Friday, 1 March 2019

AIR News Bulletin Aurangabad 01.03.2019 Evining Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 March 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ मार्च २०१९ सायंकाळी ६.००

****

राज्यातल्या पोलीस पाटीलांच्या मानधनात तसंच गृहरक्षक दल - होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय, मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. पोलीस पाटलांचं मानधन आता साडेसहा हजार रुपये, तर होमगार्डना पाचशे सत्तर रुपये कर्तव्यभत्ता मिळेल. या दोन्ही पदांच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा आणि अटल निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धनगर समाजाच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली. या उपसमितीची पहिली बैठक उद्या होणार आहे.

****

महाराष्ट्रात या वर्षी भारनियमन होणार नाही, असं राज्य ऊर्जामंञी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ऊर्जा निर्मितीसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असून, नवीकरणीय ऊर्जेमुळे ऊर्जानिर्मितीत राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सर्वाधिक सुमारे २५ हजार मेगावॅट वीजनिर्मिती झाली होती. यंदा सुमारे सहा लाख कृषी पंपांना सौर ऊर्जेचा पुरवठा केला जाणार असून, पुढच्या पाच वर्षांत ४७ लाख कृषी पंपांना, सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचं उद्दीष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर आणि तारापूर च्या आसपासच्या परिसरात आज भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी तर दुसरा धक्का सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी जाणवला.  या दोन्ही धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे तीन पूर्णांक दोन आणि चार पूर्णांक तीन एवढी नोंदवली गेली. आजचा धक्का, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पापर्यंत बसल्याचं सांगण्यात येत आहे.

****

हुतात्मा निनाद मांडवगणे यांच्या पार्थिव देहावर आज नाशिक इथं, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. निनाद यांना अखेरचा निरोप देण्यासाठी, यावेळी लोकप्रतिनिधी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याच शाळेत दहावीचं परीक्षा केंद्र असावं, या निर्णयाची लातूरात अमंलबजावणी करण्यात आली. लातूर तालुक्यात हंरगुळ या गावी, संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रातल्या तीन विद्यार्थ्यांनी, आज लेखनिकाच्या सहाय्याने दहावीचा पहिला पेपर सोडवला. राज्यातल्या अशा प्रकारच्या या पहिल्या केंद्रावर परीक्षार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आल्यांचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी रेल्वे स्थानकावर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचं आज सकाळी खासदार संजय जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यामध्ये लिफ्ट, सरकता जिना, इलेक्ट्रॉनिक कोच संकेत प्रणाली, नवीन प्रवेश तसंच निकास मार्ग आणि वायफाय सुविधा यांचा समावेश आहे. मुंबई करता नवीन रेल्वे गाडीचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवला असून, अतिरिक्त पादचारी पुलासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.

****

नांदेड इथल्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे वाङ्‌मय पुरस्कार आज जाहीर झाले. प्रसाद बन वाङ्‌मय पुरस्कार लेखक शिरीष कणेकर यांना, तर मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये, सन्मानपत्र, आणि सन्मानचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

यंदाचा प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार 'काहिली' ह्या कादंबरीसाठी प्रा.डॉ. अनंत राऊत यांना आणि 'साहित्यकारण' ह्या समीक्षाग्रंथासाठी प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर यांना देण्यात येणार आहे. प्रत्येकी पाच हजार रूपये रोख, सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या १७ मार्चला नांदेड इथं, हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.

****

स्वच्छता आणि एकता या विषयावर औरंगाबाद इथल्या प्रोझोन मॉलमध्ये, मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. माहिती प्रसारण मंत्रालयाच्या आऊटरिच ब्यूरो विभागाच्या पुणे शाखेनं आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित विषयांवर दृक श्राव्य पद्धतीनं माहिती दिली जाणार आहे. मुलांसाठी प्रश्नमंजुषा तसंच खेळही घेतले जाणार आहेत. हे प्रदर्शन परवा रविवारपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात प्रशासनाने दुष्काळ निवारण योजना तत्काळ सुरू करण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. गंगाखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊन तीन महिने उलटून गेले, तरी उपाय योजना सुरु न केल्यास संघटनेनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 06 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 06 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...