Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 22
January 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जानेवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीच्या
आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. मुंबईत मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणीचं
महापौरपद सर्वसाधारण गटासाठी, नांदेडचं महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी, तर जालना आणि लातूरचं महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी
राखीव झालं आहे. नाशिक, नागपूर, वसई विरार, अमरावती, सांगली, सोलापूर या महापालिकांचं महापौरपद सर्वसाधारण गटासाठी, तर मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, पुणे, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, मालेगाव आणि धुळ्याचं महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी
सुटलं आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं महापौरपद अनुसूचित जमाती
साठी, तर ठाण्याचं महापौरपद अनुसूचित जातीसाठी
राखीव झालं आहे. पनवेल, इचलकरंजी, उल्हासनगर, कोल्हापूर महानगरपालिकेचं महापौरपद इतर मागास प्रवर्गासाठी, तर जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोल्याचं महापौरपद इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी
राखीव झालं आहे.
दरम्यान, मुंबई आणि परभणी इथल्या आरक्षणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्ष आणि काँग्रेसनं आक्षेप घेतल्याचं वृत्त आहे.
****
राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठीच्या
निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे
घेता येतील. तीन फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल आणि पाच फेब्रुवारीला
सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडे पाच वाजेदरम्यान मतदान होणार आहे.
****
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातल्या सारंडा जंगलात
आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमधे चकमक झाल्याचं वृत्त आहे. झारखंड पोलिस आणि
कोबरा दल यांच्या संयुक्त मोहिमेत काही ठिकाणी गोळीबार झाला असून, या चकमकीनंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले आहेत. सुरक्षा
दल त्यांचा शोध घेत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी ध्वजवंदनाचा
मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी सव्वा नऊ वाजता आयोजित करण्यात येणार
आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावं, यासाठी या दिवशी सकाळी साडे आठ ते दहा या दरम्यान ध्वजवंदनाचा
किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन
समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी साडे आठ च्या पूर्वी किंवा १० वाजेनंतर
करावा, असं राजशिष्टाचार विभागामार्फत परिपत्रकाद्वारे
कळवण्यात आलं आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात
आली असून, आता जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींची
संख्या ८७५ झाली आहे. शासन राजपत्रात यासंदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत चिखली तालुक्यातल्या ग्रामपंचायत
अंचरवाडीचे विभाजन करून वसंतनगर, आणि मेहकर तालुक्यातल्या ग्रामपंचायत विश्विचं विभाजन करून राजगड
इथं नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण निकषांअंतर्गत लोणार
तालुक्यातल्या पारडाचं विभाजन करून धायफळ, जळगाव जामोद तालुक्यातल्या रसूलपूरचं विभाजन करून वायाळ, तसंच सुनगावचं विभाजन करून चालठाणा खुर्द इथं नवीन ग्रामपंचायती
स्थापन करण्यात आल्या आहेत.
****
नांदेड–वाघाळा शहर महानगरपालिकेतल्या भारतीय जनता पक्षाच्या
नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक आज पार पडली. या बैठकीत महेश कनकदंडे यांची भाजपच्या
मनपा गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी खासदार डॉ.अजित गोपछडे, भाजपचे मराठवाडा विभागीय संघटक संजय कौडगे, नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर उपस्थित होते.
****
बीड जिल्ह्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरु झाली असून, ३० जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. जिल्हाधिकारी
विवेक जॉन्सन यांनी या भरती प्रक्रियेचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं. २२ फेब्रुवारी
रोजी लेखी परीक्षा होणार असून, २४ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. दोन मार्च रोजी या पदासाठीची अंतिम निवड होणार
आहे.
****
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील प्रलंबित प्रश्न, रखडलेली विकासकामं तसंच प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत खासदार बजरंग
सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या शनिवारी २४ तारखेला आढावा बैठक होणार आहे. या
बैठकीत बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत समस्यांवर सखोल
चर्चा करण्यात येणार आहे. रेल्वे गाड्यांचे थांबे, वेळापत्रकातील अडचणी, प्रवासी सुविधांचा अभाव, स्थानकांवरील स्वच्छता, प्रकाशयोजना, सुरक्षितता तसंच अपूर्ण विकासकामं हे प्रमुख मुद्दे बैठकीच्या
अजेंड्यावर आहेत.
****
No comments:
Post a Comment