Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५
जुलै
२०२० सकाळी ७.१० मि.
·
कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारला पदवीच्या अंतिम वर्षाच्या
परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नाही - विद्यापीठ अनुदान आयोगाचं मुंबई उच्च न्यायालयात
शपथपत्र.
·
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा वाढवाव्यात
- मुख्यमंत्र्यांची सूचना.
·
राज्यात कोविडग्रस्तांची संख्या ३लाख ५७ हजार ११७; रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे
५६ टक्के.
·
औरंगाबाद इथं सहा, नांदेड एक तर परभणी जिल्ह्यात दोन रुग्णांचा काल मृत्यू.
·
लातूर जिल्ह्यात ७०, बीड ३७, हिंगोलीत २७ तर उस्मानाबाद जिल्ह्यात १८ नवे कोविडरुग्ण.
·
परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात दोन दिवस तर लातूर जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पुन्हा
टाळेबंदी.
·
उच्च शिक्षणाच्या नियोजनासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 'कृती
दल'स्थापन.
·
लातूर इथं एकाचवेळी ७३ जणांचा प्लाझ्मा दानाचा संकल्प.
आणि
·
बीड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह सापडला, दोघांचा
शोध सुरू.
****
कोविड १९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारला पदवी परीक्षेच्या अंतिम
वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं काल मुंबई
उच्च न्यायालयात सांगितलं. पुण्यातील सेवानिवृत्त शिक्षक आणि माजी विद्यापीठ सिनेट
सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरूद्ध
याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी विद्यापीठ अनुदान आयोगानं शपथपत्र दाखल केलं आहे.
साथ रोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्य सरकारला अंतिम वर्षाच्या परीक्षा
रद्द करण्याचा अधिकार असल्याचं सांगत राज्य सरकारनं या परीक्षा रद्द केल्या होत्या.
मात्र हे कायदे, विद्यापीठ अनुदान आयोग नियमन कायद्यासारख्या दुसऱ्या विशेष कायद्यातल्या
वैधानिक तरतुदींना आव्हान देऊ शकत नसल्याचा युक्तीवाद विद्यापीठ अनुदान आयोगानं केला
आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरांच्या तुलनेत कमी सुविधा असलेल्या
ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या
आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्त कृती दलाचे डॉक्टर आणि मुंबईतल्या राज्य कृती दलाच्या
डॉक्टरांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी काल संवाद साधला, त्यावेळी
ते बोलत होते. कोविड संसर्ग निदानासाठी मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर
आणणं हे एकमेव उद्दिष्ट असल्याचं, ते म्हणाले. सर्व जिल्ह्यांत उपचारांमध्ये एकसूत्रीपणा
आणि समानता असणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कृती दलाचे प्रमुख डॉ.संजय
ओक यांनीही यावेळी डॉक्टरांना मार्गदर्शन केलं.
****
कोविड १९च्या प्रादुर्भावाच्या काळात आगामी स्वातंत्र्य दिन साधेपणानं साजरा
करण्याबाबतच्या विशेष मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारनं जारी केल्या आहेत. स्वातंत्र्य
दिन समारंभात गर्दी न करणं, सुरक्षित अंतराचं पालन करणं अनिवार्य असल्याचं यात म्हटलं
आहे.
दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा मुख्य सोहळा यावर्षी साधेपणानं
साजरा होणार आहे. फक्त पंतप्रधानांचं राष्ट्राला संबोधन, मानवंदना, ध्वजारोहण, राष्ट्रगीत
याच कार्यक्रमांचा या समारोहात समावेश असेल. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार
यासारखे कोविड योद्धे, त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ या समारंभात निमंत्रित असतील.
****
कोरोना विषाणूची स्थिती गंभीर असून या संकटाशी सामना करण्यासाठी राज्य शासन
सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं
आहे. ते काल नाशिक इथं कोरोना विषाणू संसर्ग स्थितीचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहरांशी
बोलत होते. खासगी डॉक्टर उपचारासाठी शासनाला सहकार्य करत नसतील तर त्यांना आपत्ती व्यवस्थापन
कायदा लागू करण्याचे आदेश दिल्याचं पवार यांनी सांगितलं. आरोग्य मंत्री राजेश टोपे
यावेळी उपस्थित होते. खासगी रुग्णालयांमध्ये अवास्तव शुल्क आकारल्याच्या तक्रारींवर,
खासगी रुग्णालयात दोन अधिकारी नियुक्त केले जातील आणि त्यांच्याकडून देयकांची तपासणी
करूनच ती रूग्णांना दिली जातील असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, आज औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई
यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, आरोग्यमंत्री
राजेश टोपे आणि जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर आढवा बैठक होणार आहे.
****
राज्यात काल आणखी नऊ हजार ६१५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे
राज्यातली एकूण रुग्णसंख्या तीन लाख ५७ हजार ११७ झाली आहे. दरम्यान, काल पाच हजार ७१४
रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत एक लाख ९९
हजार ९६७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५६ टक्के
इतका झाला आहे. सध्या एक लाख ४४ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल २७८ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं, राज्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची
संख्या १३ हजार १३२ झाली आहे.
****
औरंगाबाद इथं काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये संघर्ष
नगरातल्या ५५ वर्षीय, हर्सूल इथल्या ६० वर्षीय, हर्सुल टी पॉंईट इथला ७४ वर्षीय, घाटी
निवासस्थानातल्या ५७ वर्षीय, हडकोतल्या ७६ वर्षीय आणि क्रांती नगर इथल्या ६७ वर्षीय
पुरूष रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल दिवसभरात ३२४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले.
यात महापालिका हद्दीतल्या ७४, ग्रामीण भागातल्या ८९ आणि शहरातल्या प्रवेश नाक्यावरील
जलद चाचणीत आढळलेल्या ४९ रुग्णांसह नमुने संकलन करणाऱ्या फिरत्या केंद्रांच्या तपासणीत
आढळलेल्या १०९ रुग्णांचा समोवश आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची
संख्या आता १२ हजार ६७१ झाली आहे. त्यापैकी सात हजार १७८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले
आहेत. तर सध्या चार हजार ८२७ जणांवर उपचार सुरु आहेत. ५७५ रुग्णांची प्रकृती बरी झाल्यानं
काल त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
नांदेड शहरातल्या गोवर्धन घाट रोड इथल्या ६७ वर्षीय कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा
काल मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या ५४ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ३९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार १६९ झाली आहे. तर काल ४३ रुग्ण बरे होऊन घरी
परतले. जिल्ह्यात आतापर्यंत ६५३ रुग्ण बरे झाले असून, सध्या ४५१ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत. भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांना कोरोना विषाणूची
लागण झाली आहे. साले यांनी काल ही माहिती दिली.
****
परभणी जिल्ह्यात काल दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. यापैकी एक ५० वर्षीय
कोविडग्रस्त परभणी शहरात फिरोज टॉकीज परिसरातला तर दुसरा ५२ वर्षीय रुग्ण पूर्णा शहरातला
रहिवासी आहे. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात काल आणखी २३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये
गंगाखेड शहरात दहा, परभणी शहरात आठ, पाथरी तीन, धारखेड दोन, तर जिंतूर इथला एक रुग्ण
आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या ४८१ झाली आहे. तर काल पाच रुग्ण बरे
झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी ७० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णासंख्या एक हजार ४३१ झाली आहे. त्यापैकी ७९७ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत
७१ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ५६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येनं ५०० चा आकडा पार केला
आहे. काल आणखी ३७ रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ५१७ इतकी झाली आहे.
काल आढळलेल्या रुग्णांमध्ये बीड शहरात १५, परळी ११, अंबाजोगाई सहा, गेवराई चार, तर
केज मधला एक रुग्ण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२५ रुग्ण बरे झाले असून, सध्या २५६ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
जालना
जिल्ह्यात काल आणखी २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातली एकूण बाधितांची
संख्या एक हजार ९९६ झाली आहे. तर आतापर्यंत ५८ जणांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला
आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल २७ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये हिंगोली शहरातले
२३, आखाडा बाळापूर इथले तीन, तर वसमत इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातल्या
एकूण रुग्णांची संख्या ५३३ झाली आहे. यापैकी ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. काल २० रुग्ण
बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. सध्या १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी १८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये
तुळजापूर तालुक्यातले नऊ, उस्मानाबाद तालुक्यातले सहा, उमरगा दोन, तर परंडा तालुक्यातल्या
एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या ६१९ झाली आहे.
त्यापैकी ४०० जण बरे झाले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १८५ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद शहरात कोविड संसर्ग चाचण्यांची संख्या सहा पटीनं वाढवल्यानं, संसर्गाचं
निदान लवकर होत असल्याचा दावा, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी केला आहे.
वृत्तसंस्थेला माहिती देताना ते बोलत होते. नुकत्याच संपलेल्या नऊ दिवसांच्या टाळेबंदीच्या
काळात चाचण्यांची संख्या पूर्वीच्या प्रतिदिन सातशे ते आठशेवरून दिवसाकाठी पाच हजारावर
नेल्याचं त्यांनी सांगितलं. पूर्वी दररोज दीडशे ते दोनशे जणांना कोविड संसर्ग झाल्याचं
निदान होत होतं, मात्र चाचण्यांचं प्रमाण वाढवल्यानं गेल्या काही दिवसांपासून रुग्ण
सापडण्याचं प्रमाण सुमारे दीडपटीने वाढल्याची माहितीही त्यांनी दिली. शहरातल्या प्रवेश
नाक्यांवर सध्या बारा वैद्यकीय पथकं तर रेल्वे स्थानकावर दोन पथकं तैनात आहेत. पुढच्या
महिन्यात ही संख्या २१पर्यंत वाढवणार असल्याचं, ते म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यातल्या नागरी भागात काल सायंकाळपासून दोन दिवस संचारबंदीचा आदेश
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केला. काल सायंकाळी पाच वाजेपासून सुरू झालेली
संचारबंदी उद्या रविवारी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. परभणी महानगरपालिका हद्द
आणि लगतचा पाच किलोमीटर परिसर तसंच जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका हद्द आणि त्या लगतच्या
तीन किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू राहणार आहे. या काळात पेट्रोल पंप आणि गॅस
वितरक यांच्यासह दूध विक्रेत्यांना सकाळी सहा ते नऊ या काळात तर केश कर्तनालयांना सकाळी
७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सूट असेल, असं या आदेशात म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात लागू टाळेबंदीचा दुसरा टप्पा आजपासून लागू झाला. मात्र भाजीपाला,
फळे अंडी, बेकरीपदार्थांच्या ठोक आणि किरकोळ विक्रीसाठी आज दुपारी १२ वाजेपर्यत मुभा
देण्यात आली आहे. ३१ जुलै पर्यंत ही टाळेबंदी असून, या काळात अत्यावश्यक सेवा, औषधी
दुकानं सुरु राहणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आज आणि उद्या पुन्हा खाजगी
दुकानं, व्यापारी प्रतिष्ठानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित
क्षेत्र वगळता सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात
नियम आणि अटींसह दुकानं सुरू राहतील असं यासंदर्भातल्या आदेशात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब शहरात आज पाळण्यात येणारी जनता संचारबंदी उद्या
रविवारीही पाळण्यात येणार आहे. शहरातली कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या लक्षात
घेता लोकप्रतिनिधी, व्यापारी आणि प्रशासनानं हा निर्णय घेतला.
****
कोविड19 शी निगडीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण
मंडळानं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वापरलेले मास्क, पीपीई कीट आणि हातमोज्यांचे
तुकडे करुन ते कागदामध्ये ७२ तास गुंडाळून ठेवावेत आणि त्यानंतरच ते फेकून द्यावेत
अशी सूचना मंडळानं केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ६७वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
कोरोना विषाणू संसर्गानंतरच्या काळातल्या उच्च शिक्षणाच्या नियोजनासाठी डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘कृती दला’ची स्थापना करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ.प्रमोद
येवले यांच्या अध्यक्षतेखाली काल या संदर्भात बैठक झाली. प्र-कुलगुरु डॉ.प्रविण वक्ते या कृती दलाचे अध्यक्ष
असून अन्य दहा जणांचा यामध्ये समावेश करण्यात आहे.
****
गेल्या विधानसभा निवडणूक काळात भारतीय निवडणूक आयोगाचं सामाजिक संपर्क माध्यमावरचं
फेसबुक पेज हाताळणाऱ्या कंपनीची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज
चव्हाण यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणाची तातडीनं
सखोल आणि नि:पक्ष चौकशी करण्यात यावी अशी विनंती करणारं पत्र देशाच्या मुख्य निवडणूक
आयुक्तांना पाठवलं असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
****
लातूर इथं ७३ जणांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेऊन संकल्पपत्र भरून दिलं
आहे. कोरोना विषाणू बाधित झाल्यानंतर विलगीकरण कक्षामध्ये असणारे जिल्हा परिषदेचे माजी
उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी दहा दिवसांच्या विलगीकरण कालावधीत असताना, बाधित रुग्णांशी
संपर्क करून प्लाझ्मा देण्यासाठी तयार केल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
प्लाझ्मा थेरपी हा एक उपचार
कोरोना बाधित रुग्णांवर याठिकाणी करण्याची सुरुवात झालेली आहे. आणि त्या प्रतिसादाला
अनुसरुन १३५ रुग्णांना मी त्या ठिकाणी कनव्हेंस केलं. आणि प्लाझ्मा थेरपीच्या बाबतीत
त्या सर्वांना सांगितल्यानंतर १३५ रुग्णांमधल्या ७३ रुग्णांनी स्वत:हून पुढाकार घेत
त्याठिकाणी प्लाझ्मा दान करण्याबाबतचा फॉर्म भरून दिला आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरासह
अन्य तालुक्यात संशयित व्यक्तींच्या ॲन्टीजन चाचणी करता पाच हजार किट्स उपलब्ध झाल्या
आहेत. गंगाखेड शहरातल्या आयोजित स्वागत समारंभातून एकापाठोपाठ एक व्यक्ती कोरोना विषाणू
बाधित आढळल्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब
नागरगोजे यांनी रॅपीड अँन्टीजन चाचणीचा निर्णय घेतला होता.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर भक्त निवासात ३०० खाटांचे
कोविड दक्षता केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी
दिली आहे. या कोविड दक्षता केंद्रामध्ये तुळजापूर आणि परिसरातल्या रुग्णांवर उपचार
केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
कोविडच्या या pandemic च्या काळामधे इथे ३०० खाटांचं
COVID Care Center त्याच्याबद्दल मान्यता घेण्यात आलेली आहे. नगर परिषदेने साफसफाईचं
काम सुरू केलंय. आणि येत्या ८-१० दिवसांमधे साधारण ३०० खाटा तिथे उपलब्ध करून देण्यात
येणार आहेत. ऑक्सिजनच्या माध्यमातनं कोविडच्या या काळामध्ये एक महत्वाची गरज या वास्तूमध्ये
उपलब्ध होणार आहे.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या भक्त निवासात सुपर स्पेशालिटी
दवाखाना उभारण्यासाठी तुळजापूर नगरपालिकेनं ठराव घेऊन मान्यता दिली असल्याची माहिती,
नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली आहे. ते म्हणाले –
गेल्या महिन्यात नगर परिषदेच्या meeting मधे या building
मधे अत्याधुनिक hospital करावं, असा आम्ही सर्वांनुमते ठराव घेतलाय. परंतू प्राधिकरणातून
ही building भक्तनिवासासाठी झालेली होती. तर यासाठी आम्ही ठराव घेऊन आम्ही शासनाला
पाठपुराव्यासाठी पाठवलेला आहे. तो शासनस्तरावर निर्णय घेतला जाईल.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं येत्या पाच ऑगस्टपासून सनथनगर हैदराबाद ते आदर्शनगर दिल्ली
दरम्यान जलद मालगाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून दोन दिवस ही मालगाडी
धावणार आहे. दर बुधवारी सायंकाळी हैदराबाद सुटणारी ही गाडी शुक्रवारी सकाळी दिल्लीत
पोहोचेल. या रेल्वेमुळे छोटे तसंच मध्यम व्यापारी सुद्धा आपला माल रेल्वेनं दिल्लीला
पाठवू शकतील, नांदेड विभागातल्या उद्योजक आणि व्यापाऱ्यांनाही या मालगाडीतून आपला माल
पाठवता येणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात काल सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. औरंगाबाद शहरात काल
संध्याकाळनंतर जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातल्या मोठ्या रस्त्यांवर पाणी साचलं. अनेक
वस्त्यांमध्येही पाणी तुंबलं. सिल्लोड तालुक्यातल्या वाघूर नदीला आलेल्या पुरामुळे
अजिंठा लेणी परिसरातला धबधबा ओसंडून वाहत आहे.
परभणी शहर आणि परिसरात काल दुपारी तर जिल्ह्यात सायंकाळी अनेक भागांत दमदार
पाऊस झाला. नांदेड इथंही काल दुपारनंतर सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या खेळगाव इथं पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या
तिघांपैकी मुलीचा मृतदेह काल सापडला. एक दुचाकीस्वार आणि त्याची दोन मुलं परवा रात्री
पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. दुचाकीस्वार आणि त्याच्या मुलाचा शोध अद्याप सुरू
आहे. जिल्ह्यात परवा रात्री सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
दरम्यान, जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात ऊर्ध्व कुंडलिका धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्यानं या धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली.
त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा
इशारा देण्यात आला आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या गोदावरी नदी पात्रात मुदगल बंधारा
तसंच खडका बंधाऱ्यातून पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील सर्व गावांमधील
ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये असा इशारा तहसीलदार कार्यालयानं दिला आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच वक्र दरवाजे २० सेंटीमीटर म्हणजे
अर्ध्या फुटाहून अधिक उघडण्यात आले असून पूर्णा नदीपात्रात काल सकाळपासून तीन हजार
८०८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या १९
गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
****
नागपंचमीचा सण आज साजरा होत आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या हरंगुळ
आणि सेलू तालुक्यातल्या डिग्रस जहांगीर इथं नागपंचमीनिमीत्त आयोजित यात्रा कोरोना विषाणू
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज या यात्रा भरणार
नाहीत.
****
राज्य विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात मराठवाडा वैधानिक विकास मंडळास मुदतवाढ
देण्याची मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण
भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मंडळाची
मुदत ३० एप्रिलला संपली आहे. त्याला मुदतवाढ द्यावी तसंच १०० कोटी रूपयांची विकास निधी
म्हणून तरतूद करावी, असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत येत्या
३१ जुलैपर्यंत खरीप हंगामातल्या पिकांचा विमा काढून घ्यावा, असं आवाहन जिल्हा कृषी
अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केलं आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ४८ हजार ५७२ हेक्टर
क्षेत्रासाठी पीक विम्याचे चार लाख ३३ हजार ४८४ अर्ज प्राप्त झाल्याचं शिंदे यांनी
सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता
यावं, यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनानं ३१ जुलै पर्यंत सेतू सुविधा केंद्र २४ तास सुरु
ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेड झोन मधल्या सेतू सुविधा केंद्रांना मात्र यातून वगळण्यात
आलं आहे.
****
दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खरीप हंगामातला पीक विमा
भरण्याची मुदत वाढवण्याची मागणी उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कृषीमंत्री
दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
****
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत शिफारस
करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी
केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलं आहे.
****
No comments:
Post a Comment