Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६
जुलै
२०२० सकाळी ७.१० मि.
*****
·
कोरोना
विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
पहिली ते बारावीसाठीचा अभ्यासक्रम
२५ टक्क्यांनी कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
·
टाळेबंदी पूर्णपणे उठवण्यात
येणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण
· औरंगाबाद
मधल्या रुग्ण खाटांची संख्या वाढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार
शरद पवार यांची सूचना
· राज्यात आणखी नऊ हजार २५१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद, २७५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
· औरंगाबादमध्ये
सहा, लातूर तीन, नांदेड दोन तर हिंगोली, जालना, परभणी आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी
एका रुग्णाचा मृत्यू तर बीड जिल्ह्यात ३२ नवे रुग्ण
· कोरोना विषाणूच्या रुग्णाकडून जास्तीचं देयक आकारल्यावरुन
ठाण्यातल्या एका खासगी
रुग्णालयाचा परवाना एक महिन्यासाठी रद्द
आणि
·
विधानसभा निवडणुकीत जाहिराती संदर्भातल्या
कामासाठीच्या कंपनीची माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं निवड केल्याचं राज्य निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी, इयत्ता पहिली ते बारावी साठीचा अभ्यासक्रम, सुमारे २५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय, राज्य
सरकारनं घेतला आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अशा आशयाच्या प्रस्तावाला,
शासनानं मान्यता दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
शाळा जरी बंद असल्यातरी शिक्षण सुरु राहिलं पाहिजे.या
उपक्रमाच्या अंतर्गत आपण विविध माध्यमातून शिक्षणाचे मार्ग उपलब्ध करुन देत आहोत.परंतू
फिजीकली शाळा अजूनही सुरु झालेल्या नाही आहेत.आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या मनामध्ये
तनाव राहू नये, विद्याथर्यांना दडपण येवू नये. त्यादृष्टीकोनातून शाळेय शिक्षण विभागाच्या
माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०२० -२१ साठी कोविड - १९ या विषाणूच्या प्रार्दुभावाच्या
पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते बारावीचा पाठ्यक्रम कमी करण्यासंदर्भामध्ये शासनानं
निर्णय घेतलेला आहे.
यानिर्णयानुसार, अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक
स्तरावरील २२ माध्यमिक २० आणि उच्च माध्यमिक स्तरावरील ५९ अशा एकूण १०१ विषयांचा इयत्तानिहाय, विषयनिहाय, २५
टक्के पाठ्यक्रम कमी केला आहे. कमी केलेल्या पाठ्यक्रमामध्ये
भाषा विषयात काही गद्य आणि पद्य पाठ आणि त्यावरील स्वाध्याय कृती वगळल्या आहेत.
त्यामुळे २०२० - २१ मधील अंतर्गत मूल्यमापन किंवा
वार्षिक परीक्षांमध्ये या घटकांवर कोणतेही प्रश्न विचारले जाऊ नयेत, असे राज्य शैक्षणिक
आणि संशोधन परिषदेनं स्पष्ट केलं आहे. मात्र, भाषा विषयातील वगळलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण आणि भाषिक कौशल्य वगळले
नसल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सुरू असलेली टाळेबंदी केवळ आर्थिक
प्रश्र्न सोडवण्याकरता पूर्णपणे उठवण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
म्हटलं आहे. या संसर्गामुळे निर्माण झालेली आव्हानं लक्षात घेता आरोग्य आणि अर्थव्यवस्थेमधे
योग्य समतोल साधण्याची गरज असल्याचं त्यांनी एका मुलाखती दरम्यान नमूद केलं. टाळेबंदी
पूर्णपणे उठवली जाणार नसली तरी आपण काही गोष्टी टप्याटप्यानं सुरू करत असल्याचं ते
म्हणाले. एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद करता येणार नसल्यानं आपण टप्प्याटप्प्यात
उपाय योजत असल्याचं ते म्हणाले.
****
कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत ऑगस्ट महिन्यात वाढ होण्याची
शक्यता लक्षात घेता औरंगाबाद मधल्या रुग्ण खाटांची संख्या वाढवण्याची सूचना राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. पवार यांनी काल औरंगाबाद
इथं कोरोना विषाणू परिस्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधी
यावेळी उपस्थित होते. लोकसहभागातून या संकटावर मात करता येईल असं पवार यांनी यावेळी
नमूद केलं. ते म्हणाले…
हे जे कोरोनाचे संकट आहे त्यामध्ये आपल्याला
यश यायचं असेल तर लोकांचा सहभाग पाहिजे. आज लोकांचा सहभाग मिळतो आहे तो अधिक मिळायला
पाहिजे.ज्या ज्या काही सूचना आहेत त्यांची तंतोतंत अंमलबजावणी करायला लोकांनी सहकार्य
केलं पाहिजे.डिस्टंन्स ठेवण्याची, गर्दी न करण्याच्या संबंधीच्या या सगळ्या बाबतीत
सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आज औरंगाबाद शहर आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी लोकांची
सहकार्याची भूमिका आहे. आणि हे आपण असचं चालू ठेवलं तर या संकटावर आपण नक्कीच मात करु.
शासकीय यंत्रणेच्या आवाहनानुसार खाजगी डॉक्टरांनीही या संसर्गाचा
सामना करण्यासाठी सेवा देण्याचं आवाहन पवार यांनी केलं.
कोरोना विषाणूच्या रुग्णांचा मृत्यू दर एक टक्क्याहून खाली आणण्याचं
उद्दिष्ट केंद्र सरकारनं दिलं असून त्यानुसार राज्याची आरोग्य यंत्रणा काम करत असल्याचं
आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितलं. अत्याधुनिक रुग्णालयांमधे डॉक्टरांची संख्या
वाढवून कोरोना विषाणुच्या रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात
आल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले....
कोविडच्या हद्दिपर्यंत आपण एक पॅरलल व्यवस्था केली
आहे आणि ती व्यवस्था अशी की कलेक्टरला पूर्ण अधिकार दिलेले आहेत की त्यांनी शंभर टक्के
पोस्ट भरल्या पाहिजेत.जे रेग्यूलर पोस्ट आम्ही भरुन घेत आहोत.आज क्राँट्रक्चुअल भरावं
जर असं असेल की एनएचएम डिपार्टमेंट काही आणि महापालिका त्याठिकाणी सुपर स्पेशॅलिटी
मध्ये डॉक्टरची उपलब्धता वाढवून कोविडच्या पेशंटला आयएमसच्या डॉक्टर कडून पॉपरली सेवा
उपलब्ध करुन द्यावी.
अतिदक्षता विभागात लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना दाखल करु नये,
राज्यासाठी ५०० नवीन रुग्णवाहिका आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून
प्रलंबित ६० रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. औरंगाबाद शहरात
महिला आणि बालकांसाठी उभारण्यात येणाऱ्या २०० खाटांच्या रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न
सुटला असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.
****
दरम्यान, पवार यांच्या हस्ते यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालयाला कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांसाठी `रेमडेसिवीर इंजेक्शन` सुपुर्द
करण्यात आले.
भारतीय जैन संघटना आणि औरंगाबाद महापालिकेतर्फे शहर कोरोना विषाणुमुक्त
करून मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी 'मिशन झिरो - औरंगाबाद' या उपक्रमाचं लोकार्पण शरद
पवार यांच्या हस्ते झालं. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रतिबंधित क्षेत्रात फिरत्या
रुग्णालयांमार्फत तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
****
राज्यात काल आणखी नऊ हजार २५१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या तीन लाख ६६ हजार ३६८ झाली आहे. काल
२७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं मृत्यू
झालेल्यांची संख्या १३ हजार ३८९ झाली आहे. तर काल सात हजार २२७ रुग्ण बरे झाल्यानं
त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत दोन लाख सात हजार १९४ रुग्ण
कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४५ हजार ७८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात आतापर्यंत १८ लाख ३६ हजार ९२० चाचण्या करण्यात आल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला. यामध्ये कृष्णा नगरमधल्या ५० वर्षीय,
मुकुंदवाडीमधल्या ८८ वर्षीय, जालान नगरमधल्या ७५
वर्षीय, वैजापूरमधल्या ५५ वर्षीय, पुरुष
रुग्णांसह कन्नड तालुक्यातल्या चापानेर मधल्या ६० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
जालना इथल्या २५ वर्षीय तरुणाचाही काल औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू
झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४३७ जणांचा मृत्यू
झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी २३७
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली. शहरात तपासणी नाक्यासह विविध ठिकाणी काल चार
हजार ७३३ अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात
८४ जण कोरोना विषाणू बाधित आढळले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १२ हजार ९०८ झाली आहे. तर काल ४०६ जणांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार १५९ रुग्ण बरे झाले असून, सध्या चार हजार ३१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला. यामध्ये लातूर शहरातल्या ८० वर्षीय पुरुष रुग्णांसह लातूर इथल्या ५२ वर्षीय आणि
उदगीर इथल्या ६२ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत
७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात काल आणखी ४४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळले. जिल्ह्यात काल ७३ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी १४ जण बाधित आढळून
आले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार ४९३ झाली आहे. त्यापैकी ८८६ रुग्ण
बरे झाले असून, सध्या ५१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला. यामध्ये देगलूर तालुक्यातल्या मुक्रमाबाद इथल्या
६५ वर्षीय, आणि नांदेड शहरातल्या ५० वर्षीय पुरूष रूग्णांचा समावेश
आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं ५६ जणांचा मृत्यू
झाला आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात काल आणखी
८३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये नांदेड शहरातले
३३, मुखेड तालुक्यातले २९, देगलूर आणि धर्माबाद
प्रत्येकी सहा, बिलोली, नांदेड आणि हदगाव
तालुक्यात प्रत्येकी दोन, तर भोकर, उमरी
आणि नायगाव इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्ण संख्या एक हजार २५२ झाली आहे. तर काल १९ रुग्ण बरे
झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ६७२
रुग्ण बरे झाले असून, सध्या ५१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या लिंबाळा इथल्या ८० वर्षीय रुग्णाचा काल
कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या आजारानं मृत्यू झालेल्यांची
एकूण संख्या सहा झाली आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात काल आणखी २३ कोरोना विषाणू बाधित
रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ५५६ झाली आहे. त्यापैकी ३५८ रुग्ण
बरे झाले असून, सध्या १९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना शहरातल्या ४७ वर्षीय पुरुषाचा काल कोरोना विषाणू संसर्गामुळे
मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या आजारामुळे मृतांची एकूण संख्या ५९ झाली आहे. दरम्यान,
जालना जिल्ह्यात काल ६८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये जालना शहरातल्या
३५, ग्रामीण भागातल्या ३१ आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातल्या पळसखेड चक्का इथल्या दोन रुग्णांचा समावेश
आहे. जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या एक हजार ७६४ झाली आहे. उपचारानंतर कोरोना
विषाणूमुक्त झालेल्या १०३ रुग्णांना काल सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एक
हजार १५५ रुग्ण बरे झाले असून, सध्या ५१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरखेडा इथल्या ७५ वर्षीय पुरुषाचा
काल कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं ३५ जणांचा
मृत्यू झाला आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी १४ कोरोना विषाणू बाधित
रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातले आठ, वाशी इथले तीन, तर कळंब, लोहारा आणि
भूम इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ६३३ झाली आहे. त्यापैकी
४१४ रुग्ण बरे झाले असून, सध्या १८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या ५५ वर्षीय कोरोना विषाणू
बाधित रुग्णाचा काल औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी १७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली. यामध्ये सेलू सहा, गंगाखेड तालुक्यातले नऊ, तर परभणी इथले दोन रुग्ण आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ४९८ झाली आहे. तर काल १२ रुग्णांना बरे झाल्यानं
घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत २३३ रुग्ण बरे झाले असून, सध्या २४४ रुग्णालयात
उपचार सुरु आहेत.
दरम्यान, गंगाखेड इथं काल औषध विक्रेते आणि किराणा व्यापाऱ्यांची
अँटिजेन चाचणी करण्यात आली, त्यामध्ये १३ जण बाधित आढळले. कोरोना
विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड शहर आणि लगतच्या तीन किलोमीटर परिसरातल्या
संचारबंदीत उद्या सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी ३२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड आणि परळी शहरातल्या प्रत्येकी १२, गेवराई
सहा तर अंबाजोगाई आणि पाटोदा इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या
एकूण रुग्णांची संख्या ५४९ झाली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा
वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी शाळांमध्ये कोविड रुग्णालय उभारण्यात येणार
आहे.
****
मुंबईत काल एक हजार ९० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल दोन हजार
८९१ नवे रुग्ण, तर ४७ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात काल ६१२ रुग्ण आढळले, तर १५ जणांचा मृत्यू
झाला. रायगड जिल्ह्यात ४५२, सातारा १२५,
सांगली ९५, गडचिरोली ६९, अमरावती ५४, वाशिम ३०, तर सिंधुदुर्ग
जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा ६७वा भाग असेल. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
कोरोना विषाणूच्या रुग्णाकडून जास्तीचं देयक आकारल्यावरुन ठाण्यातल्या एका खासगी रुग्णालयाचा परवाना
एक महिन्यासाठी रद्द करण्यात आला असून, या रुग्णालयाची कोविड रुग्णालयाची मान्यता मान्यता
काढून घेण्यात आली आहे. ठाणे महापालिकेनं रुग्णालयाची देयकं तपासण्यासाठी तयार केलेल्या
लेखापरीक्षण समितीला पंधरा रुग्णालयांनी २७ लाख रुपयांपर्यंत अधिक देयकं आकारल्याचं
समोर आलं आहे. उर्वरित रुग्णालयांप्रकरणी अशीच कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे
उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू परिस्थितीचा काल
केंद्रीय पथकानं आढावा घेतला. पथकाचे प्रमुख कुणाल कुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करुन
कोरोना विषाणूवर नियंत्रणासाठी सविस्तर मार्गदर्शन केलं. तसंच जिल्हा आणि महानगरपालिका
प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचं
त्यांनी कौतुक केलं. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यावर अधिक
भर देण्यात यावा, असं त्यांनी यावेळी सूचित केलं. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी
लोकांच्या मनातली भिती दूर करणं आवश्यक असून, यासाठी जनजागृती करण्याबरोबरच संवाद अतिशय
महत्त्वाचा असल्याचं कुमार म्हणाले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यातली कोरोना
विषाणूबाबतची एकंदरीत स्थिती, करण्यात आलेल्या उपाययोजना आणि त्यातून मिळालेलं यश याची
सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
****
नव्यानं
निवडून आलेले काही संसद सदस्य तसंच
विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातली
शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते किंवा आराध्य व्यक्तींची नावं जोडून शपथ
घेतात. यामुळे सर्व संबंधितांसाठी निश्चित मार्गदर्शक सूचना किंवा
आचारसंहिता ठरवून द्यावी, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली
आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला
यांना याबाबत पत्रं पाठवून राज्यपालांनी ही मागणी
केली आहे. या सारख्या प्रकारांमुळे शपथविधी प्रक्रियेचं
गांभिर्य कमी होतं,
असं त्यांनी या
पत्रात नमूद केलं आहे.
****
राज्यात २०१९ ला
झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या ऑनलाईन जाहिराती संदर्भातल्या
कामासाठी, राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयानं भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या कंपनीची नियुक्ती केल्याचा आरोप, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. संबंधित कंपनीला हे
काम देण्यात राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाची कोणतीही भूमिका नव्हती, राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं या कंपनीची नियुक्ती केली
होती, असं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. २०१९ च्या विधानसभा
निवडणुकीत ऑनलाईन जाहिरातींचं काम भाजपाशी संबंधित कंपनीला दिल्याचा आरोप काँग्रेस
नेते पृथ्वीराज चव्हाण आणि माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केला होता, या आरोपावर निवडणूक कार्यालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातल्या पुढील सुनावणीच्या
अनुषंगानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल यासंदर्भातली मंत्रीमंडळ उपसमिती तसंच
मराठा आरक्षण लढ्यातल्या विविध मान्यवरांशी संवाद साधला. न्यायालयीन कामकाजासंदर्भात
चर्चा करून सुनावणीसाठी योग्य त्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईमध्ये कोविड रुग्णालयात
उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सेवक आणि सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतून एम्प्लॉई ऑफ द वीक हा उपक्रम सुरु
करण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोविड योद्ध्याचा काल
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या जिल्हाधिकारी
कार्यालयात मोठ्या लवाजम्यासह आणि मास्क न वापरता आढावा बैठक घेणारे पालकमंत्री नवाब
मलिक यांच्याविरूद्धही महसूल आणि पोलिस प्रशासनानं गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माजी
मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींना
ध्वनिचित्रफीत पाठवली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह वारंवार संचारबंदीच्या निर्णयाविरोधात
प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या एका शिष्टमंडळासह आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला
गेलो असता, आपल्यावर गर्दी जमवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली, मग पालकमंत्र्यांवरही
कारवाई करायला हवी, असं लोणीकर यांनी म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात बकरी ईदनिमित्ताने यंदा प्रतिकात्मकरित्या कुर्बानी
करावी असं आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केलं आहे. कोवीड १९ मुळे उदभवलेल्या
परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असून, बकरी ईदची नमाज मशीद,
ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी, असं जिल्हाधिकाऱ्यांनी
जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
नागपंचमीचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यात सावरगाव इथं
श्री नागोबा मंदिरात नागपंचमीनिमीत्त पूजा करण्यात आली. इतरत्र बहुतांश ठिकाणी नागरिकांनी विशेषत: महिला वर्गानं कागदारवरच्या
नागाच्या चित्राची किंवा प्रतिकात्मक नागप्रतिमेची पूजा करून हा सण साजरा केला.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पातला पाणीसाठा सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत गेल्यानं
खबरदारीचा उपाय म्हणून, धरणाचे १९ दरवाजे उघडले असून, ४५ हजार घनफूट
प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे. त्यामुळे, प्रशासनाने नदी काठच्या
१९ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत
२७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण
भागामध्ये दररोज किमान एक हजार अँटीजेन चाचण्या करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
जिल्ह्यामध्ये अँटीजेन चाचण्यांसाठी आणखी दहा हजार किटसची मागणी करण्यात आली
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक लाख ५१ हजार
वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष
रमेश कराड यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत
खरीप पिकांचा पिक विमा भरण्यासाठी जिल्ह्यातले सर्व आपले सरकार सेवा केंद्र २४ तास
सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत. पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.
//**********//
No comments:
Post a Comment