Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 July 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जुलै २०२० सायंकाळी ६.००
****
**कोरोना विषाणुच्या रुग्णांसाठी
खाटांची संख्या वाढवा - शरद पवार यांची सूचना
**कोरोना विषाणू मृत्यू दर
एक टक्क्यांहून खाली आणणार - मंत्री राजेश टोपे यांची माहिती
**बीडमधे कोरोना विषाणुचे
सात नवे रुग्ण
आणि
** देशातल्या पहिल्या न्यायिक `ई गव्हर्नन्स` केंद्राचं नाशिकमधे लोकार्पण
****
कोरोना विषाणुच्या रुग्ण संख्येत ऑगस्ट महिन्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता
औरंगाबाद मधील खाटांची संख्या वाढवण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी आज कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री
राजेश टोपे आणि जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. त्यानंतर
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसहभागातून या संकटावर मात करता येईल असं त्यांनी
यावेळी नमुद केलं. ते म्हणाले…
हे जे कोरोनाचे संकट
आहे त्यामध्ये आपल्याला यश यायचं असेल तर लोकांचा सहभाग पाहिजे. आज लोकांचा सहभाग मिळतो
आहे तो अधिक मिळायला पाहिजे.ज्या ज्या काळी सूचना आहेत त्यांची तंतोतंत अंमलबजावणी
करायला लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. डिस्टंन्स ठेवण्याची, गर्दी न करण्याची या सगळ्या
बाबतीत सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आज औरंगाबाद शहर आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी
लोकांची सहकार्याची भूमिका आहे. आणि हे आपण असचं चालू ठेवलं तर या संकटावर आपण नक्कीच
मात करु.
शासकीय यंत्रणेच्या आवाहनानुसार खाजगी डॉक्टरांनीही या संसर्गाचा सामना करण्यासाठी
सेवा देण्याचं आवाहन पवार यांनी यावेळी केलं. पवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालयाला कोरोना विषाणुच्या रुग्णांसाठी `रेमडेसिवीर इंजेक्शन` अधिष्ठाता डॉ.
कानन येळीकर यांच्याकडे सुपुर्द केली.
दरम्यान, भारतीय जैन संघटना आणि औरंगाबाद महापालिकेतर्फे शहर कोरोना विषाणुमुक्त
करून मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी 'मिशन झिरो - औरंगाबाद' या उपक्रमाचं लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते आज
करण्यात आलं. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रतिबंधित क्षेत्रात फिरत्या रुग्णालयांमार्फत
तपासणी मोहिम राबवण्यात येणार आहे.
****
कोरोना विषाणुच्या रुग्णांचा मृत्यू दर एक टक्क्याहून खाली आणण्याचं उद्दिष्ट केंद्र
सरकारनं दिलं असून त्यानुसार राज्याची आरोग्य यंत्रणा काम करत असल्याचं आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्याचा मृत्यूदर सध्या
तीन पूर्णांक पाच टक्के असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शंभर रुग्णांच्या चाचणीमधे
२६ रुग्णांना कोरोना विषाणुची लागण असल्याचं पुर्वी समोर येत होतं, आता शंभरमधील अकरा
रुग्णांना याची लागण होत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं टोपे म्हणाले. अत्याधुनिक रुग्णालयांमधे
डॉक्टरांची संख्या वाढवून कोरोना विषाणुच्या रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या
सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. अतिदक्षता विभागात लक्षणं नसणाऱ्या
रुग्णांना दाखल करु नये, राज्यासाठी ५०० नविन रुग्णवाहिका आणि मराठवाडा वैधानिक विकास
मंडळाच्या माध्यमातून प्रलंबित ६० रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी
सांगितलं. औरंगाबाद शहरात उभारण्यात येणाऱ्या महिला आणि बालकांसाठीच्या २०० खाटांच्या
रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न सुटला असल्याचं मंत्री टोपे म्हणाले.
****
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मध्ये आज कोरोना
विषाणू बाधित सहा रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यामधे शहरातल्या कृष्णा नगर
इथला ५० वर्षीय पुरुष, मुकुंदवाडी संघर्ष नगर इथल्या ८८
वर्षीय आणि जालान नगर इथल्या ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जालना इथल्या २५ वर्षीय
पुरुष रुग्णाचाही औरंगाबादमधे उपचार सुरू
असताना मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ४३७
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
बीड जिल्ह्यात आज
कोरोना विषाणू बाधित सात नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामधे बीड शहरातल्या सहा आणि अंबाजोगाई इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यातल्या कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या आता ५२४ झाली आहे.
****
कोरोना विषाणुच्या
वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहर आणि लगतच्या तीन किलो मीटर परिसरातील
संचारबंदीत येत्या सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी
दिपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली आहे. उद्या मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी
लागू होती, त्यात आता आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान,
गंगाखेड इथं आज औषध विक्रेते आणि किराना व्यापाऱ्यांच्या तत्काळ तपासणीमधे तेरा जणांना
कोरोना विषाणुची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
कोरोना विषाणुवरील उपचारांसाठी
लागणाऱ्या `रेमडेसीवर` आणि `टोसीलीझुमॅब` या
औषधांच्या वापराबद्दल `कोरोना कृतीदलाच्या` माध्यमातून निश्चित असं मार्गदर्शन होणं आवश्यक असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहून विनंती केली
आहे. या औषधांची मागणी वाढली असून तुलनेनं पुरवठा कमी झाला आहे, ही औषधं कोणत्या परिस्थीतीत द्यावीत, दोन्ही औषधं
एकाच वेळी देता येतात का, याबाबत मार्गदर्शनासाठी या कृती
दलाला निर्देश द्यावे, असं मंत्री डॉ.शिंगणे यांनी यात म्हटलं
आहे.
****
देशातल्या पहिल्या
न्यायिक `ई गव्हर्नन्स` केंद्राचा आज
नाशिकच्या न्यायालयात शुभारंभ करण्यात आला. ऑनलाईन
पध्दतीने झालेल्या या कार्यक्रमात `ई` न्यायालयाचं उदघाटन सर्वोच्च न्यायालयाच्या ई- समितीचे अध्यक्ष न्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचुड
यांनी केलं. नाशिकचे `ई-गर्व्हनन्स` केंद्र देशभरात आदर्श ठरेल, असा विश्वास न्यायमूर्ती
चंद्रचुड यांनी यावेळी व्यक्त केला. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सध्याच्या टाळेबंदीच्या काळात
न्यायदानाचं काम रखडू नये या उद्देशानं
ही आधुनिक न्याय यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
****
राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या एका नेत्याच्या संस्थेची
`ऑनलाईन` जाहिरातींसाठी निवड केली होती, असं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकीय कारणांमुळं ही निवड केली होती असं सुचवनं दिशाभूल
करणारं आणि चुकीचं असल्याचंही या अधिकाऱ्यांनी आज एका निवेदनात नमूद केलं आहे. निवडणुकीसंबंधी
`ऑनलाईन` जाहिराती देण्यासाठी भाजपच्या एका नेत्याच्या संस्थेची निवड राज्याच्या मुख्य
निवडणूक अधिकाऱ्यांनी केली होती, असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी
केला होता. राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे एखाद्या संस्थेची
निवडणूक जनजागृतीसाठी ठरल्याप्रमाणं निवड केली जाते, असंही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी
म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणुच्या रुग्णाला अधिकचा खर्च लावल्याच्या
आरोपांवरुन ठाण्यातल्या एका खासगी रुग्णालयाचा परवाना एक महिन्यासाठी रद्द करण्यात
आला असून या रुग्णालयाची कोरोना विषाणू उपचारांसाठीचं रुग्णालय ही मान्यता काढून घेण्यात
आली आहे. ठाणे महापालिकेनं रुग्णालयाची देयकं तपासण्यासाठी तयार केलेल्या लेखापरिक्षा
समितीला पंधरा रुग्णालयांनी २७ लाख रुपयांपर्यंत अधिक देयकं आकारल्याचं समोर आलं आहे.
उर्वरित रुग्णालयांप्रकरणी अशीच कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त
संदीप माळवी यांनी दिली आहे.
****
औरंगाबादच्या कोरोना विषाणू संसर्गाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक शहरात
दाखल झालं आहे. या पथकानं आज शहरातल्या पुंडलिक नगर, हनुमान नगर या कोरोना विषाणू बाधित
क्षेत्रांची पाहणी केली. या पथकात सनदी अधिकारी कुणाल कुमार यांच्यासह नागपूर इथल्या
`एम्स` रुग्णालयातील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे
यांनी या पथकाला माहीती दिली.
****
औरंगाबाद शहरातल्या विविध भागात महापालिकेच्या वतीनं जलद चाचणी करण्यात येत आहेत.
शहरातल्या इटखेडा इथं आज या चाचणी शिबीरात तुर्की इथल्या परदेशी नागरिकानं तपासणी करून
घेतली.
****
धुळे शहरात वेगानं वाढत असलेल्या कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून तीन दिवसांची जनता
संचारबंदी पाळण्यात येत आहे. नागरिकांनी य संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
असून सर्व दुकानं, व्यवसाय कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात
काल एकाच दिवशी कोरोना विषाणुचे १२७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
धुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या दोन हजार ४१९ इतकी झाली आहे.
****
सिधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली शहरात कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळलेला पूर्ण परिसर प्रतिबंधित न करता फक्त रुग्णाचं घर प्रतिबंधित
करण्याचा प्रस्ताव असल्याचं नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी म्हटलं आहे. जिहाधिकारी शहरातल्या
कोरोना विषाणू बाधित घरांची पाहणी केल्यानंतर ते यासंदर्भात निर्णय देणार असल्याचं
नलावडे यांनी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पाची १९ दारं आज २०
सेंटीमीटरनं उघडण्यात आली असून ४५
हजार प्रति घन मीटर वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातल्या नदी काठाच्या १९
गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या मोठ्या तीन प्रकल्पांपैकी एक असलेल्या
खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत २७६ मिली
मीटर पावसाची नोंद झाली आहे.
//***********//
No comments:
Post a Comment