Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 26
November 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ दुपारी
१.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांच्या अध्यक्षतेखाली आज संविधान दिनानिमित्त नवी दिल्ली इथल्या संविधान सदनात मुख्य
कार्यक्रम झाला. भारतीय संसद अनेक देशांसाठी आदर्श ठरली असून गेल्या दशकात संसदेनं
लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता सिद्ध केल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या:
बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
यांनी संविधान हे स्वातंत्र्य संग्रामातील लाखो देशवासीयांच्या ज्ञान, त्याग आणि
स्वप्नांचे प्रतीक असल्याचं म्हटलं. उपराष्ट्रपतींनी संविधान सभेतील डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, एन. गोपालस्वामी अय्यंगार आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
यांसह इतरांना आदरांली अर्पण केली. या प्रसंगी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचेही भाषण
झाले.
संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्याचबरोबर 'संविधान प्रत'ला त्यांनी
वंदन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर, तसंच नांदेड
आकाशवाणी केंद्रात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचं सामुहिक
वाचन करण्यात आलं.
****
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८
रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच
सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. मुंबई
पोलीस आयुक्त कार्यालयातील स्मृती स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन
केलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहिदांच्या कुटुंबीयांची भेट घेत संवेदना व्यक्त
केल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री
राजनाथ सिंह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुली गांधी यांनीही मुंबई हल्ल्यातील शहीद जवानांना
आदरांजली वाहिली. सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्यासाठी, मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण
करण्याच्या संकल्प करत पुढे जाण्यासाठी देश वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या
संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
३० तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाचा हा १२८वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि
विचार येत्या २८ तारखेपर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क
क्रमांकावर, मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना
प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी एसटी महामंडळानं एक आठ शून्य शून्य दोन दोन एक
दोन पाच एक हा मदत क्रमांक जारी केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष
प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क साधण्यासाठी
३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दुरध्वनी क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना
देण्यात येणार असल्याचंही नाईक यांनी सांगितलं.
****
केंद्र शासनानं निश्चित केलेल्या
आधारभूत दरानुसार मूग उडीद आणि सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही
दलाल किंवा मध्यस्थांच्या अमिषाला बळी पडू नये, असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन
महासंघ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि एनसीसीएफ यांची याबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी
ते बोलत होते. पणन महासंघाकडून सात खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू
करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन गुप्ता यांनी
केलं.
****
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं
भारताविरुद्धची क्रिकेट कसोटी मालिका २-० अशी जिंकली. गुवाहाटी कसोटीत ५४९ धावांच्या
आव्हानाचा पाठलाग करताना पाचव्या दिवशी भारताचा दुसरा डाव १४० धावांवर संपुष्टात आला.
दक्षिण आफ्रिकेनं ४०८ धावांनी भारतावर विजय मिळवला. धावांच्या फरकानं झालेला भारताचा
हा सर्वात मोठा पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेडून सिमॉन हार्मरनं दुसऱ्या डावात सहा बळी
टिपले.
****
No comments:
Post a Comment