Sunday, 3 March 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.03.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 March 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ मार्च २०१९ सायंकाळी ६.००

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या पाटणा शहरातून लोकसभा निवडणुकीसाठीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराला सुरवात केली. तिथल्या गांधी मैदानात घेण्यात आलेल्या संकल्प रॅलीत बोलताना ते म्हणाले, की केंद्र सरकार आणि बिहार सरकार रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक क्षेत्रासह कित्येक बाबतीत एकत्रितरित्या काम करत आहे.

सैन्याचं मनोबल खच्ची होईल आणि शत्रूचा फायदा होईल, अशी विधानं विरोधक का करत आहेत, असा सवालही त्यांनी केला. यावेळी संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लोक जनशक्ति पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही विरोधकांवर टीका केली. यानंतर पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातल्या अमेठी इथं ५३८ कोटी रुपये निधीच्या विकासकामांचा प्रारंभ केला. त्यानंतर गौरीगंज इथं आयोजित सभेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

****

उत्‍तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाशिवरात्री निमित्त उद्या कुंभमेळ्यातलं शेवटचं शाही स्नान होणार आहे. यात्रेकरू भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेत, प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. आतापर्यंत सुमारे २२ कोटी भाविकांनी इथं भेट देऊन त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. १५ जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कुंभमेळ्याच्या पवित्र पर्वाला सुरवात झाली होती.

****

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मंगळवारी पॅराग्वे आणि कोस्टा रिका या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते पॅराग्वेचे राष्ट्रपती मारियो आब्दो बेनिटेज, उपराष्ट्रपती ह्यूगो वेलाजक्वेज, कोस्टारिकाचे राष्ट्रपती कारलोस अल्वारैडो क्वेसाडा, उपराष्ट्रपती एप्सी कैंपबेल बर्र यांच्यासह व्यावसायिकांच्या आणि तिथं स्थायिक भारतीयांच्या भेटी घेतील. दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक, माहिती आणि दळणवळण, शिक्षण, आरोग्य आणि नवीकरणीय उर्जेशी संबंधित बाबींवर यावेळी चर्चा केली जाईल, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्र आणि राज्य सरकारनं सुरू केलेल्या आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांद्वारे राज्यातल्या ९० टक्के लोकांना आरोग्य विम्याचं संरक्षण मिळालं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पालघर इथं आज अटल आरोग्य महाशिबिराचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. अटल आरोग्य शिबीर खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहचवणारं शिबिर आहे, असंही ते म्हणाले.

****

जालना पोलीस दलातल्या दोन अधिकाऱ्यांसह सहा कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी आज तडकाफडकी निलंबित केलं, तर एका पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी सहकार्य केल्याचं चौकशी अहवालात निष्पन्न झालं होतं. या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी सांगितलं. सहायक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, कॉन्स्टेबल रामेश्वर जाधव, कपील जाधव, इंद्रजित काळेबाग, संतोष सावंत, सदाशिव राठोड, रामप्रसाद पहुरे अशी निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावं आहेत.

****

औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा बाजारतळासमोर दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. मोहसीन युसूफ अत्तार असं मृताचं नावं असून, त्याच्या सोबत असलेला साहिल सुभान अत्तार गंभीर जखमी झाला आहे. चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली.

****

लातूर इथल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बल्गेरियातील रूस इथं झालेल्या डॅन कोलोव्ह-निकोल पेट्रोव्ह स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी दोन सुवर्णपदकांसह चार पदकं जिंकली आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...