Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 July 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जुलै २०२०
सायंकाळी ६.००स
****
**
मुंबई, कोलकाता आणि नोएडा इथं कोविड १९च्या अत्याधुनिक संसर्ग चाचणी केंद्राचं पंतप्रधानांच्या
हस्ते उदघाटन
**
औरंगाबाद जिल्ह्यात सहा कोरोनाविषाणू बाधितांचा मृत्यू; एकूण बाधित संख्या १३ हजार
१०५
**
टाळेबंदीमुळे प्रतिकूल परिणाम झालेल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला सहाय्यासाठी
राज्य सरकारची विशेष योजना
आणि
**
पुरातत्त्व स्थळांसह सांस्कृतिक वारसा स्थळांचं संरक्षण आणि जतन करण्यासाठी १५ व्या
वित्त आयोगातून ७०० कोटी रुपये आर्थिक सहाय्य द्यावं. अमित देशमुख यांची मागणी
****
भारत
आज जगात पीपीई कीट बनवणारा जगातला दुसरा मोठा देश बनला आहे. देशात दररोज तीन लाख एन
९५ मास्क तयार केले जात आहेत. एवढ्या कमी वेळात हा टप्पा गाठणं मोठं यश असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबई, कोलकाता आणि नोएडा इथं कोविड १९च्या अत्याधुनिक
संसर्ग चाचणी केंद्राचं उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. या केंद्रांमुळे देशातली कोरोना विषाणू
संसर्गाची तपासणी क्षमता वाढणार असून जलद निदानामुळे लवकर उपचार सुरू करायला मदत होणार
आहे. या आजारावर नेमकं औषध तयार होईपर्यंत योग्य शारीरिक अंतर, नियमित हात धुणं आणि
मास्कचा वापर हीच कोरोना विरोधातल्या लढ्यात मुख्य शस्त्रं असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज सहा कोरोनाविषाणू बाधितांचा मृत्यू झाला.यामधे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालय घाटीत सिल्क मिल कॉलनीतील ४० वर्षीय, जटवाडातील ५२ वर्षीय, पुंडलिक नगरातील
५४ वर्षीय, भावसिंगपुऱ्यातील ५२ वर्षीय पुरूष तर जय भवानी नगरातील ७० वर्षीय स्त्री
रुग्णाचा आणि सिल्लोडमधील ५० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान,
आज संध्याकाळपर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण ६७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली.
यामुळे जिल्ह्यातली बाधितांची एकूण संख्या १३ हजार १०५ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये
मनपा हद्दीतले २४ तर ग्रामीण भागातल्या ४३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत
६ हजार ५३६ रुग्ण बरे झाले असून, ४४९ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
****
परभणी
इथं महानगरपालिकेतील कर्मचाऱ्याच्या कोविड अहवालाबाबत निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांची एक सदस्यीय चौकशी
समिती गठीत केली आहे. येत्या दोन दिवसात सुरवसे यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्यास
सांगितलं आहे. या कर्मचाऱ्याला परवा मध्यरात्री दीड वाजता कोरोना विषाणू बाधित असल्याचं
सांगत, रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याठिकाणी त्याचा
अहवालच उपलब्ध नसल्याचं सांगून त्याला काल पहाटे चार वाजता घरी जाण्यास सांगितलं होतं.
****
प्रसिद्ध
अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन आणि त्यांची कन्या आराध्या यांना कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाल्यानं, रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या दोघींना १७ जुलैला रुग्णालयात
दाखल करण्यात आलं होतं. अभिनेता अभिषेक बच्चन यानं ट्विटरवरून ही माहिती दिली. अभिषेक
बच्चन यांच्यासह त्यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर मात्र अद्याप
या संसर्गासाठी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
पालघर
जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या १४ हजार १०१ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६७ जणांचा
मृत्यू झाला असून आतापर्यंत ९ हजार ४१२ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहे.
****
सिंधुदुर्ग
जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या ३३४ झाली आहे. आतापर्यंत एकूण २५७ रुग्ण संसर्गमुक्त
झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ७१ रुग्णांवर उपचार
सुरू असून आजपर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात
सध्या २९ ठिकाणी नियंत्रण क्षेत्र असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय
चाकूरकर यांनी दिली आहे.
****
चंद्रपूर
जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या ४०३ झाली आहे. आतापर्यंत २४८ रुग्णांना उपचारानंतर
घरी सोडण्यात आलं आहे. सध्या १५५ बाधितावर उपचार सुरू आहे.
****
नाशिक
जिल्ह्यातील वडाळा इथं घरात सॅनिटायझरचा भडका उडून एक महिला ठार झाली. मेणबत्तीच्या
उजेडात सॅनिटायझर फवारत असतानाही दुर्घटना झाली. यात एक दांम्पत्य गंभीर जखमी झालं
होतं, सदर महिला ९० टक्के भाजल्यानं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
केंद्र
सरकारने चीनच्या आणखी ४७ मोबाईल ॲपवर बंदी घातली आहे. हे सर्व ॲपस् यापूर्वी बंदी घातलेल्या
५९ ॲपसची प्रतिरुपं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं गेल्या
महिन्यात टिकटॉकसह ५९ ॲपवर बंदी घातली होती, आता बंदी घातलेल्या ॲपची संख्या १०६ झाली
आहे.
****
टाळेबंदीमुळे
प्रतिकूल परिणाम झालेल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला सहाय्यासाठी राज्य
सरकार एक योजना आखत असल्याचं, उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई
यांनी सांगितलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. या क्षेत्राच्या गरजा
समजून घेत, त्यादृष्टीनं उपाययोजना आखत असल्याचं देसाई यांनी सांगितलं. टाळेबंदीदरम्यान
उत्पादन बंद असलेल्या काळासाठीही कामगारांच्या पगाराचा प्रश्न तसंच या काळातल्या वीज
देयकाची माफी अशा मागण्यांचा, या योजनेच्या आराखड्यात विचार केला जाणार असल्याचं, देसाई
यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. औद्येगिक वसाहतींच्या बाहेर असणाऱ्या कंपन्यांना खरेदीवर
अनुदान देण्याच्या मुद्यावर सरकार विचार करत असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्रातल्या
विविध पुरातत्त्व स्थळांसह सांस्कृतिक वारसा स्थळांचं संरक्षण आणि जतन करण्यासाठी १५
व्या वित्त आयोगातून ७०० कोटी रुपये आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री
अमित देशमुख यांनी केली आहे. वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांच्याकडे देशमुख
यांनी या मागणीचं पत्र सादर केलं आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास समृद्ध वारसास्थळांचे
संरक्षण करण्याबरोबरच त्यांचं जतन करण्यात येईल, वारसा स्थळांचं पर्यटनस्थळात रुपांतर
केल्यास रोजगार निर्मिती आणि महसूल मिळण्यास मदत होणार असल्याचं देशमुख यांनी पत्रात
म्हटलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातील मुदखेड इथं सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात आज केंद्रीय राखीव पोलीस दलाचा
८२ व्या स्थापना दिवस मोठया उत्साहात आज साजरा करण्यात आला. या वेळी केंद्रीय राखीव
पोलीस दलाच्या सैनिकांना पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांचे हस्ते मिठाई वाटप
करण्यात आली.
****
महात्मा
जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत मयत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी
नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे. इंगोले
यांनी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्याकडे या मागणीचं निवेदन सादर केलं आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं नागनाथाची आज पहिल्या श्रावण सोमवारी शासकीय महापूजा करण्यात
आली. संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या हस्ते ही महापुजा करण्यात
आली. कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात शुकशुकाट असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड
जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथं देखील भाविकांनी आज प्रवेशद्वारातूनच वैजनाथाचे दर्शन
घेतलं.
****
वाशिम
जिल्ह्यात अकोला-नांदेड महामार्गावरील मेडशी नजीक ट्रकचा अपघात झाला.वळणावरील कठडे
नसलेल्या पुलाचा अंदाज न आल्यान हा अपघात झाला.हा ट्रक इंदोरहून वाशिम इथं जात होता.या
अपघातात ट्रक चालक आणि त्याचा सहकारी चालकाचा जागीच मृत्यू झाला.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ शिवारात शेतकरी तथा वीज ऑपरेटर रामचंद्र
चित्तेबोईनवाड यांचा आज विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. विद्यूत रोहित्राची तार जोडतांना
विजेचा धक्का लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला .
****
जालना
जिल्ह्यातील भोकरदन शहरातील एका इलेक्ट्रानिक्स आणि फर्निचर साहित्य विक्रीच्या दुकानाला
आज पहाटे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या दुर्घटनेत दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य
जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
****
उस्मानाबाद
इथं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त १६४ शिवसैनिकांनी रक्तदान केलं.
या कार्यक्रमास धाराशिव तालुक्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. जिल्ह्यातील
उमरगा, वाशी, तुळजापुर तालुक्यात निर्धार सप्ताहात
जन्मलेल्या मुला मुलीसह मातांना साडी, ड्रेस वाटप करण्यात आला. जिल्ह्यातील तेर इथं
स्मशान भुमीत स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आलं.
****
केंद्रातील
भाजप सरकार सत्ता आणि पैशाचा गैरवापर करत विविध राज्यातली विरोधी पक्षांची सरकारं पाडण्याचा
प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, काँग्रेस पक्षानं आज देशव्यापी आंदोलन छेडलं आहे. मुंबईत
राजभवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शनांसह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी
या आंदोलनात सहभाग नोंदवला. ****
No comments:
Post a Comment