Saturday, 29 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

क्रीडा विभागातर्फे ‘प्रोजेक्ट महा-देवा’च्या राज्यस्तरीय स्काऊटिंग अंतिम फेरीचं उद्घाटन मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईतल्या कुपरेज फुटबॉल मैदान इथे करण्यात आलं. महाराष्ट्रात फुटबॉलचा पाया मजबूत करण्याच्या उद्दिष्टाने सुरू झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतल्या या प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची ही औपचारिक सुरुवात आहे.

प्रोजेक्ट महा-देवा अंतर्गत राज्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील फुटबॉलचा विकास साधण्यात येणार असून, राज्यातील प्रतिभावान खेळाडू शोधणं, त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रगतीसाठी आवश्यक पाठबळ देणं हे प्रकल्पाचं मुख्य ध्येय आहे. ग्रामपातळीवर सुरू झालेल्या निवड प्रक्रियेतून राज्यातील १२० प्रतिभावान फुटबॉलपटू प्रोजेक्ट महा-देवाच्या अंतिम राज्यस्तरीय चाचणीपर्यंत पोहोचले आहेत, यानंतरच्या अंतिम फेरीतून निवडलेल्या ६० फुटबॉलपटूंना महाराष्ट्र सरकारतर्फे पाच वर्षांची विशेष शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. तसंच या तरुणांना येत्या डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्याकडून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

****

श्रीलंकेतल्या हाहा:कारानंतर दित्वा हे चक्रवादळ तामिळनाडूच्या दिशेकडे सरकत आहे. सध्या दित्वा चेन्नईच्या दक्षिणेकडून सुमारे ४३० किलोमीटर अंतरावर आहे. उद्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागात बंगालच्या खाडीपर्यंत धडकेल असा अंदाज आहे. दरम्यान, भारतीय वायुसेनेनं २१ टन मदत साहित्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण बलांनी एनडीआराएफच्या ८० जवानांना कोलंबोला पाठवलं आहे. या व्यतिरिक्त श्रीलंकेला ८ टन उपकरणं देखील पाठवण्यात आली असून आवश्यक खाद्य पदार्थ आणि अन्य साहित्यदेखील श्रीलंकेला रवाना करण्यात आलं आहे. दित्वा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतानं श्रीलंकेत पुनवर्सन उपायांसाठी ऑपरेशन सागर बंधू अभियान सुरू केलं असून या अंतर्गत श्रीलंकेला ही मदत करण्यात येत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर मधल्या कन्नड इथे शिवसेनेच्या उमेदवारांसाठी आमदार संजय जाधव यांची प्रचारसभा झाली. सभेदरम्यान सर्व उमेदवारांनी आपल्या प्रभागातील तसेच संपूर्ण कन्नड शहरातील विकासकामांची विस्तृत मांडणी केली. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाशव्यवस्था, आरोग्यसुविधा आणि समाजकल्याण योजनांबाबत आगामी दृष्टीकोन नागरिकांसमोर मांडण्यात आला.

****

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी शहरातल्या महिलांशी संवाद साधला.

स्थानिक प्रश्न, विकासाची प्राधान्यक्रमे आणि भविष्यातील योजनांवर झालेल्या या संवादातून महिलांचा सकारात्मक प्रतिसाद हा प्रचार मोहीम बळकट करणारा असल्याचं त्या म्हणाल्या.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं गंगापूर शहर आणखी सक्षम, सुरक्षित आणि सुंदर बनवण्याचा आपला संकल्प असल्याचं भाजप खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गंगापूर इथे आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गंगापूर शहरात झालेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यात आली.

****

परभणी जिल्ह्यातील सेलू शहरातील नूतन विद्यालय, मतदार जागृती अभियानांतर्गत, आज २१०० विद्यार्थ्यांनी २०,००० चौरस फुटांची ‘वोट फॉर सेलू’ मानवी साखळी उभारून लोकशाही जागृतीचा प्रभावी संदेश दिला. या उपक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, मुख्याधिकारी तुकाराम कदम, स्वीप कक्ष प्रमुख गट विकास अधिकारी उदय जाधव, स्वीप जिल्हा समन्वयक गणेश शिंदे, गट शिक्षणाधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.

****

लेखक हे शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत. मनुष्याचं जीवन सुखी व्हावं असं साहित्य लेखन त्यांनी केलं पाहिजे, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं आहे. नागपूरच्या रेशीम बाग मैदान इथं नागपूर बुक फेस्टिवल सुरू आहे. याअंतर्गत युवा लेखक संवाद कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२८वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाइट तसंच न्यूजऑनएयर मोबाइल ॲपवर प्रसारित केला जाईल.

****

रायगड जिल्ह्यातल्या अलिबागला मुरूड आणि रोह्याशी जोडणाऱ्या रेवदंडा - साळाव पुलाच्या बांधकामाला काल आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते सुरूवात झाली. १२ हजार २५० कोटी रूपये खर्च करून साळाव खाडीवर हा पूल बांधला जात आहे.

****

No comments: