Tuesday, 28 July 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 28.07.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
जगातल्या एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात असून, वाघांच्या संख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असल्याचं, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. उद्या जागतिक व्याघ्र दिन पाळला जातो, या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत जावडेकर यांच्या हस्ते अखिल भारतीय वाघ अनुमान अहवाल प्रकाशित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. १९७३ मध्ये देशात फक्त ९ व्याघ्र अभयारण्यं होती, आता ती संख्या ५० झाली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
****
जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात पाकिस्ताननं नियंत्रण रेषेपलिकडून आज सकाळी जोरदार गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा केला. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा हा सलग आठवा दिवस आहे. गेल्या आठवड्याभरातली गोळीबाराची ही विसावी घटना असल्याचं, सैन्यदलाकडून सांगण्यात आलं. भारतीय सैन्याकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं, सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
देशभरात कोविड संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या ९ लाख ५२ हजार ७४३ झाली आहे. त्यामुळे या संसर्गातून बरे होण्याऱ्या रुग्णां प्रमाण ६४ पूर्णांक २४ शतांश टक्के एवढं झालं असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. देशा आतापर्यंत या आजाराने बाधितांची संख्या १४ लाख ८३ हजार १५६ झाली असून सध्या देशात ४ लाख ९६ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३३ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचं हे प्रमाण दोन पूर्णांक २५ शतांश टक्के असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, देशात सध्या एक हजार ३१० प्रयोगशाळांमधून कोविड संसर्ग चाचण्या केल्या जात आहेत. यापैकी ९०६ सरकारी प्रयोगशाळा तर ३७८ खासगी प्रयोगशाळा आहेत. कालपर्यत देशभरात एक कोटी ६८ लाख ६ हजार ८०३ कोविड नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद- आय सी एम आरनं दिली आहे.
दरम्यान, काल एका दिवसात ५ लाखांपेक्षा जास्त कोविड चाचण्या करण्याचा नवा उच्चांक  भारताने गाठला आहे. सलग दोन दिवस ५ लाखांपेक्षा अधिक कोविड चाचण्या घेतल्याची आरोग्य मंत्रालयानं माहिती दिली आहे. तत्परतेने रुग्णांच्या चाचण्या घेणं, नव्या रुग्णांचा शोध घेणं आणि उपचार देणं यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. काल एकूण ५ लाख २८ हजार चाचण्या घेतल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ६७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातली कोविड बाधितांची एकूण संख्या १३ हजार ३१९ झाली. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतल्या ५५ तर ग्रामीण भागातल्या १२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातले आठ हजार ९५३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, ४४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात ३ हजार ९१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ८८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज पहाटे चार वाजता उपचारांदरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोंनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता २५ झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात शहरी तसंच ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाने घरनिहाय तपासणी मोहीम सुरू केली आहे. नांदेड महानगरासाठी १५ प्रभागांची निर्मिती करुन सुमारे ४६० अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक प्रभागाला समन्वयासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी महानगरपालिका तसंच महसूल यंत्रणा विशेष लक्ष देवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज नव्या ५४ कोविड बाधित रुग्णांची वाढ झाली असून, सध्या जिल्ह्यात एक  हजार ३४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज कोरोना विषाणू बाधित १३३ रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ४१८ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं दरवर्षी आयो‍जित करण्यात येणारा राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव आणि कला गौरव पुरस्कार समारंभ कोवीड-19 च्या‍पार्श्वभूमीवर स्थागित करण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार पुढील वर्षी देण्याचा निर्णय निवड समिती आणि कार्यक्रम संयोजन समितीने घेतला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातलं इसापूर धरण पन्नास टक्के भरलं आहे. सध्या धरणात ४८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//**********//



No comments: