Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 30 November
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ची भावना बळकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं
पंतप्रधानांचं `मन की बात`मध्ये आवाहन
·
संसदेचं हिवाळी अधिवेशन
उद्यापासून
·
राज्याच्या मुख्य सचिवपदाची
सुत्रं राजेश अग्रवाल यांनी स्वीकारली
आणि
·
राज्यातल्या २४३ नगरपरिषदा
आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला
****
‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ची भावना बळकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं
आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या आकाशवाणीवरच्या `मन
की बात` या कार्यक्रमातून देशवासियांना केलं. या मालिकेतला हा एकशे अठ्ठावीसावा भाग
होता. युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं त्यांनी नमुद केलं.
तीव्र इच्छा,
सामूहिक शक्ती, आणि संघभावनेनं काम
करण्यावर विश्वास असेल तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले. या संदर्भात
त्यांनी इस्त्रोनं मंगळ ग्रहासारख्या वातावरणात जीपीएस प्रणालीशिवाय ड्रोन
उडवण्याच्या स्पर्धेची चित्रफित पाहिल्याचा अनुभव सांगितला. या स्पर्धेत
पुण्यातल्या एका संघानं यश मिळवल्याचा उल्लेख त्यांनी केला. हैदराबाद इथं
विमानांच्या देखभाल,
दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी केंद्राचं उद्घाटन, नौदलाच्या
ताफ्यात स्वदेशनिर्मित आयएनएस माहे या युद्धनौकेच्या समावेशाचा उल्लेखही त्यांनी
केला. कृषी क्षेत्रातली देशाची प्रगतीही त्यांनी अधोरेखित केली. देशानं ३५७ दशलक्ष
टन इतक्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन करून ऐतिहासिक विक्रम केला असल्याचं ते
म्हणाले. गेल्या काही वर्षांत मधाची निर्यात तीन पटीपेक्षा जास्त झाली आहे, देशाचं
मध उत्पादन दीड लाख टनांपेक्षा जास्त झालं आहे, मध अभियानाअंतर्गत खादी
ग्रामोद्योगानं सव्वा दोन लाखापेक्षा जास्त मधमाशी पालन पेट्यांचं वाटप केलं आहे
अशी माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रातल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केला.
महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद, जपानमधल्या डेफ ऑलिम्पिक, तसंच
जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारतानं मिळवलेलं यश याविषयी त्यांनी सांगितलं.
दृष्टीहीन महिलांनी जिंकलेला पहिलाच टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक म्हणजे देशाच्या
क्रीडा इतिहासातल्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले…
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांनी देशाचा गौरव वाढवणाऱ्या सांस्कृतिक आणि इतर
घडामोडींचाही उल्लेख केला. काही दिवसांपूर्वीच साजरा झालेला संविधान दिन, तसंच
वंदे मातरम् या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात होत असलेले
कार्यक्रम,
अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वजाचं
आरोहण, कुरुक्षेत्रातल्या पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण यांविषयी त्यांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवानिमित्तानं विविध देशांत झालेल्या कार्यक्रमांची
माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय संग्रहालयातल्या भगवान बुद्धांच्या पवित्र
अवशेषांच्या दर्शनाला जगभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पंतप्रधानांनी
यावेळी दिली.
ते म्हणाले…
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नुकत्याच झालेल्या जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानंही आपण
जागतिक नेत्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये स्थानिक भावनेवरच भर दिला असं ते
म्हणाले. आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खरेदीसाठीही नागरिकांनी देशात बनलेल्या
वस्तुंची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. देशाच्या हिवाळी पर्यटन
क्षमतांबद्दल सांगताना हिवाळी पर्यटनासाठी हिमालयातील
डोंगररांगाचा विचार करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून त्या
पार्श्वभूमीवर सरकारने आज सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या अधिवेशनात मतदार
पुनरिक्षण,
दिल्ली बाँम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबधांबद्दल विरोधी पक्ष
प्रश्न उपस्थित करतील अशी
शक्यता आहे. अधिवेशनात अनेक नवीन विधेयके आणली जाणार आहेत, या
पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज सुरळीत चालावं अशी भूमिका सरकारतर्फे संरक्षणमंत्री
राजनाथ सिंग,
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू तसंच राज्यमंत्री अर्जुन
राम मेघवाल यांनी मांडली. जयराम रमेश, गौरव गोगोई, प्रमोद
तिवारी या काँग्रेसच्या नेत्यांनी तसंच डीएमके चे टी आर बालू, तृणमूलचे
डेरेक ओ ब्रायन तसंच `आययूएमएल`चे ई टी मोहम्मद बशीर यांनी विरोधी पक्षांची भूमिका मांडली. आरजेडीचे मनोज झा, संयुक्त
जनता दलाचे संजय झा,
शिरोमणी अकाली दलाच्या हरसिम्रत कौर हे नेतेही या बैठकीला
उपस्थित होते.
****
एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४९ व्या
तुकडीचं दीक्षांत संचलन पुण्यात खडकवासला इथं आज सकाळी झालं. कॅडेट सिद्धार्थ सिंग
यांनी या संचलनाचं नेतृत्व केलं. याप्रसंगी ३२९ कॅडेट्स संरक्षण दलात दाखल झाले.
नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी या संचलनाचं निरीक्षण केलं. याप्रसंगी
कॅडेट दीपक कांडपाल यांना सुवर्णपदक, सिद्धार्थ सिंग यांना रौप्य
पदक तर सिद्धी जैन यांना कांस्यपदक प्रदान कऱण्यात आलं. या तुकडीतल्या ३२८
कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी मिळाली. ७२ जणांना विज्ञान, ९२
जणांना संगणक विज्ञान,
आणि ५२ जणांना कला शाखेतली पदवी प्रदान करण्यात आली.
****
राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज
पदभार स्वीकारला. मुंबई इथं मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमात, मावळते
मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याकडून हा पदभार स्विकारण्यात आला.महाराष्ट्राचा विकास
आणि गौरव वाढवण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत राहीन असं राजेश अग्रवाल यावेळी
म्हणाले. राजेश अग्रवाल हे मूळचे पंजाबमधील जालंधर इथले असून ते भारतीय प्रशासकीय
सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे १९८९ चे अधिकारी आहेत.
****
राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या
निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार
करत आहेत. प्रशासनाकडून २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू असून काही
ठिकाणी टपाली मतदानाला सुरुवात होत आहे. बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिकांच्या
निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातल्या बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, परळी
आणि अंबाजोगाई या सहा नगरपरिषदांमधे दोन तारखेला मतदान होणार आहे. यासाठी
जिल्हाभरात एकूण ४३४ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. यात सर्वाधिक म्हणजे १७९
मतदान केंद्र बीड शहरात आहेत. जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रावर सुरक्षा
व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची सभा उद्या सकाळी दहा वाजता बीडमध्ये होणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि धर्माबाद
नगरपरिषदा तसंच भोकर,
लोहा आणि कुंडलवाडी नगरपरिषदांमधल्या तीन प्रभागांमधली
निवडणूक प्रक्रिया नगराध्यक्षपदासाठी अपील असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली असून या
ठिकाणी २ डिसेंबर ऐवजी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या चार
नगरपरिषदांमधे टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे.
****
विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारतानं दक्षिण
आफ्रिकेसमोर पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी ३५० धावांचं लक्ष्य
ठेवलं आहे. झारखंडमध्ये रांची इथं सुरु असलेल्या या सामन्यात भारतानं ५० षटकांत आठ
बाद ३४९ धावा केल्या. विराट कोहलीनं १२० चेंडुंमध्ये १३५, कर्णधार
के. एल. राहुलनं ५६ चेंडुंमध्ये ६० आणि रोहित शर्माच्या ५१ चेंडुंमधील ५७ धावा यात
प्रमुख ठरल्या. रोहित आता एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ३५२ षटकार मारणारा
फलंदाज ठरला आहे.
****
एअर बस कंपनीच्या ३३८ विमानांपैकी ३२३ विमानांच्या
सॉफ्टवेअरचं अद्ययावतीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक
महासंचालनालयानं दिली आहे. अद्ययावतीकरण झालेली विमानं इंडिगो, एअर
इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांची असल्याचं त्यांनी कळवलं आहे.
एअरबस थ्री ट्वेंटी प्रकारातल्या विमानांच्या नियंत्रक सॉफ्टवेअर मधे बिघाड
झाल्याचं समजल्यावर त्या सर्व विमानांचं उड्डाण तात्काळ थांबवण्याचे आदेश
महासंचालनालयानं काल दिले होते.
****
नांदेड जिल्ह्यात वन विभागानं बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी
पंधरा पथकं तैनात केली आहेत. नायगाव तालुक्यात कृष्णूर एमआयडीसी भागात काल एका
बिबट्यानं,
एका मजूरावर तसचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला
होता, यानंतर वनविभागानं विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment