Tuesday, 26 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.03.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 March 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६  मार्च २०१ सकाळी ७.१० मि.

****



v लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार; राज्यातल्या दहा मतदारसंघाचा समावेश

v पहिल्या टप्प्यात सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज दाखल; आज छाननी

v सत्तेत आल्यास गरीब कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपये किमान उत्पन्न देण्याचं काँग्रेसचं आश्वासन; काँग्रेसची ही योजना म्हणजे धोका असल्याची भारतीय जनता पक्षाची टीका

v अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जाहीरनाम्यात आश्वासन

आणि

v मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची नियुक्ती; वायव्य मुंबई मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाआमदार इम्तियाज जलील एमआयएमचे उमेदवार

****



लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नामांकन दाखल करण्याची मुदत आज संपत आहे. या टप्प्यात १३ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातल्या ९७ मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यात राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद आणि लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि सोलापूर या दहा मतदारसंघाचा समावेश आहे. उद्या नामांकन अर्जांची छाननी होईल तर २९ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील.



दरम्यान, काल पहिल्या टप्प्यातल्या २० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातल्या ९१ मतदार संघात अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. आज या अर्जांची छाननी होईल, गुरूवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. देशभरात ९१ मतदारसंघात पहिल्या टप्प्याचं मतदान ११ एप्रिलला होणार आहे.



 काल अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला तर काँग्रेसचे कार्ति चिदंबरम यांचा समावेश आहे.

****



 राज्यात विदर्भातल्या सात मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे, या सर्व मतदार संघांमध्ये राजकीय पक्षांसह अनेक इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.



 नागपूरमधून भाजप शिवसेना युतीचे नितीन गडकरी यांनी, तर रामटेकमधून कृपाल तुमाने यांनी अर्ज दाखल केला. यवतमाळ - वाशिम मतदार संघातून शिवसेना भाजप युतीच्या खासदार भावना गवळी यांनी, तर प्रहार पक्षाकडून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या वैशाली येडे यांनी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून भाजप नेते निवृत्त उपायुक्त पी बी आडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वर्धा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस, वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी आणि बहुजन समाज पक्षाचे शैलेशकुमार अग्रवाल यांच्यासह अकरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या मतदारसंघातल्या एकूण उमेदवारांची संख्या आता सोळा झाली आहे.



 अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसेना भाजप युतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी अर्ज भरला, वंचित बहुजन आघाडीकडून गुणवंत देवपारे यांनी, तर बहुजन समाज पार्टीचे अरुण वानखेडे यांच्यासह एकूण तेरा उमेदवारांनी काल अमरावती मतदार संघातून अर्ज दाखल केले.



 बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून काल सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार, शिवसेना भाजप युतीचे प्रतापराव जाधव यांनी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे डॉ राजेंद्र शिंगणे यांनी प्रत्येकी चार अर्ज दाखल केले. यासह तीन अपक्ष उमेदवारांनीही काल आपले अर्ज दाखल केले.



 अकोला लोकसभा मतदार संघातून भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांनी तर भाजप शिवसेना युतीचे हंसराज अहीर यांनी चंद्रपूर मतदार संघातून काल उमेदवारी अर्ज दाखल केला. भंडारा -गोंदिया मतदारसंघांतही काल शेवटच्या दिवशी अट्ठावीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

****



 राज्यात इतरही अनेक ठिकाणी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रं दाखल केली. सोलापूर मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीकडून विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांनी तर भाजपकडून डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांनी, नांदेड मतदार संघातून प्रदेश कांग्रेस अध्‍यक्ष अशोक चव्‍हाण यांनी तसंच शिवसेना भाजप युतीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी, लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजप शिवसेना युतीचे सुधाकर श्रृंगारे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के, बहुजन समाज पार्टीचे सिद्धार्थ कुमार दिगंबर सूर्यवंशी, आणि अपक्ष उमेदवार रमेश निवृत्ती कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.



 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातूनही प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज काल दाखल केले. अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर…



उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार ओम प्रकाश  निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील, वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सिद्राम सलगर यांच्यासह अन्य पाच असे सर्व मिळून एकूण आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अन्य अपक्ष उमेदवार किती उमेदवारी अर्ज दाखल करतात त्यावरच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील आखाड्याचं चित्र अवलंबून असणार आहे.

 देविदास पाठक उस्मानाबाद वार्ताहर

 परभणी लोकसभा मतदार संघातून शिवसेना भाजप युतीचे संजय जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान, यांच्यासह दहा जणांनी तर हिंगोली लोकसभा मतदार संघात नऊ उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले.



 बीड इथं, भाजप शिवसेना युतीच्या डॉक्टर प्रितम मुंडे तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी शक्ती प्रदर्शन करत काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या मतदारसंघात आतापर्यंत १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बीड लोकसभा मतदारसंघांत गेल्या साडेचार वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या असून, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याचा दावा ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.

****



         कॉंग्रेस पक्ष सत्तेत आल्यास गरीब वर्गातल्या २० टक्के कुटुंबांना किमान उत्पन्न म्हणून दरवर्षी प्रत्येकी ७२ हजार रुपये देईल, असं आश्वासनं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. काल नवी दिल्ली कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या योजनेतून थेट पाच कोटी कुटुंबांना फायदा होईल, असा दावा त्यांनी केला. पक्षानं अनेक अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही योजना तयार केली असून, ही जगातली सर्वात मोठी किमान उत्पन्न योजना असेल, असंही गांधी म्हणाले.

****



 भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ही योजना म्हणजे एक धोका असून मतदार त्यांच्या या निवडणूक थापेला भूलणार नाही असं म्हटलं आहे. गरिबी हटवण्याच्या खोट्या घोषणा देण्याचा काँग्रेसचा इतिहास असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये गरीब हटावची घोषणा देऊन निवडणूक जिंकली होती, मात्र त्यासाठी कोणतीही कृती केली नाही, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान शेतकरी योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि अन्य योजनांची माहिती दिली.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातल्या शेतकऱ्यांना पूर्णत: कर्जमाफी देण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दिलं आहे. पक्षानं काल आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत तर महासचिव डी पी त्रिपाठी, यांनी नवी दिल्लीत हा जाहीरनामा घोषित केला. “आओ मिलके देश बनाये” हे या जाहीरनाम्याचं घोषवाक्य आहे. शेतकरी, युवक आणि महिलांशी संबंधित मुद्ये तसंच आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन, कामगार आणि कर विषयक कायद्यात दुरूस्ती, आरोग्यविषयक सुविधांचा अधिकार आणि ग्रामीण विकासाबाबतचा पक्षाचा दृष्टीकोन या जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आला आहे. 

****



 काँग्रेस पक्षानं काल लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधल्या एकूण सव्वीस उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये वायव्य मुंबई मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 दरम्यान, मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी निरुपम यांच्या जागी, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांची नियुक्ती पक्षानं केली आहे.



 औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अखिल भारतीय मजलिस ए- इत्तेहाद- उल्- मुस्लिमीन- एमआयएम या पक्षानं आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे. काल रात्री पक्षाच्या हैद्राबाद इथं झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

*****

***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 06 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 06 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...