Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24
March 2019
Time 20.00
to 20.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मार्च २०१९ - २०.००
****
राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादी
काँग्रेस महाआघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराला आज सातारा जिल्ह्यात कराड इथं प्रारंभ
झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ घेण्यात
आलेली ही सभा सध्या कराडमध्ये सुरू आहे. या सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद
पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख
राजू शेट्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित
आहेत.
शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या
निवडणूक प्रचारालाही आज कोल्हापूरमधून प्रारंभ झाला. ही प्रचार सभाही सध्या कोल्हापूरमध्ये
सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले,
रासपचे मंत्री महादेव जानकर, सदाभाऊ खोत या सभेला उपस्थित आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे
उमेदवार आहेत.
***
काँग्रेस पक्षानं लोकसभेसाठीच्या आणखी दहा उमेदवारांची आज घोषणा केली. यामध्ये
राज्यातल्या चंद्रपूर मतदार संघातला काँग्रेसचा उमेदवार बदलण्यात आला असून आता शिवसेनेतून
काँग्रेसमध्ये दाखल झालेले आमदार सुरेश धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी
या मतदार संघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. अकोला मतदार संघातून
हिदायत पटेल, रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हिंगोली मतदार संघातून माजी खासदार
सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वानखेडे यापूर्वी दोनवेळा याच मतदार
संघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसचा विजय
साकारणारे विद्यमान खासदार राजीव सातव यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर हिंगोली
लोकसभा मतदारसंघात प्रचंड संभ्रमाचे वातावरण पसरले होते. शिवसेनेचे माजी खासदार तथा
भाजप नेते आणि मागील निवडणुकीत काँग्रेसकडून पराभूत झालेले सुभाष वानखेडे यांनाच काँग्रेसकडून
आश्चर्यकारकरित्या उमेदवारी घोषित झाले. मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये यामुळे
गोंधळाचे वातावरण पसरले आहेत. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, काँग्रेसकडून सुभाष वानखेडे
आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड अशी तिरंगी लढत येथे रंगणार आहे. कालपर्यंत एकमेकांच्या
विरोधात लढणाऱ्यांना आता एकमेकांना अलिंगन द्यावे लागणार आहे.
आकाशवणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली.
याशिवाय माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना तामिळनाडूतल्या
शिवगंगा या मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय तारिक अन्वर यांना बिहारमधल्या
कटिहार तर वरिष्ठ नेते बी. के. हरीप्रसाद यांना कर्नाटकातल्या दक्षिण बंगळूर मतदार
संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
***
भारतीय जनता पक्षानं आतापर्यंत लोकसभेसाठी ३०६ उमेदवारांची घोषणा केली आहे.
यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या सर्व मतदार संघांचा समावेश आहे. पक्षानं
आज नऊ लोकसभा मतदारसंघांची यादी घोषित केली असून यात राज्यातल्या भंडारा - गोंदिया
मतदार संघातून सुनील बाबूराव मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय छत्तीसगड
सहा आणि तेलंगणा तसंच मेघालयातल्या प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
***
औरंगाबादचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बंडखोरी करण्याची
गरज नाही. औरंगाबादेतून लढण्याची त्यांची
खरंच इच्छा असेल, तर आपण माघार घ्यायला तयार असल्याचं कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार सुभाष झांबड यांनी आज जाहीर केलं.
जिल्हा समितीकडून लोकसभा निवडणुकीसाठी
आमदार सत्तार यांनीच आपलं नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवलं होतं. पक्षानं त्यांनाही जालना आणि औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघातून
उमेदवारी देऊ केली होती, पण त्यांनी ती नाकारली. मग आता बंडखोरी कशासाठी, असा सवालही त्यांनी माध्यमांशी बोलतांना केला.
****
अहमदनगरचे भारतीय जनता पक्षाचे
विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा
निर्णय घेतला आहे. आज खासदार दिलीप गांधी यांनी अहमदनगर इथं घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या
मेळाव्यात सुवेंद्र गांधी यांनी हा निर्णय जाहीर केला. यामुळे जिल्ह्यात लोकसभेच्या
निवडणुकीत आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
***
No comments:
Post a Comment