Tuesday, 28 July 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 28.07.2020 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै २०२० सकाळी ७.१० मि.
****
·       मराठा आरक्षयाचिकेवर २५ ऑगस्टला विशेष सुनावणी, याचिका घटनापीठाकडे देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता
·       कोरोना विषाणू संसर्गाविरूद्धच्या लढाईत नेमकं औषध तयार होईपर्यंत एकमेकांमध्ये योग्य अंतर, नियमित हात धुणं आणि मास्कचा वापर करणं मुख्य शस्त्रं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
·       चीनच्या आणखी ४७ मोबाईल ॲपवर केंद्र सरकारची बंदी
·        साबणानं स्वच्छ हात धुतले तरी पुरेसे, सॅनिटायझरची गरज नाही- केंद्रीय आरोग्य विभागाचा सल्ला
·       राज्यात काल आणखी सात हजार ९२४ रुग्ण आढळले, दिवसभरात २२७ रुग्णांचा मृत्यू
·       औरंगाबादमध्ये सात, जालना तीन, नांदेड आणि बीडमध्ये प्रत्येकी दोन तर उस्मानाबाद जिल्ह्यात एका रुग्णांचा मृत्यू;  लातूरमध्ये ७९, हिंगोलीत १७ तर परभणीत १५ नवे रुग्ण
आणि
·       टाळेबंदीमुळे प्रतिकूल परिणाम झालेल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या मदतीसाठी राज्य सरकारची एक योजना आणण्याचा विचार
****
मराठा आरक्षणाच्या याचिकेवरची पुढची विशेष सुनावणी आता २५ ऑगस्टला होणार आहे. ही याचिका घटनापीठाकडे सुनावणीसाठी द्यायची किंवा नाही यावर यादिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ही मागणी केली होती. याप्रकरणी एक सप्टेंबर पासून मुख्य सुनावणी सुरू होणार आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कालपासून सलग तीन दिवस आभासी प्रणालीद्वारे  सुनावणीचा निर्णय घेतला होता. मात्र, या प्रकरणाची व्याप्ती आणि हस्तक्षेप घेणाऱ्या अनेक याचिकाकर्त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी, अशी राज्य सरकाची भूमिका आहे.
दरम्यान, वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली नाही. तसंच, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली नोकर भरतीची प्रक्रिया यापूर्वीच स्थगित केलेली आहे. त्यामुळं १५ सप्टेंबरपर्यंत कुठलीही नोकर भरती होणार नसल्याचं राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधकांकडून वारंवार स्थगितीची मागणी केली जाते. परंतु, न्यायालयाने कोणतीही स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे, असं मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल सांगितलं. केंद्र सरकारने या याचिकेत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. ते म्हणाले…
 
केंद्र सरकारनं आपली भुमिकेचं स्पष्ट करावी की यामध्ये केंद्र सरकारचं सहभागी होणे अपेक्षित आहे. १० टक्के ईकोनॉमिकल विकर सेक्शनचा निर्णय पार्लमेंटमध्ये घेतलेला आहे. ती याचिका प्रलंबित असतांना केंद्र शासन मात्र अद्यापही याविषयावर भाष्य करत नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की केंद्र सरकारने आता याच्या मध्ये स्तब्ध राहण्यापेक्षा आपली भुमिका स्पष्ट करावी आणि सुप्रीम कोर्टा मध्ये याच्यामध्ये स्वत:हून जॉईन व्हावं आणि मराठा आरक्षणाला समर्थन करावं.

****
कोरोना विषाणू संसर्गावर नेमकं औषध तयार होईपर्यंत एकमेकांमध्ये योग्य अंतर, नियमित हात धुणं आणि मास्कचा वापर करणं हीच या विरोधातल्या लढ्यात मुख्य शस्त्रं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
मुंबई, कोलकाता आणि नोएडा इथं कोविड १९ च्या तीन उच्च क्षमता चाचणी केंद्रांचं उदघाटन काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं ही चाचणी केंद्र सुरू केली आहेत. सण आणि उत्सवातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. नवीन चाचणी केंद्रांमुळे देशातली कोरोना विषाणू संसर्गाची तपासणी क्षमता वाढणार असून जलद निदानामुळे लवकर उपचार सुरू करायला मदत होणार असल्याचं ते म्हणाले.
देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा मानस असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं.
राज्यात प्रत्येक गावात कोरोना दक्षता समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना यावेळी दिली. यामध्ये गावातल्या मान्यवरांचा समावेश केला जाणार आहे. गावकऱ्यांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, यावर ही समिती देखरेख ठेवणार आहे. सप्टेंबरनंतरही राज्यांना सातत्याने एन ९५ मास्क आणि पीपीई किटचा पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
केंद्र सरकारने चीनच्या आणखी ४७ मोबाईल ॲपवर बंदी घातली आहे. हे सर्व ॲपस् यापूर्वी बंदी घातलेल्या ५९ ॲपसची प्रतिरुपं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात टिकटॉकसह ५९ ॲपवर बंदी घातली होती, आता बंदी घातलेल्या ॲपची संख्या १०६ झाली आहे.
****
विद्यापीठांतर्गत पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील  सुनावणी येत्या शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग -यु.जी.सी.नं परीक्षा घेण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना आव्हान देण्याऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. दाखल विविध याचिकांवर उद्यापर्यंत एकत्रित  उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्यावर याचिकाकर्त्यांना परवापर्यंत आपलं म्हणणं मांडता येईल.
****
साबण आणि पाण्याचा पर्याय जिथं उपलब्ध नाही केवळ त्याच ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा अन्यथा साबणानं स्वच्छ हात धुतले तरी पुरेसे असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं म्हटलं आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या निर्जंतुकीकारक रसायन- सॅनिटायझरचा वापर होत असला तरी याच्या अतिवापरानं त्वचेला नुकसान पोहचू शकतं, असा  इशारा आरोग्य विभागानं दिला आहे. या विषाणू संसर्गाची साथ देशभर पसरल्यानंतर गेल्या पाच महिन्यांत सॅनिटायझरचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याचं  आढळल्यानं  आरोग्य विभागानं हे सूचित केलं आहे.
सॅनिटायझरच्या अतिरेकी वापरानं त्वचेला स्वस्थ ठेवणारे चांगले विषाणूही मरतात आणि मग हातावर फोड येण्यासारखे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्वाचा मानला जात आहे.
****
राज्यात काल आणखी सात हजार ९२४ रुग्ण आढळले. यामुळे राज्यातली एकूण रुग्ण संख्या तीन लाख ८३ हजार ७२३ एवढी झाली आहे. काल दिवसभरात २२७ रुग्णांचा मृत्यू झाला, यामुळे आतापर्यंत राज्यात या आजारानं मृत्यू पावलेल्यांची संख्या १३ हजार ८८३ एवढी झाली आहे. काल दिवसभरात आजारातून बरे झालेल्या आठ हजार ७०६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. त्यामुळे या आजारातून बरे झालेल्यांची संख्या दोन लाख २१ हजार ९४४ झाली आहे. राज्यात सध्या एक लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत राज्यात १९ लाख २५ हजार ३९९ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल सात कोरोनाविषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये सिल्क मिल कॉलनीतल्या ४० वर्षीय, जटवाडा इथल्या ५२ वर्षीय, पुंडलिक नगरमधल्या ५४ वर्षीय, भावसिंगपुऱ्यातल्या ५२ वर्षीय पुरूष रुग्णांसह जय भवानी नगरमधल्या ७० वर्षीय महिलेचा आणि सिल्लोडमधल्या ५० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातल्या खामखेड इथल्या ६५ वर्षीय रुग्णाचाही काल औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४४९ एवढी झाली आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल एकूण २१४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये महानगरपालिका हद्दीतले २४, तपासणी नाक्यावरील ३०, फिरत्या पथकातील ४६ तर ग्रामीण भागातल्या ११४ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णांची संख्या १३ हजार २५२ झाली आहे. यापैकी आठ हजार ९५३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या तीन हजार ८५० रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये जालना शहरातल्या ७५ वर्षीय, अंबड शहरातल्या ५९ वर्षीय महिला रुग्णांसह मंठा तालुक्यातल्या ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान,जालना जिल्ह्यात काल आणखी ३२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये जालना शहरातल्या १७, ग्रामीण भागातल्या ११ आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या चार रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या रूग्णांची एकूण संख्या आता एक हजार ९८२ इतकी झाली आहे. त्यापैकी एक हजार २६२ रुग्ण बरे झाले असून, सध्या ५८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
****
नांदेड जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात नांदेड शहरातील कौसर नगर चुनाभट्टी भागातली ३६ वर्षीय महिला आणि देगलूर तालुक्यातील शहापूर इथला ६५ वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात काल आणखी ६६ रुग्ण आढळले. याशिवाय परभणी जिल्ह्यातल्या चार रुग्णांचीही नांदेडमध्ये नोंद घेण्यात आली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये नांदेड शहरातले २५, मुखेड तालुक्यातले १०, देगलूर १५, नांदेड तालुका पाच, नायगाव तीन, हदगाव आणि बिलोली इथं प्रत्येकी दोन, तर कंधार, अर्धापूर, सोनखेड आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातलीकूण बाधितांची संख्या एक हजार ३९४ झाली आहे. जिल्ह्यात ४७ रुग्ण या आजारातून काल बरे झाल्यानं त्यांना घरी जाण्यासाठी सुटी देण्यात आली.
****
बीड जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये माजलगाव तालुक्यातल्या खातगव्हाण इथल्या ७० वर्षीय पुरुषाचा तर माजलगाव इथल्या ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात या आजरानं मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २६ झाली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात काल आणखी ३२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड शहरातले १६, परळी-११, गेवराई चार आणि शिरूर इथला एक रूग्ण आहे. यामुळे आता जिल्ह्यात एकूण ६१५ बाधित रूग्ण झाले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल उमरगा इथल्या एका ६० वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३९ झाली आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी ४७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये उमरगा तालुक्यातले २१, तुळजापूर तालुक्यातले नऊ, कळंब सात, वाशी सहा, उस्मानाबाद दोन, तर परंडा आणि लोहारा तालुक्यातला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७०८ झाली आहे. त्यापैकी ४६५जण बरे झाले असून, सध्या २०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
****
लातूर जिल्ह्यात काल ७९ बाधित रुग्ण आढळले. यापैकी ६८ रुग्ण हे यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातले आहेत तर आठ रुग्ण हे नवीन आहेत. काल १८३ जलद अँटीजेन चाचण्या घेण्यात आल्या यात ४३ बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता एक हजार ७०६ एवढी झाली आहे. यापैकी एक हजार २९ रुग्ण हे बरे झाले आहेत. सध्या ५९८ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात या आजारानं ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी १७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये हिंगोली शहरातले १२, आणि वसमत इथले पाच रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या ५७५ झाली आहे. तर काल सहा रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ३७२ रुग्ण बरे झाले असून, सध्या १९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
****
परभणी जिल्ह्यात काल १५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात सेलू  इथले पाच, परभणी आणि पालम इथले प्रत्येकी तीन, पूर्णा, गंगाखेड, जिंतूर आणि हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या कोळसा, इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ५३२ झाली आहे, यापैकी २५२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. काल बरे झाल्यानं १३ जणांना सुटी देण्यात आली. सध्या जिल्ह्यात २५६ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या आजारानं आतापर्यंत जिल्ह्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गंगाखेड शहरातली संचारबंदी येत्या २९ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ही संचारबंदी नगरपालिका हद्द आणि तीन किलोमिटरच्या परिसरात लागू राहील.
****
मुंबई शहरात काल एक हजार २१ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख दहा हजार १८२ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे शहरात काल नव्याने एक हजार १६० रुग्ण आढळले, तर १६ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात ३९२, अहमदनगर ३१६, पालघर २८४, सोलापूर २९६, सातारा १३४, सांगली १२१, धुळे ११६, रत्नागिरी ६२, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी सात, सिंधुदुर्ग सहा आणि भंडारा जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.  
****
उद्योग विभागानं विकसित केलेल्या महाजॉब्ज ॲपचं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. या निमित्तानं उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. महाजॉब्ज वेब पोर्टलवर तरुणांची नोंदणी प्रक्रिया अधिक सुकर होण्याच्या दृष्टीनं हे ॲप विकसित करण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी राज्यांना जीएसटी परताव्याचा हिस्सा दिला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं काल ही माहिती दिली. याअंतर्गत महाराष्ट्राला १९ कोटी २३३ लाख रुपयांचा परतावा प्राप्त झाला आहे. 
****
केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकार सत्ता आणि पैशाचा गैरवापर करत विविध राज्यातली विरोधी पक्षांची सरकारं पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, काँग्रेस पक्षानं काल देशव्यापी आंदोलन छेडलं. मुंबईत राजभवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शनांसह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. राजस्थानातल्या सत्ता संघर्षाच्या पाठीमागे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे.
****
टाळेबंदीमुळे प्रतिकूल परिणाम झालेल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या मदतीसाठी राज्य सरकार एक योजना आखत असल्याचं, उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. या क्षेत्राच्या गरजा समजून घेत, त्यादृष्टीनं उपाययोजना आखत असल्याचं देसाई यांनी सांगितलं. टाळेबंदीदरम्यान उत्पादन बंद असलेल्या काळासाठीही कामगारांच्या पगाराचा प्रश्न तसंच या काळातल्या वीज देयकाची माफी अशा मागण्यांचा, या योजनेच्या आराखड्यात विचार केला जाणार असल्याचं, देसाई यांनी सांगितलं. औद्येगिक वसाहतींच्या बाहेर असणाऱ्या कंपन्यांना खरेदीवर अनुदान देण्याच्या मुद्यावर सरकार विचार करत असल्याचं देसाई म्हणाले.
****
सरकारनं एक ऑगस्ट नंतर टाळेबंदी जाहीर केल्यास आम्ही टाळेबंदी तोडण्याचं आवाहन करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल अकोल्यात वार्ताहरांशी बोलत होते.  आम्हाला तुरुंगात जाण्याचं काम पडले तरी आम्ही जाऊ, असा सरकारला इशारा देत त्यांनी कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या आकडेवारीबद्दल साशंकता व्यक्त केली. दरम्यान, नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधींची कोरोना विषाणू चाचणी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
****
बीड जिल्ह्यात एक हजार ७०० रूग्णांवर अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार करता येतील अशी सोय केली असल्याचं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. यासंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते. जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रूग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, याचा सविस्तर आढावा घेतला असता मोठ्या प्रमाणावर सध्या नमुने घेण्यात येत आहेत. त्यामुळे संख्या वाढली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही अधिक असल्यामुळे नागरीकांनी काळजी करु नये, असं ते म्हणाले. जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी सर्वतोपरीने यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, नागरीकांनी घरीच राहण्याचं आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी केलं आहे.
****
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी - नीट परीक्षेसाठी उस्मानाबाद इथं परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे शिफारस रावी अशी मागणी त्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यात असलेली टाळेबंदी लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद इथं परिक्षा केंद्र सुरू करावं असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड शहरातील प्रतिबंधित क्षेत्राचे निकष बदलावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांसह तालुका कॉंग्रेस समितीनं जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकडे केली आहे. काल नागरिकांनी तहसिलदारांची भेट घेन त्यांना याबाबतचं निवेदन दिलं. मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेले अडथळे काढून दुकानं उघडण्यास परवानगी देण्याची मागणीही यावेळी व्यापाऱ्यांनी निवेदनात केली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या कोरोनाविषाणू बाधित रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र सरकारकडून ४५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले आहेत. यासाठी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती.
****
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं पहिल्या श्रावण सोमवारी काल नागनाथाची शासकीय महापूजा करण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या हस्ते ही महापुजा करण्यात आली. कोरोनाविषाणू संसर्गामुळे मंदिर भाविकांसाठी बंद आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथं देखील भाविकांनी काल प्रवेशद्वारातूनच वैजनाथाचे दर्शन घेतलं. औरंगाबाद जिल्ह्याच्या वेरुळ इथल्या घृष्णेश्वर मंदिरात काल पहाटे केवळ दोन पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा आणि अभिषेक करण्यात आला.
दरम्यान, श्रावण महिन्यात घृष्णेश्वरला भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
लातूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहराच्या चारही विभागांकरता प्रभाग अधिकारी म्हणून  सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे. याचबरोबर त्यांना आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे सर्वाधिकारही देण्यात आले आहेत. महापालिकेनं स्थापित केलेल्या कृती समितीची आढावा बैठक काल झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी  महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार उपस्थित होते. प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत असलेल्या प्रत्येक खर्चाचं लेखापरिक्षण करण्याचही बैठकीत निश्चित करण्यात  आलं.
****
परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या नागरिकांनी मूग खरेदी केंद्र तातडीनं सुरू करण्याची मागणी सहायक निबंधकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यंदा पाऊस वेळेवर आणि चांगला पडल्यामुळं मुगासह, कापूस, सोयाबीन, तूर ही पिकं चांगली आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मूग बाजारपेठेत येण्यापूर्वी मूग खरेदीसाठी भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघ - नाफेडचं खरेदी केंद्र सुरू करावं अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्याच्या पोहरेगाव इथं घर तेथे झाड उपक्रमांतर्गत काल ग्रामस्थांना नारळाचं रोप वाटप करण्यात आलं. सरपंच गंगासिंह कदम यांच्या हस्ते गावातील सातशे नागरिकांना या रोपांचं वितरण करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्या मंगरूळ शिवारात शेतकरी तथा वीज ऑपरेटर रामचंद्र चित्तेबोईनवाड यांचा काल विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. विद्युत रोहित्राची तार जोडतांना त्यांचा विजेचा तारांना स्पर्श झाला होता.
//************//






















No comments: