Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 23 January 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जानेवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
दावोस परिषदेत महाराष्ट्राचे ३० लाख कोटी रुपयांचे करार-
छत्रपती संभाजीनगर इथे ५५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
·
राज्यभरातल्या २९ महापालिकांच्या महापौर पदाचं आरक्षण
जाहीर
·
मराठवाड्यातल्या पाच पैकी तीन महापालिका महिलांसाठी राखीव
·
टीम इंडिया संबोधनावर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने
फेटाळली
आणि
·
परभणीच्या बचत गटाच्या महिलांना प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं
निमंत्रण
****
दावोस परिषदेत
१८ देशातल्या विविध कंपन्यांसोबत सुमारे ३० लाख कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले.
मुख्यमंत्र्यांनी काल दावोस इथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. या गुंतवणुकीत आणखी सात ते दहा लाख कोटी रुपयांची वाढ होईल, असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. ते म्हणाले…
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती
संभाजीनगर इथं ५५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिली. कोकणात साडे तीन लाख कोटी, विदर्भात दोन लाख ७० हजार कोटी तर अहिल्यानगरसह
खानदेशात ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
राज्यातील
२९ महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत काल काढण्यात आली. नगर विकास राज्यमंत्री
माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही प्रक्रिया पार पडली, पुढील अडीच
वर्षांसाठी, विविध प्रवर्गाकरता महापौर पद आरक्षित झालेल्या महापालिकांची
माहिती, आमच्या प्रतिनिधीकडून:
बाईट-मनपा
“कल्याण-डोंबिवली महापालिका
अनुसूचित जमातीसाठी राखीव असून, ठाणे महापालिका अनुसचित जातीसाठी राखीव झाली आहे.
जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर
आणि अकोला या चार महापालिका मागास प्रवर्ग महिलांसाठी तर पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर. या चार महापालिका नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाली आहे.
सर्वसाधारण गटासाठी असलेल्या पुणे, धुळे, बृहन्मुंबई, नवी मुंबई, मालेगाव, मीरा- भाईंदर, नागपूर
आणि नाशिक या महापालिका सर्वसाधारण महिलांसाठी तर अमरावती, सांगली, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी
आणि वसई-विरार या महापालिका सर्वसाधारण गटासाठी खुल्या आहेत.
मराठवाड्यातल्या
पाच महापालिकांपैकी तीन महापालिका महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यामध्ये जालना तसंच
लातूर महापालिका अनुसचित जाती महिला प्रवर्गासाठी तर नांदेड-वाघाळा महापालिका सर्वसाधारण
महिला गटासाठी राखीव झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि परभणी महापालिका सर्वसाधारण प्रवर्गासाठी
खुल्या आहेत.’’
दरम्यान, मुंबई आणि
परभणी इथल्या आरक्षणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसनं आक्षेप
घेतल्याचं वृत्त आहे. आरक्षण सोडत काढण्याचे नियम कुणालाही न सांगता बदलण्यात आल्याचा
दावा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. तर महापौर पदाची आरक्षण सोडत
प्रक्रिया, पारदर्शक पद्धतीने पार पाडली नसल्याचा आरोप काँग्रेस
नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते काल चंद्रपूर इथं बोलत होते.
****
राज्यातल्या
१२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी
अर्जांची छाननी प्रक्रिया काल पार पडली. २७ तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी
अर्ज मागे घेता येतील. उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप २७ जानेवारीलाच प्रसिद्ध
होईल. येत्या ५ फेब्रुवारीला मतदान तर मतमोजणी
७ फेब्रुवारीला होणार आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यातल्या पळसप इथं होणाऱ्या ११ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ
साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे, स्वागताध्यक्ष
विक्रम काळे तसच संयोजन समितीचे प्राचार्य मधुकर गायकवाड यांनी ही माहिती दिली. यंदाचं
हे एक दिवसीय साहित्य संमेलन २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिक्षणमहर्षी वसंतराव काळे
प्रतिष्ठान आणि किसान वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात
येतं.
****
श्री गुरु
तेग बहादूर साहिब यांच्या साडे तीनशेव्या हौतात्त्य सत्संग दिनानिमित्त लातूर जिल्हा
शिक्षण विभागामार्फत ज्ञानप्रकाश शिक्षण संकुलात ‘हिंद दी चादर’ गायन स्पर्धा घेण्यात
आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गीतांमधून गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनातील त्याग, बलिदान आणि
शौर्य यांची प्रभावी मांडणी केली.
दरम्यान, नांदेड इथं
उद्या आणि परवा मोदी मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. भाविकांना कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी
२०० पेक्षा अधिक वाहनांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
****
जनगणनेच्या
पहिल्या टप्प्यासाठीची प्रश्नावली केंद्र सरकारने काल जारी केली. घरांची मोजणी होणाऱ्या
या पहिल्या टप्प्यात नागरिकांना ३३ प्रश्न विचारण्यात येतील. येत्या एक एप्रिलपासून
सुरू होणारा हा पहिला टप्पा ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
****
नेताजी
सुभाषचंद्र बोस यांची जन्मदिवस, पराक्रम दिवस आज साजरा होत आहे. या निमित्तानं
देशभरात सुभाषबाबूंना अभिवादनपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
शिवसेना
पक्षाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शतकपूर्ती जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त मुंबईसह
ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
हैदराबाद
मुक्ती लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यातिथीनिमित्त काल त्यांना
अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वामीजींना
आदरांजली वाहण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वामीजींच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
भारतीय
क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या क्रिकेट संघाला भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ किंवा टीम
इंडिया असं संबोधण्यास मनाई करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शनचं प्रशासकीय संचालन करणाऱ्या प्रसार भारतीला, बीसीसीआयच्या
क्रिकेट संघाला टीम इंडिया असे संबोधण्यास मनाई करण्याची मागणी या याचिकेत करण्यात
आली होती. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची
आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या पीठाने ही मागणी फेटाळून लावत, याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर रोजी दिलेला आदेश, कायम ठेवला आहे.
दरम्यान, भारत आणि
न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी ट्वेटी क्रिकेट मालिकेत दुसरा सामना आज रायपूर
इथं खेळवला जाणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय
टी-ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार नाही.
बांगलादेशचे युवक आणि क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी काल, संघातले खेळाडू
आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
बांगलादेशी खेळाडूंच्या सुरक्षेबाबतच्या चिंता अद्याप कायम असल्यामुळं टी-ट्वेन्टी
विश्वचषकासाठी बांगलादेशचा क्रिकेट संघ येणार नसल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय
क्रिकेट परिषदेनं बांगलादेश क्रिकेट मंडळाची भारतातून सामने स्थलांतरित करण्याची मागणी
फेटाळून लावत या स्पर्धेचे वेळापत्रक कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला आहे.
****
पी व्ही
सिंधू आणि लक्ष्य सेन या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत इंडोनेशिया
मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत
सिंधूचा मुकाबला आता चीनची चेन यू फेई हिच्याशी होणार आहे.
****
७७ व्या
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी
सव्वा नऊ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. एखादे कार्यालय अथवा संस्थेला आपला स्वत:चा
ध्वजवंदन समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो, सकाळी साडे आठपूर्वी किंवा १० वाजेनंतर
करावा, असं राजशिष्टाचार विभागामार्फत परिपत्रकाद्वारे कळवण्यात
आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात
उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या महिलांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात
आलं आहे. गंगाखेड तालुक्यातील मुळी गावच्या महिला बचत गटाच्या कृषी सखी वंदना भोसले
यांचा यात समावेश आहे. वंदना भोसले यांनी आपली निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
त्या म्हणाल्या…
बाईट - वंदना भोसले
या महिलांना
विमानाने दिल्लीला येण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. मानवत तालुक्यात कोल्हा गावातत
उमेद आणि बचत गटांमधल्या समन्वयक म्हणून काम करत असलेल्या भाग्यश्री भिसे यांनी या
संधीबद्दल आकाशवाणीशी बोलतांना आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या…
बाईट - भाग्यश्री
भिसे
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या दोन वर्षात पीएम उषा प्रकल्पांतर्गत सुमारे ७७
कोटींच्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याची माहिती, कुलगुरु डॉ. विजय
फुलारी यांनी दिली. आपल्या पदभाराच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त ते काल पत्रकारांशी बोलत
होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित गुणवत्ता आणि दर्जेदार संशोधनावर भर देण्याचा
प्रयत्न करण्यात येत असल्याचं कुलगुरू फुलारी यांनी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात शंभर किंवा त्यापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये येत्या
२८ जानेवारीला ‘आरोग्य समुपदेशन कार्यशाळा’ घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि
सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम
होत आहे.
****
No comments:
Post a Comment