आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता
****
कोविडसंदर्भात जनतेच्या मनात असलेली भीती कमी होण्यासाठी
उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
म्हटलं आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राज्यातल्या
महाविकास आघाडी सरकार बद्दल विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे यांनी, तीन
वेगवेगळ्या विचारांचं हे सरकार फार काळ टिकेल, असं वाटत नाही, असं मत व्यक्त केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ४८ नव्या कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची नोंद झाली. यात महानगरपालिका हद्दीतल्या ३२ आणि ग्रामीण भागातल्या १६ रूग्णांचा
समावेश आहे. सध्या जिल्ह्यात तीन हजार ४६० रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णांची एकूण
संख्या तेरा हजार ८९० झाली आहे.
****
अहमदनगर जिल्हा परिषदेतल्या ग्रामपंचायत विभागातील कामकाज
गतिमान करण्यासाठी “आय लव्ह माय जॉब” ही संकल्पना राबवली जात आहे. शासनाच्या विविध
योजनांची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत ग्रामपंचायत विभाग चित्रफितीद्वारे मार्गदर्शन
करीत आहे.
****
उस्मानाबाद शहरातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती
संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद शहरात उद्या एक ऑगस्टपासून दुचाकी
वाहनांना प्रतिबंध केला आहे. या आदेशानुसार फक्त शासकीय अधिकारी - कर्मचारी आणि अत्यावश्यक
सेवेतल्या व्यक्तींनाच या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
****
बीड जिल्हा प्रशासनाने आता ३१ ऑगस्ट पर्यंत संचारबंदी
कायम ठेवली आहे, मात्र यात काही बाबींना सूट देखील देण्यात आली आहे. पाच ऑगस्टपासून
जिल्ह्यात अनेक बाबी सुरू होणार असल्याचं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या
आदेशात म्हटलं आहे.
****
लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने
सन्मानित करावं, अशा मागणीचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिलनं एकमतानं
संमत केला आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा, यासाठी पक्षाच्यावतीने राज्यात प्रत्येक
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची मोहिम हाती घेतली जाणार असल्याची माहिती पक्षाचे
राष्ट्रीय सचिव कॉम्रेड भालचंद्र कानगो आणि तुकाराम भस्मे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
दिली आहे.
****
No comments:
Post a Comment