Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 January 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जानेवारी २०२६ सायंकाळी ६.१०
****
· राज्यभरातल्या २९ महापालिकांच्या महापौर पदाचं आरक्षण जाहीर
· मराठवाड्यातल्या पाच पैकी तीन महापालिका महिलांसाठी राखीव
· टीम इंडिया संबोधनावर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
· छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शाळांमध्ये २८ जानेवारीला ‘आरोग्य समुपदेशन कार्यशाळा’
आणि
· येत्या दोन फेब्रुवारीला ११ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन
****
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत
आज काढण्यात आली. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात
ही प्रक्रिया पार पडली, नगरविकास विभागाचे अपर मुख्य
सचिव डॉ. के. एच. गोविंदराज उपस्थित होते. पुढील अडीच वर्षांसाठी विविध प्रवर्गासाठी
महापौर पद आरक्षित झालेल्या महापालिकांची माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -
कल्याण-डोंबिवली महापालिका अनुसूचित जमातीसाठी राखीव असून, ठाणे महापालिका अनुसचित जातीसाठी राखीव झाली आहे.
जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर
आणि अकोला या चार महापालिका मागास प्रवर्ग महिलांसाठी तर पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर. या चार महापालिका नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाली आहे.
सर्वसाधारण गटासाठी असलेल्या पुणे, धुळे, बृहन्मुंबई, नवी मुंबई, मालेगाव, मीरा- भाईंदर, नागपूर
आणि नाशिक या महापालिका सर्वसाधारण महिलांसाठी तर अमरावती, सांगली, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी
आणि वसई-विरार या महापालिका सर्वसाधारण गटासाठी खुल्या आहेत.
मराठवाड्यातल्या पाच महापालिकांपैकी तीन महापालिका महिलांसाठी
राखीव झाल्या आहेत. यामध्ये जालना तसंच लातूर महापालिका अनुसचित जाती महिला प्रवर्गासाठी
तर नांदेड-वाघाळा महापालिका सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाली आहे. छत्रपती संभाजीनगर
आणि परभणी महापालिका सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या आहेत.
****
महापौर पदांच्या आरक्षण सोडतीनंतर सर्वच महानगरपालिकांमध्ये
सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. दरम्यान, मुंबई आणि परभणी इथल्या आरक्षणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसनं
आक्षेप घेतल्याचं वृत्त आहे. आरक्षण सोडत काढण्याचे नियम कुणालाही न सांगता बदलण्यात
आल्याचा दावा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. मुंबईतले गेले दोन
महापौर सर्वसाधारण प्रवर्गातून होते त्यामुळं यंदा ओबीसी किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातल्या
सदस्याला संधी मिळायला हवी होती, अशी मागणी त्यांनी केली.
महापौर पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया, पारदर्शक पद्धतीने पार पाडली नसल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी
केला आहे. ते आज चंद्रपूर इथं बोलत होते. चंद्रपूर महापालिकेत महापौर कोण होणार, याबाबतचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचं, वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
****
राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी
प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली. २७ तारखेला दुपारी
तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप
२७ जानेवारीला प्रसिद्ध होईल. येत्या ५ फेब्रुवारीला मतदान तर मतमोजणी ७ फेब्रुवारीला
होणार आहे.
****
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातल्या
पेण तालुक्यात विकास केंद्र उभारण्यासाठी दावोस इथं विविध जागतिक कंपन्यांसमवेत सामंजस्य
करार केले. तिसरी मुंबई म्हणून संकल्पित असलेला हा प्रकल्प, तंत्रज्ञान,
अर्थतंत्र आणि डेटा सेंटरसाठी अत्याधुनिक केंद्र म्हणून उदयास
येणार आहे. रायगड जिल्हा हा भारताचा पहिला समर्पित जागतिक क्षमता केंद्र म्हणून ओळखला
जाणार आहे. जागतिक कंपन्यांनी या विकास केंद्राला गुंतवणूक आणि प्रमुख व्यवसाय म्हणून
विचारात घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
****
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या क्रिकेट संघाला भारतीय राष्ट्रीय
क्रिकेट संघ किंवा टीम इंडिया असे संबोधण्यास मनाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च
न्यायालयाने फेटाळून लावली आहे. लोकप्रसारक आकाशवाणी आणि दूरदर्शनचे प्रशासकीय संचालन
करणाऱ्या प्रसार भारतीला बीसीसीआयच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया असे संबोधण्यास मनाई
करण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या पीठाने दिल्ली
उच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशाला योग्य ठरवलं आहे.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात
सुरू असलेल्या टी ट्वेटी क्रिकेट मालिकेत दुसरा सामना उद्या रायपूर इथं खेळवला जाणार
आहे.
****
हैदराबाद मुक्ती लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांची
आज पुण्यातिथी. नांदेड इथं
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वामीजींना आदरांजली वाहण्यात आली. विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वामीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करण्यात आलं. विद्यापीठातले अनेक अधिकारी तसंच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या दोन वर्षात
विद्यापीठ निधी तसच पीएम उषा प्रकल्पांतर्गत सुमारे ७७ कोटींच्या पायाभूत सुविधा उभारण्यात
आल्याची माहिती,
कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी दिली आहे. आपल्या पदभाराच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त
ते आज पत्रकारांशी बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित गुणवत्ता आणि दर्जेदार
संशोधनावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं
ते म्हणाले. अनेक शैक्षणिक उपक्रम निर्णय आणि पायाभुत सुविधांचा त्यांनी यावेळी आढावा
घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शंभर किंवा त्यापेक्षा अधिक पटसंख्या
असलेल्या शाळांमध्ये येत्या २८ जानेवारीला ‘आरोग्य समुपदेशन कार्यशाळा’ घेण्यात येणार
आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सकाळी
१० ते ११ या वेळेत होणाऱ्या या उपक्रमात शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर
विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
****
नांदेड–वाघाळा शहर महानगरपालिकेतल्या भारतीय जनता पक्षाच्या
नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक आज पार पडली. या बैठकीत महेश कनकदंडे यांची भाजपच्या
मनपा गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
****
जालना इथं जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली
आज महसूल भवनात विशेष संवाद बैठक घेण्यात आली. महानगरपालिकेच्या नवनर्विाचित सदस्यांचा
परिचय व्हावा आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक सामायिक दृष्टीकोन तयार व्हावा, या उद्देशाने घेण्यात आलेल्या या बैठकीत नवनिर्वाचित सदस्यांनी पाणीपुरवठा, शहर स्वच्छता, रस्ते तसच इतर स्थानिक समस्यांबाबत चर्चा करत त्या सोडवण्यासाठी प्रशासनासोबत समन्वयाने
काम करण्याची ग्वाही दिली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं होणाऱ्या ११ व्या ग्रामीण साहित्य
संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांची निवड करण्यात आली
आहे,
स्वागताध्यक्ष विक्रम काळे तसच संयोजन समितीचे प्राचार्य मधुकर
गायकवाड यांनी ही माहिती दिली. यंदाचं हे एक दिवसीय साहित्य संमेलन २ फेब्रुवारी रोजी
होणार आहे. शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान आणि किसान वाचनालय यांच्या संयुक्त
विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात येतं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या सायगाव इथं विनापरवाना
पिस्तुल वापरुन गोळीबार करणाऱ्या एकाला बर्दापूर पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी
त्याच्याकडून दोन पिस्तुलं, जिवंत काडतुसं आणि एक दुचाकी
असा सुमारे एक लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
****
जागतिक कीर्तीचे ख्यातनाम ढोलकीवादक राजारामभाऊ जामसंडेकर यांचं
आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. उस्ताद झाकिर हुसेन, पंडित भवानी शंकर यांसारख्या कलाकारांसोबत जुगलबंदी वादन करणाऱ्या राजाभाऊंनी हिंदी-
मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक संगीतकारांसोबतही काम केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या बहुचर्चित वस्तु आणि सेवा कर- जीएसटी घोटाळ्याप्रकरणी
तपास करण्यासाठी आज संभाजीनगर इथलं विशेष
पथक दाखल झालं. या तपासाला वेग आला असून लवकरच सविस्तर माहिती उघड होण्याची शक्यता
आहे.
****
आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशचा
संघ भारत दौऱ्यावर येणार नाही. बांगलादेशचे युवक आणि क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी, खेळाडू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ही
माहिती दिली. बांगलादेशी खेळाडूंच्या सुरक्षेबाबतच्या चिंता अद्याप कायम असल्यामुळं
टी-ट्वेन्टी विश्वचषकासाठी बांगलादेशचा क्रिकेट संघ येणार नसल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं
बांगलादेश क्रिकेट मंडळाची भारतातून सामने स्थलांतरित करण्याची मागणी फेटाळून लावत
स्पर्धेचे वेळापत्रक कायम ठेवण्याचा निर्णय कालच जाहीर केला आहे.
****
पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा
पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा मुकाबला आता चीनची चेन यू फेई हिच्याशी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment