. याबाबत निवडणूक
आयोगाला पत्र लिहिलं असल्याची माहिती, काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
****
महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची आठ फेब्रुवारीला
होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला होणार आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त
अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. यादिवशी नियोजित केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेमुळे
हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या संत जनार्दनस्वामी यांच्या आश्रमात ॐ जगद्गुरू जनशांती
धर्म या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सहभागी झाले होते. समाजप्रबोधन आणि
राष्ट्राच्या उभारणीत संतांचं मोठं योगदान असल्याचं ते यावेळी म्हणाले. ७५१ कुंड यज्ञशाळा
प्रवेश सोहळा तसंच भगवान शिव मूर्तिचं पूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
****
संस्कारक्षम
तसंच गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवण्यासाठी दशसूत्री उपक्रमांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच वेळी एक हजार
९२० शाळांमध्ये पालकसभा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना चांगले नागरिक म्हणून घडवण्यासाठी
त्यांचा सर्वांगिण विकास होणं आवश्यक आहे, त्यासाठी शिक्षणासोबत त्यांच्यावर संस्कार
रुजवण्याची गरज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली.
****
मुंबईत
२००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्ष पूर्ण झाली. २६ नोव्हेंबरच्या सायंकाळी
दहा दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात परदेशी नागरिकांसह सुमारे १७० लोक मारले गेले
तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. हा हल्ला मोडून काढतांना हौतात्म्य आलेले पोलिस
तसंच सुरक्षा दलाच्या सैनिकांना आज राज्यभरात विविध कार्यक्रमांतून अभिवादन करण्यात
येत आहे.
****
संविधान
दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त नवी दिल्ली इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात
आलं आहे. "आपले संविधान - आपला स्वाभिमान" ही या दिवसाची संकल्पना आहे.
**
नांदेड
जिल्ह्यातल्या सर्व विभाग प्रमुखांनी संविधान दिवस साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
राहुल कर्डीले यांनी दिले. परभणी इथंही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत
घर घर संविधान अभियानांतर्गत शिवाजी महाविद्यालय इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात
आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक
संस्थांमधून संविधान उद्देशिकेच्या वाचनासह अनेक कार्यक्रम होणार आहेत.
****
नवीन कामगार
कायद्यांमुळे ७७ लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत एक पूर्णांक तीन टक्क्यांपर्यंत
घट होईल, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात व्यक्त केला आहे. या
कायद्यांमुळे संघटित कामगारांचं प्रमाण किमान १५ टक्क्यांनी वाढून सुमारे साडे ७५ टक्क्यांपर्यंत
जाईल. सध्या देशभरात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची संख्या सुमारे ४४ कोटी इतकी
असून त्यापैकी जवळपास ३१ कोटी कामगारांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केली असल्याचं या
अहवालात नमूद आहे.
****
या कामगार
कायद्यांमुळे कामगारांना मोठा लाभ होणार असल्याचं मत भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सचिव
साहेबराव निकम यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले…
बाईट – भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सचिव साहेबराव निकम
****
कामगार
कल्याण विभागाअंतर्गत संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या जास्तीत जास्त कामगारांना
शासकीय योजनांचा लाभ प्रमाणात द्या, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे अपर
जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या बैठकीत
ते बोलत होते.
****
जालना शहरात
मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी जनावरे मोकाट फिरत असल्याने वाहतूक
कोंडी, अपघाताचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे भटक्या जनावरांच्या
मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी
तथा महानगरपालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिले. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने
कोणतीही शिथिलता सहन केली जाणार नाही, असं त्यांनी काल वार्ताहरांशी
बोलताना सांगितलं.
****
अंबाजोगाई
इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय समारोहाचं
उद्घाटन काल ज्येष्ठ लेखक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते झालं. यशवंतराव चव्हाणांनी
सामान्यांसाठी काम केलं, त्यांच्या माध्यमातून सुसंस्कृत राज्यकर्ता महाराष्ट्राने देशाला
दिला, जातीपातीच्या पलिकडे जाऊन त्यांनी राज्य कारभार केला,
मात्र अलीकडे जातीय यादवी याच महाराष्ट्रात रुजवली जात असल्याची खंत
देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.
****
धाराशिव
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे काल पाच कलमी कार्यक्रम
जाहिर केला. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुढील
काळात धाराशिव हे मुबलक पाणी आणि बागबगीचे असलेलं सुंदर शहर म्हणून सगळीकडे ओळखले जाईल, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
****
लातूरचे
माजी महापौर तथा काँग्रेस नेते विक्रांत गोजममुंडे यांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आगामी महानगरपालिकेच्या
निवडणुकीत प्रभाग ५ मधल्या उमेदवारी वादामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
****
शिखांचे
नववे गुरु श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५०व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेड इथं
काल रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात मोठ्या संख्येने रक्त संकलन करण्यात आलं.
****
नानाजी
देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी तसंच शेतकरी उत्पादक
गटासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत बीड जिल्ह्यातल्या ३९६ गावांची
निवड करण्यात आल्याची माहिती, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे
प्रकल्प संचालक एस.एम.साळवे यांनी दिली आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात काल दोन पोलिसांना लाच घेताना अटक करण्यात आली. सोनखेड ठाण्याचे सहायक पोलीस
उपनिरीक्षक गणपत गीते यांच्याविरुद्ध हाणामारी प्रकरणात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची
लाच घेतल्याप्रकरणी, तर रामतीर्थ पोलीस ठाण्यातले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर
यांच्याविरुद्ध जुगार प्रकरणात मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment