Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७
जुलै
२०२० सकाळी ७.१० मि.
****
·
मुंबईसह
देशातल्या तीन अत्याधुनिक कोरोना विषाणू चाचणी केंद्रांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उदघाटन.
·
कोरोना
विषाणूचा धोका अजूनही टळलेला नाही, नागरिकांनी सतर्क राहण्याचं पंतप्रधानांचं ‘मन की
बात’ कार्यक्रमाद्वारे आवाहन.
·
टाळेबंदीच्या
काळातही राज्यातल्या साडेसतरा हजारांहून अधिक जणांना मिळाला रोजगार.
·
राज्यात
आणखी नऊ हजार, ४३१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद. २६७ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू.
·
औरंगाबाद
जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू तर, १३० नवे रुग्ण. उस्मानाबादमध्ये तीन, परभणी आणि
लातूरमध्ये प्रत्येकी दोन तर जालना आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू,
बीड जिल्ह्यात ३४ तर हिंगोलीत दोन नवे रुग्ण.
·
दूध
उत्पादकांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य न केल्यानं महायुतीतर्फे एक ऑगस्ट रोजी
राज्यभर आंदोलन.
आणि
·
औरंगाबादच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या एक ऑगस्टपासून ऑनलाईन प्रवेश
प्रक्रिया.
****
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश
आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक अशा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या तीन अत्याधुनिक
चाचणी केंद्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून केलं जाणार आहे. यामध्ये मुंबईच्या राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्था,
नोयडाच्या राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंधक आणि संशोधन संस्था आणि आणि कोलकात्याच्या राष्ट्रीय
पटकी आणि आतड्यासंबंधीचे रोग संस्था या तीन केंद्रांचा यात समावेश आहे. या केंद्रांमुळे
देशातली कोरोना विषाणू संसर्गाची तपासणी क्षमता वाढणार असून लवकर निदान आणि उपचार करायला
मदत होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री
हर्षवर्धन सहभागी होणार आहेत. मुंबईतल्या केंद्रात दिवसाला एक हजार चाचण्या करण्याची
क्षमता आहे. या चाचण्या पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणेद्वारे होणार असल्याने मानवी हस्तक्षेप
कमी होणार असून अचूकता वाढणार आहे. या तपासणी केंद्रांतून कोविड-19 शिवाय हेपेटायटीस
बी, क्षयरोग, हिवताप, डेंग्यू आदी आजारांची तपासणी करता येणार आहे.
****
कोरोना विषाणूचा धोका अजूनही
टळलेला नाही, अनेक ठिकाणी तो वेगानं पसरत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणी प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या
कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधताना बोलत होते. या मालिकेचा काल ६७ वा
भाग प्रसारित झाला. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा
दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, कोरोना विषाणूमुळे
इतर देशांमध्ये झालेल्या मृत्यूंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत याकडेही
लक्ष वेधलं. कोरोना विषाणूच्या काळात देशाच्या विविध भागात होत असलेल्या नवनव्या उपक्रमांचं
त्यांनी यावेळी कौतूक केलं. देशात उत्पादित होत असलेल्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर
करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
देशातच्या सैनिकांच्या मनोबलाचं
खच्चीकरण होईल असं कुठलंही कृत्य न करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधानांनी
काल कारगिल विजय दिनानिमित्त वीर सैनिक आणि वीर मातांना अभिवादन केलं.
येत्या एक ऑगस्ट रोजी लोकमान्य
टिळकांची शंभरावी पुण्यतिथी असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, लोकमान्य टिळकांचं अवघं
आयुष्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक असल्याचं सांगितलं.
****
नाशिक इथल्या महाराष्ट्र
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातल्या विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व
परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.अजित पाठक यांनी
काल ही माहिती दिली. मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठानं यापूर्वी
संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट
केलं.
अंतिम वर्षाच्या परीक्षा
घेण्यात येऊ नये, या मागणीसंदर्भातलं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं या परीक्षेसंदर्भात
न्यायालयाच्या निकालानंतरच निर्णय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत महाराष्ट्र आरोग्य
विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातल्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी,
नर्सिंग, भौतिकोपचार आदी विद्या शाखांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित
करण्यात आल्या आहेत.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे
लागू टाळेबंदीच्या काळातही राज्यातल्या साडेसतरा हजारांहून अधिक जणांना रोजगार मिळाला
आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. गेल्या तीन महिन्यात
कौशल्य विकास विभागानं जिल्हावार २४ ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावे
घेतले होते. तसंच शासनाच्या महास्वयम संकेतस्थळामार्फतही अनेकांनी रोजगारासाठी नोंदणी
केली. आतापर्यंत महास्वयम संकेतस्थळावर राज्यातल्या एक लाख ७२ हजार, १६५ जणांनी नोंदणी
केली असून उद्योगांनी या माहितीचा लाभ घेण्याचं आवाहन मलिक यांनी केलं आहे.
****
राज्यात काल आणखी नऊ हजार
४३१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
तीन लाख ७५ हजार ७९९ झाली आहे. काल २६७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात
या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १३ हजार ६५६ इतकी झाली आहे. तर
काल सहा हजार ४४ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत
दोन लाख १३ हजार २३८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४८ हजार ६०१
रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत १८ लाख ८६ हजार २९६ नागरिकांची कोरोना
विषाणू तपासणी करण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये जालान नगरमधल्या ८० वर्षीय, गणेश
कॉलनीतल्या ७७ वर्षीय, उस्मानपुऱ्यातल्या ६६ वर्षीय, पैठणमधल्या ७० वर्षीय पुरुष रुग्णांसह,
खुलताबाद इथल्या ६० वर्षीय आणि पंढरपूर वाळूज इथल्या ५६ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश
आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या
कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं १३ हजाराचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात आणखी
१३० रुग्णांची भर पडल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १३ हजार ३८ झाली आहे. काल
अँटिजेन चाचणीद्वारे केलेल्या तपासणीत शहरातल्या प्रवेश नाक्यांवर ३७, तर फिरत्या पथकांमधे
४४ बाधित रुग्ण आढळले. तर काल ३७७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार ५३६ रुग्ण बरे झाले असून, सध्या चार हजार
५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल
तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं
३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी
२४ बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद शहरातील १५, उमरगा तालुक्यातील ३, तुळजापूर तालुक्यातील
पाच, तर कळंब इथली बार्शीत उपचार घेत असलेल्या एका ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. उस्मानाबादमध्ये
उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये तीन रुग्ण हे पुणे जिल्ह्यातल्या रुपीनगर निगडीचे
आहेत. याशिवाय तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि मंगरुळ इथल्या प्रत्येकी दोन आणि नळदुर्ग
इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ६५७ झाली आहे.
त्यापैकी ४२२ रुग्ण बरे झाले असून, सध्या १९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल दोन
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं २३ जणांचा
मृत्यू झाला आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात
काल आणखी १७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या
५१७ झाली आहे. तर काल सहा रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत
२३९ रुग्ण बरे झाले असून, सध्या २५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल दोन
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात या आजारानं मृत्यू पावलेल्यांची
संख्या ७४ झाली आहे. जिल्ह्यात काल ६८ नवे रुग्ण आढळले, यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्ण
संख्या एक हजार ५८४ झाली आहे. आतापर्यंत या आजारातून ९६७ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत
जिल्ह्यात १२ हजार ५९१ चाचण्या करण्यात आल्या असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं.
दरम्यान, राज्याचे संसदीय
कार्य, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोना विषाणुची लागण झाली असून,
त्यांच्यावर मुंबईतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपली प्रकृती उत्तम असून,
नागरिकांनी शारीरिक अंतर पाळण्याचं, टाळेबंदीचं काटेकोरपणे पालन करुन स्वतःची काळजी
घ्यावी असं आवाहन बनसोडे यांनी केलं आहे.
****
जालना शहरात गुडलागल्ली भागातल्या
एका ६० वर्षीय पुरुषाचा काल कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात
या संसर्गानं झालेल्या एकूण मृतांची संख्या ६१ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी
१८५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. जालना शहरात करण्यात आलेल्या अँटीजेन
चाचण्यांमध्ये सात जण बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हाजर
९४६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ६७ रुग्णांना काल सुटी देण्यात
आली. जालना जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २२२ रुग्ण बरे झाले असून, सध्या ५७५ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर इथल्या
५० वर्षीय महिलेचा काल कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या
आजाराने ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नांदेड शहरातले ३४, मुखेड १७, हदगाव
तालुक्यातले सहा, देगलूर पाच, धर्माबाद तीन, नायगाव दोन, तर कंधार, बिलोली, भोकर, परभणी
जिल्ह्यातल्या बरबडी, गंगाखेड इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण
बाधितांची संख्या एक हजार ३२४ झाली आहे. तर काल २१ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी
सोडण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ६९३ रुग्ण बरे झाले असून, सध्या ५६२ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल ३४ नवे
कोरोना बाधित रुग्ण आढळले. यात बीड-११, परळीत- १०, गेवराईत-६, अंबाजोगाई- पाच तर माजलगाव
इथं दोन असे रूग्ण आढळून आले. जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या आता ५८३ झाली आहे.
मात्र, यातील पन्नास टक्क्यांहून जास्त रूग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या २८३
रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, या आजारानं जिल्ह्यात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला
आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल दोन
बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सेनगाव येथील एक ५५ वर्षीय महिला तर वसमतच्या गणेश पेठमधील
एका ३२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ५५८
झाली आहे. यापैकी ३६६ रुग्ण बरे झाले आहेत. काल बरे झाल्यामुळे आणखी आठ रुग्णांना घरी
सोडण्यात आलं आहे. विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या तोफखाना इथल्या रहिवाशी असलेल्या
एका रुग्णाचा काल सारीच्या आजारानं मृत्यू झाला.
****
मुंबईत काल आणखी एक हजार
११५ कोरना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५७ जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात ९९२ नव
रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ही ४८ हजार ५७ एवढी झाली आहे. काल
१३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, यामुळे मृतांची संख्या ही एक हजार १६६ एवढी
झाली आहे. नाशिक २१९, पालघर जिल्ह्यात २८६, अहमदनगर ३७९, रत्नागिरी ३७, सांगली ९९,
सातारा १०६, यवतमाळ २५, अमरावती ६२, तर वाशिम जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू
बाधित रुग्ण आढळले.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर विविध सामाजिक माध्यमांद्वारे अफवा पसरवणाऱ्या पाच जणांविरुध्द औरंगाबाद
सायबर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. याशिवाय २२ जणांच्या फेसबुक आणि व्हॉटसअप, ट्वीटर
आणि इन्स्टाग्रामवरील विविध आक्षेपार्ह पोस्टबाबत या माध्यमांना त्या काढून टाकण्याबाबतही
संपर्क करण्यात आला आहे. नागरिकांना चुकीची माहिती मिळाल्यानं त्यांची दिशाभूल होऊन भीतीचं वातावरण तयार होत आहे. त्यामुळे कायदा
आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यानं सायबर पोलीस विभाग सतर्क झाला आहे.
****
राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या
मागण्या मान्य न केल्याने भारतीय जनता पक्ष, रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष आठवले गट,
राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम महायुतीतर्फे एक ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात
येणार आहे. महायुतीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं भाजप प्रदेश
सरचिटणीस उस्मानाबदचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितलं. हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक
पद्धतीनं असेल, असंही महायुतीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना
प्रति लिटर १० रूपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावं, दूध भुकटीच्या
निर्यातीसाठी प्रति किलो ५० रूपये अनुदान द्यावं तसंच गाईच्या दुधाला ३० रूपये दर द्यावा,
आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
****
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या एक ते २० ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन पध्दतीनं प्रवेश
प्रक्रीया राबवली जाणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांनी याबबत
निर्देश दिले आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत
प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीच्या सरासरीनुसार निकाल
तयार करणं सुरु असून विद्यापीठामार्फत पुढील प्रवेशासाठीची प्रक्रीया सुरु करण्यात
येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा
वाढता प्रादुर्भाव पाहता बुलडाणा जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत टाळेबंदी जाहीर करण्यात
आली आहे. टाळेबंदी वाढवण्यासोबतच दर शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता कडक संचारबंदी
लावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कालही कडक अंमलबजावणी करण्यात आली. संचारबंदीच्या
या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या जवळपास १०० पेक्षा अधिक व्यक्तींवर पोलिस प्रशासनानं कारवाई
केली.
****
जायकवाडी धरणाच्या सिंचन
व्यवस्थापनासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्याबाबतचं धोरण शेतकरी विरोधी आणि लोककल्याणकारी
राज्याच्या लौकिकास बाधा आणणारं असल्यानं याची अंमलबजावणी करू नये, असं माजी मंत्री,
आमदार राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत
पाटील आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली
आहे. पाणी व्यवस्थापन, पाणी पट्टीची आकारणी तसंच वसुली खासगी कंत्राटदाराकडे दिल्यास
शेतकऱ्यांकडून कठोर पद्धतीनं सक्तीची वसुली केली जाईल अशी शक्यताही त्यांनी या पत्राद्वारे
व्यक्त केली आहे.
****
पैठणमधल्या जायकवाडी जलाशय
प्रकल्पातलं बंद पडलेलं भूकंप मापन यंत्र तत्काळ सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक
पंचायत, अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, या संघटनांनी केली
आहे. हे भूकंप मापन यंत्र १९९४ साली कार्यान्वित करण्यात आलं होतं. दोन वर्षांपासून
हे यंत्र बंद पडलं आहे. या संबंधी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ प्रशासनानं
चौकशी करावी, अशी मागणी संघटनेनं केली आहे.
****
येत्या एक तारखेला बकरी ईदचा
सण साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन मुस्लिम जमात समितीनं केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात
उमरगा इथल्या मरकज मशिदीत यासंदर्भात काल झालेल्या बैठकीनंतर हे आवाहन समितीनं केलं
आहे. ईदच्या दिवशी कुठंही गर्दी करु नये, प्रशासनानं ठरवून दिलेल्या नियमांचं प्रत्येकानं
पालन करावं आणि कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरीच नमाज अदा करावी असं समितीनं
म्हटलं आहे.
****
कारगिल विजय दिन काल देशभर
साजरा करण्यात आला. या निमित्तानं उस्मानाबाद इथं हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात
आली. शहरातल्या नगरपालिका जवळच्या शहिद स्मारकाला निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे
आणि अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन
केलं.
****
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेअंतर्गत
कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ, समान काम-समान वेतन आणि सेवेत कायम
करण्याच्या मागणीसाठी कास्ट्राईब संघटना मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळवून
देणार असल्याचं आश्वासन संघटनेचे राज्य सहसचिव सुरेश आरगुलवार यांनी दिलं. नांदेड इथं
काल महानगरपालिके अंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविकांची बैठक पार पडली, यावेळी
आरोग्य सेविकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई
इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे
अधिष्ठाता म्हणून डॉक्टर शिवाजी सुक्रे यांना नियुक्त करण्यात आलं आहे. सुक्रे हे नंदुरबार
इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि औरंगाबादच्या घाटी
रुग्णालयातही प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. दरम्यान, अंबाजोगाईच्या रुग्णालयात सध्या
कार्यरत असलेले अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्याकडे आता नांदेड इथल्या डॉक्टर
शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून
कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर, नांदेड इथं सध्या कार्यरत अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत
म्हस्के यांची काल कोल्हापूर इथं बदली करण्यात आली आहे.
***
बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा
सिंचन प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या
येलदरी जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे या जलाशयातला
पाणीसाठा ७५ पूर्णांक ७० टक्के एवढा झाला आहे.
****
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातल्या
वडी इथं वृक्ष लागवडीचा शुभारंभ सरपंच चंदा कुटे यांच्या हस्ते झाला. तत्पूर्वी घनदाट
जंगल आणि वृक्ष लागवड करण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे शेतीत पूर्वतयारी करण्यात आली. हा
सर्व परिसर स्वच्छ करून त्याठिकाणी वृक्षांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धन करण्यासाठी
ग्रामपंचायत कार्यालयानं संरक्षण कंपाऊंड तयार केलं आहे.
****
‘प्रधानमंत्री पिक विमा’
भरण्यास येत्या ३१ तारखेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी विलंब न करता
जवळच्या बँकेत किंवा पोर्टलवर पिक विमा भरण्यास प्राधान्य देवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
या योजनेत सहभागी व्हावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.बी.चलवदे
यांनी केलं आहे.
****
परभणी महानगरपालिकेच्या आरोग्य
विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला परवा मध्यरात्री दीड वाजता कोरोना विषाणू बाधित
असल्याचं समजून रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याठिकाणी
त्याचा अहवालच उपलब्ध नसल्याचं सांगून त्याला काल पहाटे चार वाजता घरी जाण्यास सांगितलं.
त्यामुळे हा कर्मचारी पहाटे पायी घरी परतला. मात्र तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याच्या घराला
आणि परिसराला सील करण्याची प्रक्रिया रात्रभर सुरू होती. या प्रकरणावरुन परभणी जिल्हा
प्रशासनाचा आणखी एक भोंगळ कारभार पुढे आला आहे.
****
नांदेड जिल्हा पशू संवर्धन
आधिकारी कार्यालयानं नांदेड तालुक्यातल्या पावडेवाडी इथल्या शेतकऱ्यांच्या एक हजार
५० पाळीव पशुंची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधी तसच लसीकरण केलं. या भागातली
जनावरं आजारी पडत असल्यानं त्यांची तपासणी करण्याची मागणी नांदेड जिल्हा काँग्रेस युवक
काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी जिल्हा पशु संवर्धन अधिकाऱ्यांकडे
केली होती.
****
औरंगाबाद-बीड रस्त्यावर चित्तेपिंपळगाव-निपाणी
शिवारात बीडकडे जाणाऱ्या वळणावर काल संध्याकाळी साडेपाच वाजता खाजगी बसनं दुचाकीला
दिलेल्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार झाले. औरंगाबादहून बीडकडे ही बस जात होती.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा
तालुक्यातल्या हुलजंती इथले सैनिक नागप्पा सोमन्ना म्हेत्रे यांना जम्मू काश्मिरमधे
कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं. ते ३४ वर्षांचे होते. छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे
परवा रात्री त्यांना जम्मू काश्मीरमधल्या इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.
****
No comments:
Post a Comment