Thursday, 27 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.11.2025 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 27 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत आज अवकाश क्षेत्रात एका अभूतपूर्व क्षणाचा साक्षीदार होत आहे. खाजगी क्षेत्र आता भारताच्या अवकाश परिसंस्थेत मोठी झेप घेत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आज उद्घाटन करण्यात आलेला स्कायरूटचा इन्फिनिटी कॅम्पस हा भारताची नवी विचारसरणी, नवोपक्रम आणि युवा शक्तीचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारतीय अंतराळ स्टार्टअप स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन आणि स्कायरूटच्या पहिल्या ऑर्बिटल रॉकेट, विक्रम-१ चं आज अनावरण केलं, त्याप्रसंगी ते बोलत होते.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

देशाच्या सशस्त्र दलांनी राष्ट्राच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणात शिस्त आणि देशभक्तीचा उत्कृष्ट आदर्श प्रस्थापित केला असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित चाणक्य संरक्षण संवाद- 2025 परिषदेला राष्ट्रपतींनी आज संबोधित केलं. प्रत्येक सुरक्षा आव्हानात सशस्त्र दलांनी दृढनिश्चय दाखवला आहे. अलीकडील ऑपरेशन सिंदूरच्या यशानं देशाच्या दहशतवादविरोधी धोरणात एक महत्वाचा टप्पा गाठल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं की, भारताच्या लष्करी क्षमतेसह शांततेच्या धोरणाचा पुरस्कार करत ठाम पण जबाबदारीनं कारवाई करण्याच्या नैतिक स्पष्टतेचीही जगानं दखल घेतली आहे.

****

लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अरुणाचल प्रदेश चीनला देण्याबाबत किंवा चीनच्या तंत्रज्ञानानं राफेल जेट विमानं नष्ट केल्याबाबत कोणतंही वक्तव्य केलं नाही. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य पडताळणी विभागानं स्पष्ट केलं की, पाकिस्तानी प्रचारक खात्यांकडून एआयच्या मदतीने तयार केलेला खोटा व्हिडिओ प्रसारित केला जात आहे. नागरिकांनी अशा अप्रमाणित सामग्रीपासून दूर राहून केवळ अधिकृत आणि विश्वसनीय स्रोतांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे.

****

गौण खनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा परवाना थेट निलंबित किंवा रद्द करण्याची धडक कारवाई आता करण्यात येणार आहे. राज्यातील वाळू आणि इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागानं हा निर्णय घेतल्याचं काल जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

****

भारत आणि संयुक्त अरब अमिराती व्यापक आर्थिक भागीदारी करारांतर्गत संयुक्त समितीची तिसरी बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अजय भादू आणि युएईच्या आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहार विभागाचे सहाय्यक उपसचिव जुमा अल कैत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. २०२४-२५ मध्ये शंभर अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झालेल्या द्विपक्षीय व्यापारातील मजबूत वाढीचे दोन्ही बाजूंनी स्वागत केलं. भारताच्या प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक म्हणून युएईचे स्थान पुन्हा अधोरेखित होत असल्याचं भारतानं म्हटलं आहे.

****

२०२५-२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था सहा पूर्णांक ६ टक्के दराने वाढेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे. अमेरिकेने लावलेल्या 50 टक्के शुल्कांच्या प्रतिकूल परिणामांना वस्तू आणि सेवा करातील सुधारणा कमी करण्यात मदत करतील, असंही आयएमएफनं नमूद केलं आहे.

****

गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज उत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी असून बहुतांश प्रेक्षागृहं हाऊसफुल्ल झाली आहेत. ओरेंडा, कॉटन क्वीन, अ पोएट, स्लीपलेस सिटी, द वूमन या गाजलेल्या चित्रपटांचं आज प्रदर्शन होणार आहे. तर, आजचा मास्टरक्लास विशेष आकर्षण असणार आहे. अभिनेता आमिर खान “सामाजिक परिवर्तन आणि समावेशकतेचे कथात्मक शिल्पकार” या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तसंच ‘शोले’ चित्रपटाला ५० वर्ष झाली, त्यानिमित्त दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि किरण सिप्पी ‘शोले आजही का भावतो?’ या विषयावर संवाद सत्राला संबोधित करणार आहेत.

****

२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडं आलं असून अहमदाबाद इथं या स्पर्धा होणार आहेत. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेच्या बैठकीत भारताला हे यजमानपद देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. राष्ट्रकुल खेळ २०३० मध्ये त्यांचा १०० वा वर्धापन दिन साजरा करणार आहेत आणि या ऐतिहासिक प्रसंगी भारतात या खेळांचं आयोजन करणं ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

****

No comments: