Monday, 25 March 2019

Tex- AIR News Bulletin Aurangabad 25.03.2019.....20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 March 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ मार्च २०१९ - २०.००

****

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली, उद्या या अर्जांची छाननी होईल, तर २८ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. देशभरात २० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसह ९१ मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. आज देशभरातून अनेक दिग्गजांनी नामनिर्देशन पत्रं दाखल केली. यापैकी, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी कर्नाटकातल्या तुमकूर लोकसभा मतदार संघातून तर नॅशनल कौन्फ्रेन्स चे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा मतदार संघातून, तर काँग्रेसचे कार्ति चिदंबरम यांनी तामिळनाडूत शिवगंगा लोकसभा मतदार संघातून, उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

राज्यात विदर्भातल्या सात मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे, या सर्व मतदार संघांमध्ये आज अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

नागपूरमधून भाजप शिवसेना युतीचे नीतीन गडकरी यांनी, तर रामटेकमकधून कृपाल तुमाने यांनी अर्ज दाखल केला. यवतमाळ - वाशिम मतदार संघातून शिवसेना भाजप युतीच्या खासदार भावना गवळी यांनी, तर प्रहार पक्षाकडून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या वैशाली येडे यांनी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून भाजप नेते निवृत्त उपायुक्त पी बी आडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसेना भाजप युतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी अर्ज भरला, वंचित बहुजन आघाडीकडून गुणवंत देवपारे यांनी, तर बहुजन समाज पार्टीचे अरुण वानखेडे यांच्यासह एकूण तेरा उमेदवारांनी आज अमरावती मतदार संघातून अर्ज दाखल केले.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून आज सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार एक, शिवसेना भाजप युतीचे प्रतापराव जाधव यांनी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे डॉ राजेंद्र शिंगणे यांनी प्रत्येकी चार अर्ज दाखल केले. यासह तीन अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे.

अकोला लोकसभा मतदार संघातून भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांनी तर भाजप शिवसेना युतीचे हंसराज अहीर यांनी चंद्रपूर मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

राज्यात इतरही अनेक ठिकाणी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रं दाखल केली. सोलापूर मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीकडून विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांनी तर भाजप कडून डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांनी भाजपकडून र्ज दाखल केला.

नांदेड मतदार संघातून प्रदेश कांग्रेस अध्‍यक्ष अशोक चव्‍हाण यांनी तसंच शिवसेना भाजप युतीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

लातूर लोकसभा मतदारसंघातून आज चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये भाजप शिवसेना युतीचे सुधाकर श्रृंगारे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के, बहुजन समाज पार्टीचे सिद्धार्थ कुमार दिगंबर सूर्यवंशी, आणि अपक्ष उमेदवार रमेश निवृत्ती कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे राणा जगजितसिंह पाटील, वंचित बहुजन आघाडी चे अर्जुन सलगर यांच्यासह सह एकूण आठ जणांनी आज उस्मानाबाद इथं उमेदवारी अर्ज दाखल केले.



परभणी लोकसभा मतदार संघातून शिवसेना भाजप युतीचे संजय जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान, यांच्यासह दहा जणांनी आज अर्ज दाखल केले.



हिंगोली लोकसभा मतदार संघात आज नऊ उमेदवारांनी १२ नामनिर्देशन पत्रं दाखल केली आहेत, आतापर्यंत एकूण अकरा उमेदवारांची, १६ नामनिर्देशन पत्रं दाखल झाली आहेत.



बीड इथं, भाजप शिवसेना युतीच्या प्रीतम मुंडे यांनी तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं वृत्त आहे. 

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये सर्व अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातल्या शेतकऱ्यांना पूर्णत: कर्जमाफी, तसंच दहशतवाद निर्मुलनासाठी पाकिस्तानसोबत चर्चा, या दोन मुद्यांचा समावेश आहे. दिल्लीत पक्षाचे महासचिव आणि प्रवक्ते डी पी त्रिपाठी, यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली. मुंबईतही पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

****

कॉंग्रेस पक्ष सत्त्तेत आल्यास गरीब वर्गातल्या २० टक्के कुटुंबांना किमान उत्पन्न म्हणून दरवर्षी प्रत्येकी ७२ हजार रुपये देईल, असं आश्वासनं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. आज नवी दिल्ली इथं कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या योजनेतून थेट पाच कोटी कुटुंबांना फायदा होईल, असा दावा त्यांनी केला. पक्षानं अनेक अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही योजना तयार केली असून, ही जगातली सर्वात मोठी किमान उत्पन्न योजना असेल, असंही गांधी म्हणाले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...