Wednesday, 29 July 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.07.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
राज्यात दहावीचा निकाल ९५ पूर्णांक ३० शतांश टक्के लागला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यामध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८ पूर्णांक ७७ शतांश टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ९२ टक्के लागला आहे. लातूर विभागातली ९३ पूर्णांक शून्य तीन शतांश टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींचं उर्त्तीण होण्याचं प्रमाण अधिक आहे. मुलांचा निकाल ९३ पूर्णांक ९९ शतांश टक्के तर मुलींचा निकाल ९६ पूर्णांक ९१ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आता एक वाजेनंतर मंडळाच्या ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमएएच रिझल्ट डॉट एनआयसी डॉट इन’या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. गुण पडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर उत्तरपत्रिकांच्या छायांकितप्रती साठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याचं, शिक्षण मंडळातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा येत्या ४ ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहेत. कोविड संदर्भात सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करून या शाळा सुरू होणार आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू असताना, चंद्रपूर तसंच गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त भागात ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. वर्गात विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसवण्याची व्यवस्था, संपूर्ण शाळेचं निर्जंतुकीकरण तसंच मास्क आणि सॅनिटाइझरच्या वापराची खबरदारी घेण्यात येणार आहे. याबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचं, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
****
देशात कोविड बाधितांची संख्या १५ लाखांवर पोहोचली आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासात देशभरात कोरोना विषाणू संसर्ग झालेले ४८ हजार ५१३ नवे रुग्ण सापडले, त्यामुळे आता देशातली कोविड बाधितांची संख्या १५ लाख ३१ हजार ६६९ झाली आहे. यापैकी ९ लाख ८८ हजार २९ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले असून, सध्या देशात ५ लाख ९ हजार ४४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ६४ पूर्णांक ५१ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ३४ हजार १९३ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. मृतांचं हे प्रमाण दोन पूर्णांक २३ शतांश टक्के असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, कालपर्यंत देशभरात एक कोटी ७७ लाख ४३ हजार ७४० कोविड नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद-आय सी एम आरनं दिली आहे. सध्या एक हजार ३१६ प्रयोगशाळांमधून कोविड संसर्ग चाचण्या केल्या जात आहेत. यापैकी ९०६ सरकारी प्रयोगशाळा तर ४१० खासगी प्रयोगशाळा आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ७१ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. यात महानगरपालिका हद्दीतल्या ३० आणि ग्रामीण भागातल्या ४१ रूग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात अँटीजन चाचणीद्वारे निदान झालेल्या ३८ रूग्णांचा यात समावेश आहे.  जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या तेरा हजार ४४० झाली आहे आतापर्यंत नऊ हजार ३३८ रूग्ण बरे झाले आहेत. तर ४६२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीन हजार ६४० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल चार कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समता नगर, शिक्षक कॉलनीतील ५८ वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील 59 वर्षीय पुरूष, रोशन गेट इथल्या ७० वर्षीय पुरूष आणि फाजलपुऱ्यातील ४६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
लातूर इथं आज सकाळी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या नातेवाईकाने एक डॉक्टरवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टर गंभीररित्या जखमी झाले. शहरातल्या अल्फा रुग्णालयात हा प्रकार घडला असून सध्या या डॉक्टरांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, लातूर इथल्या सर्व डॉक्टरांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. दोषींवर तातडीनं कारवाईची मागणी या डॉक्टरांनी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज लातूर इथले सर्व डॉक्टर्स आपली सेवा बंद ठेवणार असून फक्त अत्यावश्यक उपचारांची तातडीची गरज असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचं, या डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण २९१ कोविडग्रस्तांना कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यासोबतच जिल्ह्यात आता कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या दोन हजार सातशे नऊ झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भेदक मारक क्षमता असलेली अत्याधुनिक बनावटीची राफेल विमानं आज भारतात दाखल होत आहेत. फ्रान्सकडून खरेदी केलेल्या ३६ विमानांपैकी पाच विमानांचा पहिला ताफा आज दुपारच्या सुमारास हरियाणात अंबाला इथं हवाई दलाच्या तळावर उतरणार आहे.
****

No comments: