Wednesday, 29 July 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.07.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता
****
भेदक मारक क्षमता असलेली अत्याधुनिक बनावटीची राफेल विमानं आज भारतात दाखल होत आहेत. फ्रान्सकडून खरेदी केलेल्या ३६ विमानांपैकी पाच विमानांचा पहिला ताफा आज दुपारच्या सुमारास हरयाणात अंबाला इथं हवाई दलाच्या तळावर उतरणार आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एनआयसी डॉट कॉम किंवा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ७१ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. यात महानगरपालिका हद्दीतल्या ३० आणि ग्रामीण भागातल्या ४१ रूग्णांचा समावेश आहे. सध्या तीन हजार ६४० रूग्णांवर उपचार सुरू असून एकूण रूग्णांची संख्या तेरा हजार चारशे चाळीस झाली आहे.
****
नवी मुंबईत कोरोना बाधित रूग्णांचा शोध घेण्यासाठी रॅपिड अॅंटिजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या १८ ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. दररोज १३०० हून जास्त व्यक्तींच्या अॅंटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत.
****
आज जागतिक व्याघ्र दिन आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी वाघ परियोजना यशस्वी झाल्याबद्दल सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. २०२२ या निर्धारित मर्यादेपूर्वीच देशात वाघांची संख्या दुप्पट करण्याचं लक्ष्य साध्य झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही देशात वाघांची संख्या वाढत असल्याबद्दल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशंसोद्गार काढले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या ८० महसूल मंडळापैकी ४३ महसूल मंडळात गेल्या २४ तासांत पाऊस झाला. देगलूर तालुक्यात हाणेगाव महसूल मंडळात सर्वाधिक ५५ मिलीमीटर तर किनवट तालुक्यातल्या शिवणी महसूल मंडळात ५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, हवामान खात्यानं राज्यातल्या काही जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे, रायगड, आणि पालघर अया ठिकानी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. काल दिवसभर मुंबईत जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****

No comments: