Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 July 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जुलै २०२०
सायंकाळी ६.००
****
§
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम
वर्षांच्या परीक्षा स्थगित करण्याच्या याचिकांवर अंतरिम निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा
नकार
§
अभिनेता सुशांतसिंह राजपूत
मृत्यू प्रकरणी
ईडीकडून काळा पैसा वैध करण्यासंबंधी गुन्हा दाखल
§
औरंगाबाद इथं चार तर उस्मानाबाद इथं आज एका कोविडग्रस्ताचा
मृत्यू
§
औरंगाबाद नजिक शेंद्रा इथल्या तलावात पाच तरुणांना
जलसमाधी
आणि
§ महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजातल्या सकारात्मक बाबी समोर येणं आवश्यक -
अशोक चव्हाण यांचं मत
****
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा स्थगित करण्याच्या
याचिकांवर अंतरिम निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी केंद्रीय
गृह विभागानं आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला
दिले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानं कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम
वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्याचे निर्देश दिले होते. ही परीक्षा रद्द
करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी घेण्यात आली.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय हाताळत असल्यामुळे, सप्टेंबरमध्ये नियोजित परीक्षा स्थगित
होतील, या संभ्रमात कोणीही राहू नये, असं विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे. या
प्रकरणी पुढची सुनावणी येत्या १० ऑगस्टला होणार आहे.
*****
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय
- ईडीने काळा पैसा वैध करण्यासंबंधी गुन्हा दाखल केला आहे. बिहार पोलिसांनी सुशांतची
मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात दाखल केलेल्या प्राथमिक माहिती
अहवाल - एफआयआरची दखल घेत, अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल - इसीआयआर दाखल करण्यात
आला आहे. सुशांतचा मृत्यू आणि त्याच्याशी संबंधित असलेले संशयास्पद आर्थिक व्यवहार
याचा तपास या अंतर्गत केला जाणार आहे. सुशांतच्या उत्पन्नाचा काळा पैसा वैध करण्यासाठी
तसंच बेनामी मालमत्ता उभारण्यासाठी वापर केला जात होता का, याचा शोधही घेतला जाणार
आहे. गेल्या १४ जूनला राहत्या घरी सुशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
****
औरंगाबाद मध्ये आज चार कोरोना
विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात पैठण इथल्या ९५ वर्षीय महिलेसह, बाजार सावंगी
इथला ७१ वर्षीय, वैजापूर इथला ६७ वर्षीय आणि गेवराई इथल्या ४० वर्षीय पुरुषाचा समावेश
आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता ४७३ झाली आहे. दरम्यान,
आज सकाळी जिल्ह्यात नवे ४८ कोविडबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची
संख्या आता १३ हजार ८९० झाली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात आज एका कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू
झाला, तर १७४ नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातली
कोविड बाधितांची संख्या आता एक हजार १६३ झाली आहे. त्यापैकी ५१४ रुग्ण
आतापर्यंत कोविड संसर्गातून मुक्त
होऊन घरी परतले
आहेत. तर ६०० रुग्णांवर जिल्ह्यातल्या विविध
रुग्णालयात सध्या
उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत
४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड विषाणू संसर्गाची लक्षणं सौम्य असणाऱ्या
रुग्णांना त्यांच्या इच्छेनुसार स्वत:च्या घरी राहून उपचार घेता येणार आहेत. उस्मानाबादचे
पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या कोरोना संसर्गाचा आढावा
घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या तपासण्यांची
संख्या वाढवण्यात येणार असून, त्यासाठी दहा हजार रॅपिड अँटिजेन किट्स उद्यापर्यंत जिल्ह्यात
येतील, अशी माहिती त्यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील
कोविड चाचणी प्रयोगशाळेत चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचंही गडाख यांनी
सांगीतलं.
****
औरंगाबादचे खासदार सय्यद
इम्तियाज जलील यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बालरोग विभागाला
६० लाख रुपये किंमतीचे पाच व्हेंटिलेटर दिले आहेत. घाटीत लहान मुलांचे आतापर्यंत फक्त
तीनच व्हेंटिलेटर होते. त्यामुळे अनेक अत्यवस्थ बालकांना उपचार सुरु होण्यास विलंब
झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याअनुषंगानं जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेसाठी स्थानिक
विकास निधीतून एक कोटी रुपये मदतीची घोषणा त्यांनी केली होती. त्यानिधीतून हे व्हेंटीलेटर
देण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद
नजिक शेंद्रा औद्योगिक वसाहतीतल्या नाथनगर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा
आज बुडून मृत्यू झाला. समीर शेख, शेख अब्बार, अतिक युसुफ शेख, ताकेब युसुफ शेख, साहेल
युसुफ शेख अशी मृतांची नावे आहेत. पाचही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले असल्याची
माहिती महापालिकेच्या अग्निशमक विभागानं दिली आहे.
****
महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजातल्या सकारात्मक बाबी समारे
येणं आवश्यक आहे, असं मत
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. ते आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. कर्नाटक
आणि मध्यप्रदेशात ज्याप्रमाणे सत्ताबदल झाला, तसा प्रकार महाराष्ट्रात शक्य नसल्याचं
चव्हाण यांनी सांगितलं. राज्य सरकार म्हणून महाविकास आघाडीतले तीनही पक्ष व्यवस्थित
काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधकांनी टीका करतानाच, राज्याच्या महत्त्वाच्या
प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये, असं चव्हाण यांनी नमूद केलं.
****
देशातले पाच टक्के लोक हे
कोरोना विषाणू संसर्गाच्या गंभीर स्थितीत आहेत. त्यामुळे इतर जनतेला वेठीस धरणे अयोग्य
असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. शासनाच्या अहवाला नुसार ८० टक्के लोकांमध्ये कोविड
प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. उर्वरित २० टक्क्यांपैकी १५ टक्के लोकांना लक्षणे
दिसू शकतात, तर पाच टक्के लोक हे गंभीर स्थितीत आहेत. त्यांच्यावर शासनानं लक्ष केंद्रीत
करावं असं ते यावेळी म्हणाले. टाळेबंदी अमान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य
हे त्यांच्या जगण्यातून आणि अनुभवातून आलेलं असून अण्णाभाऊंनी ग्रामसंस्कृती सोबतच
गावकुसाबाहेरच्या भटक्या, वंचित लोकाचं कष्टमय जगणं पहिल्यांदाच साहित्यात आणल्याचं
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉक्टर विजय चोरमारे यांनी म्हटलं आहे. अण्णाभाऊ साठे
यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात साहित्यरत्न
अण्णाभाऊ साठे आणि राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे आज ऑनलाईन व्याख्यान घेण्यात
आलं, डॉ संजय शिंदे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. केंद्राचे संचालक डॉ. डी एम
नेटके आणि डॉ कैलास अंभुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
****
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार
समिती जाधववाडी आणि उप बाजारपेठ करमाड इथल्या विविध विकासकामांचं आणि जाधववाडी इथं
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं लोकार्पण केंद्रीय अन्न नागरी पुरवठा
आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज झालं. छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं लोकार्पण करतांना, महापुरुषांचे पुतळे हे सर्वांना
प्रेरणा देण्याचं कार्य करत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
****
हिंगोली इथं रेल्वे विभागाच्या
मोकळ्या जागेत केंद्र सरकारच्या अन्नपुरवठा विभागाकडून ५० लाख मेट्रीक टन क्षमतेच्या
गोदाम बांधण्याला अन्न महामंडऴाची मान्यता मिळाली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी आज
हिंगोली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान
यांच्याकडे खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत मागणी केली होती. याबाबत गेल्या १८ जूनला
संबंधित विभागांसोबत बैठक झाली होती. या गोदामाचा हिंगोलीसह नांदेड, वाशिम, परभणी आणि
यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगीतलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या
मानवत तालुक्यातील ताड बोरगाव जवळ दोन मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात एकजण जागीच
ठार तर एकजण जखमी झाला आहे. जखमीला परभणी इथं जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात
आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
हिंगोली जिल्ह्यात टाळेबंदीमुळे बंद असलेल्या सर्व आस्थापना, प्रतिबंधित उद्योग या सर्वांना
एक ऑगस्टपासून सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अटी तसंच
नियमांच्या अधीन राहून कामकाज सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे. याशिवाय जिल्ह्यातील
क्रीडा मैदाने,
क्रीडा संकुले तसंच सार्वजनिक
खुले मैदाने वैयक्तिक व्यायामाकरिता चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
****
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा
नजरबंदीचा काळ तीन महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. गेल्या वर्षी पाच ऑगस्टला जम्मू काश्मीर
राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून
मुफ्ती यांच्यासह किमान शंभराहून अधिक नेत्यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात
आलं होतं.
//***********//
No comments:
Post a Comment