Thursday, 30 July 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.07.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ९६ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यात महानगरपालिका हद्दीतल्या २३ आणि ग्रामीण भागातल्या ७३ रूग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात तीन हजार ५१८ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णांची एकूण संख्या तेरा हजार सहाशे बासष्ट झाली आहे.

****

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या योजनांमधे गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध विभागानं कडक करावाई सुरु केली आहे. अशा दोन प्रकरणांचीसीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

****

मराठी अभिनेता आशुतोष भाकरे यांनी काल नांदेड इथं राहत्या घरी आत्महत्या केली, ते ३५ वर्षांचे होते. आशुतोष यांनी “भाकर”, “ईचार केला पक्का” या चित्रपटात काम केलं आहे. मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिचे ते पती होत.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात काल जोरदार पाऊस झाल्यामुळे तालुक्यातल्या लिंबाळा इथल्या ओढ्याला पूर आला आहे.

लातूर जिल्ह्यात कालपर्यंत २२ पूर्णांक ३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या ४८ पूर्णांक ७९ टक्के इतका पाऊस झाला आहे.

जालना तसंच औरंगाबाद जिल्ह्यातही काल अनेक भागात पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात पैठणखेडा - चितेगाव रस्त्यावकोल्ही नदीच्या पुलावरुन जाताना दोन युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. स्थानिक नागरीक आणि बिडकीन पोलीस रात्री उशीरापर्यंत या दोघांचा शोध घेत होते.

****

जालना इथल्या महावितरणच्या ग्रामीण शाखेचा कनिष्ठ अभियंता नूर मोहम्मद सिद्दीकी याला दोन हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहाथ पकडण्यात आलं. तक्रारदारानं आपल्या मालकीच्या जागेवरील विद्युत खांब विनापरवानगी हटवल्यामुळे त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अभियंता सिद्दीकी यानं ही लाच मागितली होती.

****

परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पाच ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यंवशी यांनी केलं आहे.

****

No comments: