Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 05 March 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v प्लॅस्टिकच्या
निवडणूक प्रचार साहित्यावर बंदी घालण्याची
राष्ट्रीय हरित प्राधिकरणाची
सूचना
v मराठा आरक्षण अहवाल, शास्त्रशुद्ध आणि निर्दोष असल्याची राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही
v महाशिवरात्री पर्व राज्यभरात उत्साहात साजरे
आणि
v भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज नागपूरमध्ये दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना
****
प्लॅस्टिकपासून तयार करण्यात येणाऱ्या सर्व
प्रकारच्या निवडणूक प्रचार साहित्यावर बंदी घालण्याचा विचार
निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं
करावा अशी सूचना, राष्ट्रीय हरित
प्राधिकरणानं केली आहे. निवडणूक
प्रचारा दरम्यान पीव्हीसी
आणि प्लॅस्टिक पासून तयार केलेले फलक आणि अन्य साहित्य वापरण्यावर बंदी घालावी, अशी
मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान प्राधिकरणानं ही सूचना केली आहे.
****
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणा
संदर्भात दिलेला अहवाल हा शास्त्र शुद्ध पद्धतीनं तयार केलेला असून तो निर्दोष आहे,
असं राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. मराठा समाजाला सोळा टक्के
आरक्षण देण्यासंदर्भात आयोगानं या समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा अहवाल सादर
केला होता. या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाच्या विरोधात
दाखल याचिकांच्या सुनावणी दरम्यान काल राज्य सरकारनं हे मत मांडलं.
****
विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींचं
निराकरण कारण्यासाठी, राज्य सरकार, कृषी विद्यापीठांव्यतिरिक्त, इतर सर्व विद्यापीठांमध्ये
लोकपालांची नियुक्ती करणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. ही
नेमणूक येत्या दोन ते तीन महिन्यात केली जाईल, विद्यापीठांमध्ये लोकपालाची नियुक्ती
करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य असेल, असं तावडे यांनी सांगितलं.
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द आपल्यासाठी
अंतिम असल्याचं, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार
रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यातल्या कथित वादासंदर्भात काल जालन्यात, खोतकर यांच्या
निवासस्थानी, सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि खासदार दानवे, यांनी खोतकर यांच्याशी चर्चा
केली, त्यानंतर खोतकर बोलत होते. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं, सुभाष देशमुख यांनी
सांगितलं, तर आपल्यातला वाद मिटला, असं दानवे यांनी स्पष्ट केल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल सकाळी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथे महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं. भव्यता, दिव्यता
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पवित्रता या ठिकाणी अनुभवाला येत आहे, अशी भावना मुख्यमंत्री
फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या
त्र्यंबकेश्वर इथं, भाविकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, वेतन वाढीच्या मागणीसाठी देवस्थानच्या
कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे महाशिवरात्री निमित्त आयोजित जादा कार्यक्रम, देवस्थानाला
रद्द करावे लागल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथं, घृष्णेश्वराचं, बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथाचं, तसंच हिंगोली
जिल्ह्यात औंढा इथं, नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या
रांगा लागल्या होत्या. जालना
तसंच परभणी जिल्ह्यातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
लातूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री
सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवात काल मानाच्या
काठ्या आणि झेंड्यांची मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातही चैतन्यनगर, विष्णूपुरी,
गगनबीड आणि मरळक या प्राचीन महादेव मंदिरांमध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी
दर्शन घेतलं. नांदेडच्या संत पाचलेगावकर मुक्तेश्वर
आश्रमात महाशिवरात्री उत्सवात काल सत्तर जणांनी रक्तदान केलं आणि शंभर व्यक्तींनी अवयवदानाचे
तर सत्तर व्यक्तींनी देहदानाचे संकल्प अर्ज भरून दिल्याचं संयोजकांनी सांगितलं. मध्यरात्री
मुक्तेश्वरास रुद्राभिषेक करण्यात आल्याचं अध्यक्ष सुधाकर टाक धानोरकर यांनी सांगितलं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या
मालिकेतला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज नागपूर इथं होत आहे. भारत या मालिकेत एक-
शून्य असा आघाडीवर आहे.
****
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघादरम्यान सुरू
असलेल्या, टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत, काल गुवाहाटी इथं झालेला पहिला टी ट्वेंटी सामना,
इंग्लडच्या महिला संघानं ४१ धावानं जिंकला. इंग्लडनं प्रथम फलंदाजी करत, भारताच्या
महिला संघासमोर १६१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र भारतीय संघ २० षटकात ६ बाद ११९
धावाच करु शकला.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या
यमगरवाडी इथल्या एकलव्य आश्रम शाळेत काल विज्ञान प्रयोगशाळेचं भूमीपूजन भारतीय जनता
पक्षाचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत झालं. या शाळेच्या माजी
विद्यार्थ्यांचा मेळावाही यावेळी घेण्यात आला.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज होणार आहे. यावेळी
जिल्ह्यातल्या विविध लोकोपयोगी योजना आणि उपक्रमांचं भूमीपूजन तसंच लोकार्पणही होणार आहे.
****
आदिवासी समाजावर वेगळं आरक्षण लादल्यास पक्ष आणि
पदाचाही राजीनामा देईन, असं भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी म्हटलं
आहे. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कुठलाही निर्णय मुख्यमंत्र्यांनी
घेतला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment