Saturday, 29 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी करू नये-सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

·      नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराच्या वेळेत वाढ

·      देशाला स्वावलंबी करण्यासाठी संकल्प करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

·      इफ्फीचा समारोप- स्कीन ऑफ यूथ चित्रपटाला सुवर्ण मयूर, तर संतोष डावखर यांच्या गोंधळ या चित्रपटाचा रौप्यमयूर पुरस्काराने गौरव

·      मिर्झा एक्सप्रेस उर्फ डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं अमरावती इथं निधन

आणि

·      अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणी जालन्यात दोन औषध विक्रेत्यांना अटक

****

राज्यात निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं काल राज्य निवडणूक आयोगाला हे निर्देश दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची अधिसूचना जारी झालेली आहे, त्या निवडणुकांचा निकाल या याचिकांवरच्या निकालावर अवलंबून राहील, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. राज्यात एकंदर २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, यापैकी ४० नगरपरिषदा आणि १७ नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची कमाल मर्यादा ओलांडली जात असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंह यांनी न्यायालयाला दिली. तर, २९ महानगरपालिका आणि ३४६ पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या पीठाकडे सोपवून पुढची सुनावणी २१ जानेवारी रोजी घ्यायची सूचना न्यायालयानं केली आणि ज्यांची अधिसूचना जारी झालेली आहे, त्या निवडणुका वेळापत्रकाप्रमाणे घ्यायला परवानगी दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणुकांवर टांगती तलवार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

****

दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, विविध पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरले आहेत. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जालना, वाशीम, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विविध प्रचारसभांना संबोधित केलं.

जालना जिल्ह्यात परतूर इथं झालेल्या जाहिर सभेत फडणवीस यांनी, परतूर शहराला मराठवाड्यातलं 'आदर्श शहर' बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. परतूरच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असंही त्यांनी आश्वस्त केलं. खासदार डॉ. भागवत कराड, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते.

**

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे, अहिल्यानगर आणि रायगड जिल्ह्यात प्रचार करत आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये काल प्रचारसभा झाली.

**

दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारासाठीचा वेळ वाढवण्यात आलं असून, एक डिसेंबर रोजी रात्री १० वाजता प्रचार बंद होईल, असं पत्रक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केलं आहे. राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित मतदारसंघांच्या बाहेर राहणाऱ्या मतदारांनाही ही सुट्टी लागू असेल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकात उडुपी इथल्या श्रीकृष्ण मठाला त्यांनी भेट दिली आणि पूजा अर्चना केली. गर्भगृहासमोरच्या सुवर्ण तीर्थ मंडपाचं उद्घाटन करुन नंतर त्यांनी संत कनकदास यांच्या पवित्र खिडकीला सुवर्ण कवच अर्पण केलं. यावेळी झालेल्या लक्ष कंठ गीता पठण कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, देशाला स्वावलंबी करण्यासाठी संकल्प करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधानांनी काल गोव्यात श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या पाचशे पन्नासाव्या वर्धापनदिनानिमित्ताने भेट दिली. यावेळी भगवान श्रीरामांच्या ७७ फूट उंच भव्य कांस्यप्रतिमेचं अनावरण पंतप्रधानांनी केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२८वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाइट तसंच न्यूज़ऑनएयर मोबाइल ॲपवर प्रसारित केला जाईल.

****

सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार उद्या ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून राजेश अग्रवाल त्यांच्याकडून उद्याच पदभार स्वीकारतील.

****

नक्षलवाद्यांच्या महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याच्यासह दरेकसा दलमच्या ११ जहाल नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर काल आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर मिळून एकोणनव्वद लाख रुपयांचं बक्षीस जाहीर होतं. छत्तीसगडमधल्या जगदालपूरमध्येही काल १० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं.

****

५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फीचा काल गोव्यात पणजी इथं समारोप झाला. महोत्सवात काल ‘अ यूजफुल घोस्ट’ हा शेवटचा चित्रपट दाखवण्यात आला. महोत्सवातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला मानाचा सुवर्ण मयूर पुरस्कार ॲशले मेफेयर यांच्या स्कीन ऑफ यूथ या चित्रपटाला तर रौप्य मयूर पुरस्कार संतोष डावखर यांच्या गोंधळ या चित्रपटाला देण्यात आला. उत्कृष्ट वेब सीरिजचा पुरस्कार ‘बंदिश बँडिट्स टू’ ला देण्यात आला. करण सिंह त्यागी ने केसरी चैप्टर 2 साठी भारतीय चित्रपट श्रेणीत उत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक हा पुरस्कार पटकावला. प्रतिष्ठेचं आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक, एरिक स्वेनसन दिग्दर्शित ‘सेफ हाऊस’ या चित्रपटानं पटकावलं. माय फादर्स शॅडो या चित्रपटाला स्पेशल ज़्युरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांचा यावेळी विशेष सन्मान झाला.

****

राज्य शासनाचे सांस्कृतिक पुरस्कार काल जाहीर झाले. नाटक विभागात ज्येष्ठ अभिनेते अरुण कदम तर युवा कलावंतांच्या श्रेणीत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता भूषण कडू यांना पुरस्कार जाहीर झाला. चित्रपट विभागात मधुरा वेलणकर यांना तर गायक राहुल देशपांडे आणि भाग्येश मराठे यांना उपशास्त्रीय संगीत विभागात पुरस्कार जाहीर झाले. निवेदनासाठी ज्येष्ठ कलावंत उदय सबनीस तसंच अंबरीश मिश्रा, मेघना एरंडे तसंच समीरा गुजर यांना तर लोककला संवर्धनासाठी गोदावरी मुंडे तसंच बीडच्या तांबवेश्वर शाहिरी कलापथकालाही पुरस्कार घोषीत झाला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ज्येष्ठांना प्रत्येकी तीन लाख तर युवांना प्रत्येकी एक लाख रुपये या स्वरुपाचे हे पुरस्कार लवकरच मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.

****

सुप्रसिद्ध कवी, 'मिर्झा एक्सप्रेस' नावाने ओळखले जाणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं अमरावती इथं काल, निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. अनेक कवी संमेलनात त्यांनी आपल्या शैलीनं रसिकांमध्ये स्थान निर्माण केलं होते. 'मिर्झाजी कहीन' हा त्यांचा वर्तमानपत्रातील स्तंभ लोकप्रिय झाला होता. मिर्झा यांचे २० काव्यसंग्रह प्रसिद्ध असून, मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मिर्झा बेग यांच्या निधनानं एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेलं व्यक्तिमत्व गमावल्याचं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या नांजावाडी इथल्या अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल दोन औषध विक्रेत्यांना अटक केली. दोघेही या प्रकरणातल्या मुख्य आरोपींना गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री करत असल्याची गंभीर बाब तपासात समोर आली. नांजावाडी इथं एका गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्राचा आरोग्य विभाग आणि जालना गुन्हे शाखेच्या पथकाने तीन दिवसांपूर्वी पर्दाफाश केला.

****

छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रातले तंत्रज्ञ सुनील जोशी काल सेवानिवृत्त झाले. जोशी यांनी परभणी आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रात काम केलं. केंद्रातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने जोशी यांना काल निरोप देण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा विभागीय आयुक्त तथा महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी काल घेतला.

****

No comments: