Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 July 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जुलै २०२०
सायंकाळी ६.००
****
·
विधीमंडळाचं
पावसाळी अधिवेशन सात सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय.
·
औरंगाबाद
जिल्ह्यात पाच कोविड बाधितांचा मृत्यू; बाधितांची एकूण संख्या १३ हजार ३२२.
·
दहावीचा
निकाल उद्या दुपारी एक वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार.
आणि
·
ग्राहकांना
दिलेली वाढीव वीज देयके ही तफावत नसून लूट असल्याची राज ठाकरे यांची टीका.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं असून, आता हे अधिवेशन सप्टेंबर
महिन्यात घेतलं जाणार आहे. आज मुंबईत विधान भवनात विधीमंडळ कार्यसमितीच्या
बैठकीनंतर विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना ही
माहिती दिली. मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव सरकारनं
दिला होता, मात्र हा त्या आमदारांना संविधानाने दिलेला हक्क हिरावण्यासारखं आहे.
त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव नाकारल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. २२ जून पासून
नियोजित असलेलं हे अधिवेशन येत्या तीन ऑगस्टपासून सुरू होणार होतं, मात्र आता ते
सात सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण
मुद्यावर दोन दिवसाचं विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष
आमदार विनायक मेटे यांनी या बैठकीत केली आहे.
****
राज्याच्या आरोग्य
विभागानं अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी या औषध शाखांच्या तज्ञांशी
चर्चा करून कोरोनावर एकात्मिक उपचार पद्धती आखावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रतिबंध आणि उपचार अशा दोन
वर्गवारीनुसार ही चौकट आखावी असं त्यांनी सांगितलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज
पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शासकिय वैद्यकीय रुग्णालय घाटीत उपचार
घेत असलेल्या आंबेडकर नगरातील ३१ वर्षीय पुरुष, रोजाबाग इथली ६५ वर्षीय महिला,
कन्नड तालुक्यातल्या आडगाव इथला ६० वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयांत उपचार घेत
असलेल्या विद्यानगरातील ३५ वर्षीय महिला आणि राम नगरातील ६८ वर्षीय पुरुषाचा यात
समावेश आहे.
दरम्यान, आज सकाळी ६७
आणि दुपारी ३ अशा एकूण ७० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे
जिल्ह्यातली कोविड बाधितांची एकूण संख्या १३ हजार ३२२ झाली. आज आढळलेल्या
रुग्णांमध्ये मनपा हद्दीतल्या ५७ तर ग्रामीण भागातल्या १३ रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातले ८ हजार ९५३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून ४५४ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयांत ३ हजार ९१५ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, घाटीला
आमदार अतुल सावे यांच्या स्थानिक विकास निधीतून ३८ बेड देण्यात आले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात आज
एका कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात या विषाणू
संसर्गानं ४० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ६६ नवे रुग्ण आढळले
आहेत. यात उस्मानाबाद तालुक्यातले १८ उमरगा तालुक्यातील २३, तुळजापूर तालुक्यातील
९, कळंब ७ वाशी ६ परंडा २ लोहारा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातली एकूण
रुग्णसंख्या आता ७२९ झाली आहे. त्यापैकी ४६५ रुग्ण बरे झाले असून, सध्या २२४
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्यात
राज्य राखीव दल - एसआरपीएफच्या ७८ जवानांना आज कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात आज नवे ३८ कोरोना
विषाणू बाधित आढळले आहेत यामधे ३३ पोलिसांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५५६
कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर २३३ रुग्णांना कोरोना मुक्त झाल्यानं
रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात
दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर
विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.
****
अयोध्येतल्या बाबरी मशीद
विध्वंस प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या विशेष न्यायालयात ३१
आरोपींचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या यादीतले ३१वे आरोपी
शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांनी आज ठाणे इथून दूरदृश्य संवाद
प्रणालीमार्फत जबाब नोंदवला. आपण निर्दोष असून, राजकीय सूड भावनेतून आपलं नाव या
प्रकरणात गोवण्यात आलं, असं प्रधान यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे. या प्रकरणातले शेवटचे आरोपी ओमप्रकाश पांडे यांचा तपास लागू शकला नाही,
सुमारे १६ वर्षांपूर्वी ते संन्यास घेऊन घरातून निघून गेले आणि त्यानंतर
त्यांच्याशी काहीही संपर्क नसल्याचं, त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. सर्वोच्च
न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत सुनावणी पूर्ण
करण्यासाठी सीबीआयच्या विशेष न्यायालयात दररोज सुनावणी घेण्यात येत आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या
येलदडमी जंगलात ३ जुलैला एटापल्ली तालुक्यातल्या एलदडमी जंगलात पोलिस आणि
नक्षलवाद्यांच्या चकमकीत नक्षलांच्या गट्टा दलमचा उपकमांडर अमोल होयामी हा देखील
ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नक्षलवाद्यांनी जारी केलेल्या एका
पत्रकांनुसार नक्षल्यांचा कमांडर सोमा उर्फ शंकर यासह उपकमांडर अमोल होयामी
हादेखील ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या
किनवट तालुक्यातील चिखली इथं तीन मुलांचा आज नदीत बुडून मृत्यू झाला. ही मुलं नदीत
पोहण्यासाठी गेली होती. मृतांपैकी दोघे १४ वर्षांचे तर एक मुलगा ११ वर्षांचा
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या
मुद्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जनतेची दिशाभूल करत
असल्याचं मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते
अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात
सुनावणी होत असून सध्या कोणत्याही प्रकारच्या नवीन नोकरभरतीचे राज्य सरकारनं आदेश
दिलेले नाहीत, असं मुकूल रोहतगी यांनी राज्य शासनाच्या वतीनं न्यायालयाला
सांगितल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. गेल्या ४ मे ला काढलेल्या राज्य सरकारच्या
आदेशानुसार फक्त आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण याच विभागांच्या नोकर भरतीचे आदेश
दिल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणूच्या
पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलेली वाढीव वीज देयके ही तफावत नसून लूट असल्याची टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. टाळेबंदीमुळे
व्यावसायिक आस्थापना तीन महिने बंद असूनही, महावितरण आणि बेस्ट यांनी अव्वाच्या
सव्वा वीज देयके दिली आहेत. टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प, पगारकपात, नोकरकपात सुरु
आहे. अशा वेळेला उदरनिर्वाहाचीही शाश्वती नसतांना, जास्तीची देयकं देणं चुकीचं
आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालून वीज
देयकात तात्काळ सूट द्यावी असं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना
लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र
नवनिर्माण सेना यंदा दहीहंडी उत्सव साजरा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोना
विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करू नये असं राज ठाकरे
यांनी आपल्या राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगांवकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात
म्हटलं आहे.
****
शेतमालावर प्रक्रिया तसंच
मूल्यवर्धन आवश्यक असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत कृषी प्रक्रिया उद्योग - उद्योजकांच्या यशोगाथा
या विषयावर पाच दिवसांचं वेबीनार घेण्यात येत आहे, या वेबीनारचं उद्घाटन देसाई यांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतमाल प्रक्रियेमुळे शेतमालाची नासाडी न होता,
शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल, असं देसाई यांनी नमूद केलं.
****
केंद्रीय पथकाच्या
शिफारसीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात ऑग महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात “सेरो सर्वेक्षण”
करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेला प्रादुर्भाव
लक्षात यावा आणि त्या दृष्टीने उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत व्हावी यासाठी या
सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी तसंच
मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या
भोकर तालुक्यातील सायाळ इथल्या शिवसेना शाखेच्या वतीने शेतकऱ्यांना प्रधानमंत्री
पीक विमा काढण्यास मदत करण्यात आली. कोणतेही सेवा शुल्क न आकारता मोफत विमा काढून
दिला असून या योजनेचा ७५ शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं
आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात राज्य
शासनाच्या कापूस पणन महासंघ आणि केंद्र सरकारच्या भारतीय कापूस प्राधिकरणाने कापुस
खरेदी केल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे सुरू
झालेल्या टाळेबंदीनंतर जिल्ह्यात ५१ हजार ४०९ शेतकऱ्यांच्या १६ लाख ५१ हजार
क्विंटल कापसाची खरेदी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड शहरात आज जागतिक
निसर्ग संवर्धन दिनानिमित ईतवारा पोलीस स्टेशन परिसरात जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर
यांच्या हस्ते ४५० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक
विजयकुमार मगर हे उपस्थित होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लावणं, त्यांच
संवर्धन करणं महत्त्वाचं असल्याचं विपिन इटनकर यांनी म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment