Wednesday, 26 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या दोन बहुमार्गिका रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      गेल्या दशकभरातली भारताची आर्थिक प्रगती ही संविधानकर्त्यांच्या दूरदृष्टीची फलश्रुती – राष्ट्रपतींचं प्रतिपादन; संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम

·      २६/११ दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन

·      विद्यार्थ्यांना प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी एसटी महामंडळाकडून मदत क्रमांक जारी

आणि

·      दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना आणि मालिकाही भारताने गमावली

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या दोन हजार ७८१ कोटी रुपये खर्चाच्या दोन बहुमार्गिका रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये देवभूमी द्वारका – कनालुस दुहेरी मार्ग आणि बदलापूर – कर्जत तिसरी आणि चौथी लाईन याचा समावेश आहे. या योजना भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे २२४ किलोमीटरची वाढ करतील आणि सुमारे ५८५ गावांची जोडणी अधिक बळकट करतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

सिंटर्ड रेयर अर्थ परमनेंट मॅग्नेट – आर ई पी एम च्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेचा एकूण खर्च सात हजार २८० कोटी रुपये आहे, ज्यामध्ये पाच वर्षांसाठी REPM विक्रीवर सहा हजार ४५० कोटी रुपयांचं विक्री-संबंधित प्रोत्साहन समाविष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रेयर अर्थ परमनेंट मॅग्नेट हे चुंबकांच्या सर्वात मजबूत प्रकारांपैकी एक असून, इलेक्ट्रिक वाहनं, अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि संरक्षण अनुप्रयोगांसाठी ते अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासह इतर निर्णयांची माहिती देताना वैष्णव म्हणाले,

बाईट – अश्विनी वैष्णव

****

गेल्या दशकभरातली भारताची आर्थिक प्रगती ही संविधानकर्त्यांच्या दूरदृष्टीची फलश्रुती असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संविधान दिनानिमित्त आज नवी दिल्लीत मुख्य कार्यक्रम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय संसद, आपल्या संविधानकर्त्यांनी मांडलेल्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुत्वाच्या आदर्शांवर पुढे जात आहे, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

बाईट- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, लोकसभेचे सभापती ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभेतले सभागृह नेते जेपी नड्डा, तसंच दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आणि संसद सदस्य सहभागी झाले होते. या कार्यक्रमात संविधानाच्या मराठीसह नऊ भाषांतल्या अनुवादाचं प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं.

**

संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहीलं आहे. नागरिकांनी कर्तव्याला प्राधान्य द्यावं तसंच आपला मताधिकार बजावून लोकशाही बळकट करावी असं आवाहन त्यांनी या पत्रात केलं. डॉ राजेंद्र प्रसाद, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच संविधान सभेतल्या अनेक महिला सदस्यांच्या दृरदृष्टीमुळे संविधान समृद्ध झालं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

**

संविधान दिवसानिमित्त आज राज्यात सर्वत्र सरकारी आणि निमसरकारी कार्यालयं, आस्थापना तसंच विविध संस्था संघटनांमधे संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यात डहाणू इथं आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं.

**

छत्रपती संभाजीनगर इथं वंदे मातरम् सभागृहात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिनानिमित्त सामूहिक उद्देशिका वाचन करण्यात आलं. प्रत्येक व्यक्तीच्या हक्क आणि कर्तव्याचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक घरात आणि गावात संविधान पोहोचणं आवश्यक असून, हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी प्रत्येकानं संविधानाचे दूत व्हावं, असं आवाहन गोऱ्हे यांनी केलं. पालकमंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्त जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेच्या प्रतीची रथयात्रा काढण्यात आली.

**

नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, त्यानंतर संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं.

**

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. यानिमित्त जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रभात फेरीसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

**

छत्रपती संभाजीनगर, तसंच नांदेड आकाशवाणी केंद्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं.

****

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस दलातले अधिकारी, कर्मचारी तसंच सुरक्षा दलातल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील स्मृती स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं. यावेळी फडणवीस यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत संवेदना व्यक्त केल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुली गांधी यांनीही मुंबई हल्ल्यातल्या हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्यासाठी, मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या संकल्प करत पुढे जाण्यासाठी देश वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी एसटी महामंडळानं, एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच एक, हा मदत क्रमांक जारी केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क साधण्यासाठी ३१ विभागातल्या सर्व विभाग नियंत्रकांचे दुरध्वनी क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.

****

केंद्र शासनानं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही दलाल किंवा मध्यस्थांच्या अमिषाला बळी पडू नये, असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. यासंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. पणन महासंघाकडून सात खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन गुप्ता यांनी केलं.

****

राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनानं गठीत केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीची आज छत्रपती संभाजीनगर इथं बैठक झाली. यावेळी साडे तीनशे हून अधिक शिक्षक, बाल मानसोपचार तज्ज्ञ, संस्थाचालक, पालक, पत्रकार उपस्थित होते. समाजातल्या विविध स्तरातल्या घटकांनी समितीच्या संकेतस्थळावर आपली मतं नोंदवण्याचं आवाहन अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी यावेळी केलं. 

****

चंपाषष्ठी निमित्त आज छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या सातारा परिसरातल्या श्री खंडोबा मंदीरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

बीड शहरात खंडेश्वरी देवी मंदिर परिसरातल्या श्री खंडोबा दीपमाळ मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त यात्रा भरवण्यात आली आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

परभणी शहरातल्या श्री मल्हारी मार्तंड देवस्थान इथं जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते आज पूजा करण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या निम्न मानार प्रक्लपातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येत आहे. २५ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर पर्यंत २० दिवसांसाठी हे पाणी सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष चौगले यांनी केलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या शाळांमधे बालविवाहाविरोधी जनजागृती अभियान राबवलं जात आहे. यासाठी चाइल्ड हेल्पलाईनचे सदस्य विविध शाळांमधे जाऊन विद्यार्थ्यांना बालहक्क, तसंच बालविवाहामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल समजावून सांगत आहेत. यावेळी चाइल्ड हेल्पलाईन १०९८ वर मदत मागण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. यात शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

****

गुवाहाटी इथं झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा ४०८ धावांनी पराभव करून मालिका २-० अशी जिंकली. ५४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघ १४० धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाने ५४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने सहा बळी घेतले, त्याला मालिकावीर आणि मार्को जॉन्सनला सामनावीर घोषित करण्यात आलं.

****

No comments: