Sunday, 24 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.03.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 March 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ मार्च २०१९ दुपारी .०० वा.

****



 भारतात क्षयरोगानं मरण पावणाऱ्या एच.आय.व्ही.ग्रस्त रुग्णांची संख्या २०१७ पर्यंत ८४ टक्क्यांनी घटल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या यू एन एड्स प्रकल्पाच्या अहवालातून समोर आलं आहे. या प्रकल्पात सहभागी २० देशांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आणि आश्वासक असल्याचं, तसंच २०२० च्या उद्दिष्टापेक्षाही ३ वर्षे पुढे असल्याचं सांगण्यात आलं आहे. क्षयरोगानं मरण पावणाऱ्या रुग्णांचं प्रमाण २०२० पर्यंत ७५ टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१० च्या अहवालानुसार जागतिक पातळीवर हे प्रमाण ४२ टक्क्यांनी कमी झालं होतं.

****



 पाकिस्तानात होळीच्या पूर्वसंध्येला दोन हिंदू मुलींचं अपहरण करून, सक्तीनं धर्मांतर करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानाल्या भारतीय उच्चायुक्तांकडे अहवाल मागितला आहे. सिंध प्रांतातल्या घोटकी जिल्ह्याच्या ढार्की गावात ही घटना घडली होती. पाकिस्तानातल्या हिंदू नागरिकांनी धरणे आंदोलने करून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याकडे केली होती. त्यावर धार्मिक अल्पसंख्याकांचं रक्षण करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

****



 जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सुंदरबनी भागातील सीमेलगत पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात जखमी होऊन एका जवानाला वीरमरण आल्याचं वृत्त आहे. यश पॉल असं या जवानाचं नाव असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 ओडिशा विधानसभेचे अध्यक्ष प्रदिप कुमार अमात यांनी बीजू जनता दलाच्या तक्रारीनंतर, पक्षाच्या पाच आमदारांचं सदस्यत्व रद्द केलं आहे. पूर्णचंद्र नाईक, बसंती मलिक, देवराज मोहंती, सुकांत नाईक आणि त्रिनाथ गमांग अशी त्यांची नावं आहेत. या पाचही जणांनी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे आपापले राजीनामे देत, भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

****



 उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षानं आज रामपूर आणि आजमगढ लोकसभा निवडणुकीच्या जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आजमगढ मतदार संघातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधानसभा सदस्य मोहम्मद आजम खान यांना रामपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

****



 इंडोनेशियातल्या सुलावेसी बेटांना आज सकाळी दोन वेळा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. ६ पूर्णांक १ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या भूकंपाचं केंद्र बिटुंग शहराच्या पूर्वोत्तर भागात भूगर्भात ३७ किलोमिटर खोलीवर असल्याचं अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागानं म्हटलं आहे. यात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

****



 पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासह २८ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडे सात वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली. साडे अकरा वाजेपर्यंत दोन टप्प्यांत मिळून २५ पूर्णांक ३७ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या केळणा नदीच्या पात्रात ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असताना, अचानक कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली दबून दोन मुलांचा मृत्यू झाला. योगेश कोंडीबा तराळ आणि अनिकेत विक्रम तराळ अशी मृतांची नावं आहेत. काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातल्या गोकुळ शिवारात ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी शिवारात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एका वन कर्मचाऱ्यासह तीनजण जखमी झाले. काल दुपारी ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 औरंगाबाद जिल्हा कॅरम संघटना आणि क्रीडा भारती यांच्या वतीनं उद्या जिल्हा पातळीवरील कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणारी ही स्पर्धा १२, १४, १८, १९ वर्षांखालील आणि युवा, अशा पाच वयोगटांत खेळवली जाणार असल्याचं संघटनेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...