Monday, 27 July 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 26 JULY 2020 TIME 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 July 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जुलै २०२० सायंकाळी ६.००
****
** राम मंदिर उभारणीचा प्रारंभ `ई भूमी पूजनानं` व्हावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
** औरंगाबादमधे कोरोना विषाणुचे नवे ४६ रुग्ण, पाच रुग्णांचा मृत्यू
** कोरोना विषाणुचे जालन्यात ८६ तर परभणीत सात नवे रुग्ण
आणि
** गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या बंदला नागरिकांचा विरोध
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर राम मंदिर उभारणीला दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे `ई` भूमी पूजनानं प्रारंभ होऊ शकतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. लाखो राम भक्तांना तिथं जाण्यापासून रोखता येईल काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. हा एक आनंदाचा प्रसंग असून लाखो लोकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामधे रस असेल मात्र, आपण कोरोना विषाणुचा संसर्ग वाढू द्यायचा काय, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पाच ऑगस्ट रोजी राम मंदिर उभारणीला प्रारंभ करण्यासाठी अयोध्येला जाण्याची शक्यता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र प्रतिष्ठाननं व्यक्त केली आहे. राम मंदिर मुद्द्याला संघर्षाची पार्श्र्वभूमी आहे, हे सर्वसामान्य मंदिर नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आपण कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करत आहोत आणि धार्मिक मेळाव्यांवर बंदी असल्याचं त्यांनी या संदर्भात नमुद केलं. गेल्या वेळी आपण आयोध्येला गेलो तेंव्हा या विषाणूचा संसर्ग नुकताच सुरू झाला असल्यानं आपल्याला शरयू नदीकिनारी आरती करण्यापासून रोखण्यात आलं होतं, अशी आठवण त्यांनी सांगितली. राज्यातली महा विकास आघाडी तीन पक्षांची असली तरी सरकार आपल्या ठाम नियंत्रणातलं असून विरोधकांनी ते पाडून दाखवावं, असं आव्हान मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिलं.
**** 
औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारच्या सत्रात कोरोना विषाणुचे १२ नवे रुग्ण आढळले. सकाळच्या सत्रातल्या ३४ आणि दुपारच्या सत्रातल्या १२ अश्या आज दिवसभरात आढळलेल्या ४६ रुग्णांमुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता १२ हजार नऊशे चोपन्न झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५ रुग्णांचा आज मृत्यु झाला असून यात जालान नगर, इसारवाडी, गणेश कॉलनी, उस्मानपुरा या परिसरातल्या प्रत्येकी एका पुरुष रुग्णाचा तर  पंढरपूर-वाळूज या परिसरातल्या एका महिला रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबादमधले ८ हजार एकशे एकोणसाठ रुग्ण बरे झाले आहेत तर आतापर्यंत ४४२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात सध्या ४ हजार तीनशे त्रेपन्न रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना जिल्ह्यात आज कोरोना विषाणुचे ८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात जालना शहरातल्या ४७, ग्रामीण भागातल्या ३८ आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेडा इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या आता १ हजार ८५० झाली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड मधल्या कोद्री रस्त्यावर उभारण्यात आलेल्या कोरोना विषाणू केंद्रानं केलेल्या तात्काळ तपासणीत आज सात जणांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. उपजिल्हा रुग्णालयानं आज केलेल्या ४७५ व्यापाऱ्यांच्या तात्काळ चाचण्यांमधे हे सात रुग्ण आढळले.
****
मुंबई तसंच नोयडा आणि कोलकाता इथं कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठीच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेचं लोकार्पण, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे हे लोकार्पण होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसंच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यात सहभागी होणार आहेत. एका दिवसात दहा हजारांहून अधिक नमुन्यांच्या तपासणी या प्रयोगशाळांद्वारे शक्य होणार असल्याचं पंतप्रधानांच्या कार्यालयानं म्हटलं आहे.
****
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढत चाललेला कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात या रुग्णांसाठी दहा हजारांहून अधिक खाटांची सोय करण्यात येणार असून त्यासाठी, जिल्हा प्रशासनानं वेगानं तयारी सुरु केली असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलं आहे. सध्या जिल्हाभरात ७ हजार पाचशे खाटा उपलब्ध असून, उर्वरित खाटांसाठी जिल्ह्यातली मंगल कार्यालयं तसंच शासकीय तंत्रनिकेतनच्या मोकळ्या जागांचा विचार सुरु असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणुच्या रुग्णांसाठी सर्व सुविधांसह नव्यानं तयार करण्यात आलेल्या १२० खाटांच्या विभागाचं उद्घाटन पालकमंञी दत्ताञय भरणे, आमदार प्रणिती शिंदे तसंच आमदार यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आलं. शासकीय रुग्णालयातल्या अतिदक्षता कक्षात लवकरच २० खाटांची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
अहमदनगर जिल्ह्यातले कोरोना विषाणुचे ४६५ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार नऊशे पंचेचाळीस रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. दरम्यान गेल्या २४ तासात अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणुचे ६४ नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता ३ हजार एकशे बत्तीस झाली आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार एकशे छत्तीस रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
राज्यात यावर्षी पणन विभागानं २१९ कोटी एकोनपन्नास लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून गेल्या दहा वर्षातली ही विक्रमी खरेदी असल्याचं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यात २०१९-२०च्या हंगामात ४४ लाख ३० हजार हेक्टर कापसाची लागवड झाली. पर्जन्यमान सामान्य झाल्यामुळे कापसाचं विक्रमी पीक झालं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कापसाच्या दरामुळे देशाअंतर्गत आणि राज्यांतर्गत कापसाचे दर कमी होत गेले. सातत्यानं कापसाचे पडणारे दर तसंच कोरोना विषाणूचा राज्यात वाढता प्रादुर्भाव आणि वस्त्रोद्योगावर त्याच्या प्रभावामुळे बाजारपेठेमधे खाजगी खरेदीदारांची संख्या कमी होत गेली, असंही सहकार मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बुलडाणा जिल्ह्यामध्ये २१ ऑगस्टपर्यंत टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. टाळेबंदी वाढवण्यासोबतच दर शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता कडक संचारबंदी लावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची काल आणि आजही कडक अंमलबजावणी करण्यात आली. संचारबंदीच्या या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या जवळपास १०० पेक्षा अधिक व्यक्तींवर पोलिस प्रशासनानं कारवाई केली आहे.
****
`प्रधानमंत्री पिक विमा` भरण्यास येत्या ३१ तारखेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी विलंब न करता जवळच्या बँकेत किंवा पोर्टलवर पिक विमा भरण्यास प्राधान्य देवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केलं आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्यात `ई - परवान्याचा` घोटाळा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांकडून अधिक रक्कम घेऊन बेकायदेशीररित्या हे दोघे या परवान्याचा काळाबाजार करत होते. त्यांनी आतापर्यंत किती जणांना पास दिला आहे याचा तपास पोलीस करत आहेत. 
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या नागरिकांनी गावांमधे फलक लावून घोषणा देत नक्षलवाद्यांनी येत्या मंगळवारपासून पुकारलेल्या बंद - सप्ताहाला विरोध दर्शवला आहे. नक्षलवादी या काळात येत्या तीन ऑगस्ट पर्यंत मृत नक्षलवाद्यांची स्मारकं बांधून श्रद्धांजली अर्पण करतात.
एटापल्ली तलुक्यातल्या गट्टा-जांभिया, हेडरी, भामरागड तालुक्यातलं कोठी, कोरची तालुक्यातल्या गॅरापत्ती आदी गावांमधे हा विरोध दर्शवण्यात आला आहे. नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांची हत्या केली असल्यानं याला विरोध असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या हुलजंती इथले सैनिक नागप्पा सोमन्ना म्हेत्रे  यांना जम्मू काश्मिरमधे कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलं. ते ३४ वर्षांचे होते. छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे काल रात्री जम्मू काश्मीरमधल्या इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आलं होतं.
****
जायकवाडी धरणाच्या सिंचन व्यवस्थापनासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्‍याबाबतचं धोरण शेतकरी विरोधी आणि लोककल्याणकारी राज्याच्या लौकीकास बाधा आणणारं असल्यानं याची अंमलबजावणी करू नये, असं माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि महाराष्‍ट्र जलसंपत्‍ती नियमन प्राधिकरणाला पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे. पाणी व्यवस्थापना, पाणी पट्टीची आकारणी तसंच वसुली खासगी कंत्राटदाराकडे दिल्‍यास शेतकऱ्यांकडून कठोर पध्‍दतीनं सक्‍तीची वसुली केली जाईल अशी शक्यताही त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
****
पैठणमधल्या जायकवाडी जलाशय प्रकल्पातलं बंद पडलेलं भुकंप मापन यंत्र तात्काळ सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, या संघटनांनी केली आहे. हे भुकंप मापन यंत्र १९९४ साली कार्यान्वित करण्यात आलं होतं. दोन वर्षांपासून हे यंत्र बंद पडलं आहे. या संबंधी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ प्रशासनानं चौकशी करावी, अशी मागणी संघटनेनं केली आहे.
****



No comments: