Thursday, 30 July 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.07.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जुलै २०२० सकाळी ७.१० मि.
****
·      शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मक सुधारणेला वाव देणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी.
·      दहा अधिक दोन ऐवजी आता पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असं चार टप्प्यात शालेय शिक्षण; पाचवीपर्यंत मातृभाषेतूनच शिक्षण देण्याची तरतूद.
·      राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत टाळेबंदी कायम, मात्र पाच ऑगस्टपासून मॉल्स आणि बाजार संकुलातली दुकानं सुरु करण्यास तसंच खुल्या मैदानातल्या खेळांनाही परवानगी, आंतर जिल्हा बस सेवेवर बंदी कायम.
·      रात्रीची संचारबंदी एक ऑगस्टपासून हटवली, मात्र शाळा, महाविद्यालयं, इतर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेस बंदच ठेवण्याचे केंद्र सरकारचे आदेश.
·      दहावीच्या परीक्षेत ९५ पूर्णांक ३० शतांश विद्यार्थी उत्तीर्ण.
·      ग्रामीण भागातल्या नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकार ५०० नविन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार.
·      राज्यात आणखी नऊ हजार २११ रुग्णांची नोंद, तर २९८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
आणि
·      औरंगाबादमध्ये सात, उस्मानाबाद आठ, नांदेड चार तर हिंगोली आणि जालन्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू; लातूरमध्ये १०२, बीड ५८, आणि परभणीत १३ नवे रुग्ण.
****
देशातल्या शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मक सुधारणेला वाव देणाऱ्या “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०”ला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. १९८६ नंतर प्रथमच शैक्षणिक धोरणात बदल करण्यात येत आहे.
२०३०पर्यंत शालेय शिक्षणात शंभर टक्के शिकण्याच्या वयातल्या मुला-मुलींची नाव नोंदणी करणं, तसेच अंगणवाडी ते माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याचा नव्या धोरणाचा उद्देश आहे. कोणावरही कोणतीही भाषा न लादता पाचवीपर्यंत मातृभाषेत शिक्षण देण्याची तरतूद या धोरणात आहे.
शालेय शिक्षणाचं स्वरुप आतापर्यंत दहा अधिक दोन असं होतं. आता त्यात बदल करण्यात आला असून या नवीन धोरणात पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार अशी नवीन पद्धत प्रस्तावित करण्यात आली आहे. मुलांचं शिक्षण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अंगणवाडी अथवा शालेय पूर्व शिक्षणापासून सुरू होईल, वयाच्या आठ वर्षापर्यंत म्हणजे दुसरीपर्यंत पहिला टप्पा राहील. त्यानंतर दुसरा टप्पा तिसरीपासून पाचवीपर्यंतचा असणार आहे. त्यानंतर सहावी ते आठवीपर्यंतचा तिसरा टप्पा तर नववीपासून बारावीपर्यंतचा चौथा टप्पा असेल. या धोरणात दहावी-बारावी बोर्डाचं महत्त्व कमी करण्यात आलं असून अर्धवार्षिक- सेमेस्टर पद्धतीने वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जाणार आहे.
शिक्षण व्यवस्थेत पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक शाळेसाठी अभ्यासक्रम ठरवला जाणार आहे. देशातील सर्व पूर्व प्राथमिक शाळांना हा अभ्यासक्रम लागू असेल. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - एनसीईआरटी हा अभ्यासक्रम ठरवणार आहे.
तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांना वाचता येईल यावर अधिक भर दिला जाणार आहे. संख्या आणि अक्षर ओळख हे यापुढे मुलभूत शिक्षण मानलं जाईल.
सहावीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम शिकता येणार आहे. यामध्ये सुतारकाम, इस्त्रीचं काम, हस्तकला अशा विषयांसाठी विद्यार्थ्यांना अधिवाशिता - इंटर्नशिप करता येईल.
तसंच नववी ते बारावीमध्ये शिक्षणासाठी कोणतीही एक शाखा नसेल तर विद्यार्थ्यांना विविध विषय निवडण्याची संधी असणार आहे.
विज्ञान, वाणिज्य, कला यासोबत संगीत, क्रीडा, लोककला हे अभ्यासाचे विषय म्हणून विद्यार्थ्यांना निवडता येणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं तिहेरी रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी स्वत:चं मूल्यांकन करणार. याशिवाय त्यांचे वर्गमित्र आणि शिक्षकही मूल्यांकन करतील. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला बारा वर्षाचं रिपोर्ट कार्ड दिले जाईल.
उच्च शिक्षणामध्ये मोठे बदल करण्यात आले असून २०३५पर्यंत एकूण नोंदणी प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. सध्या महाविद्यालयीन शिक्षणात कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तीन शाखा आहेत. नवीन धोरणात हे शिक्षण अधिक व्यापक, बहुशाखीय, परिवर्तनशील अभ्यासक्रमासह सर्वांगीण पदवीपूर्व शिक्षण, विषयांची रचनात्मक मिश्रण, एकात्मिक व्यावसायिक शिक्षण आणि योग्य प्रमाणीकरणासह एकापेक्षा अधिक अभ्यासक्रमाला प्रवेश आणि त्यातून बाहेर पडण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तीन ते चार वर्षाचं हे पदवीपूर्व शिक्षण असणार आहे.
देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचं उत्कृष्ट बहुशाखीय शिक्षणाचं उदाहरण निर्माण करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटी, भारतीय व्यवस्थापन संस्था-आयआयएम प्रमाणे बहुशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे.
स्थानिक भाषांमध्ये ई-कोर्सेस विकसित केले जाणार आहेत. व्हर्च्युअल लॅबदेखील तयार करण्यात येणार असून राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच निर्माण केला जाणार आहे.
देशात ४५ हजाराहून अधिक महाविद्यालय आहेत. त्यांना श्रेणी देण्यासाठी उच्च शिक्षण नियामक अशी एकच संस्था स्थापन करण्यात येईल.
देशातल्या प्रमुख आठ भाषांमध्ये ई-कोर्सेस विकसित केली जाणार असून “मास्टर ऑफ फिलासॉफी” ही पदवी कायमची बंद करण्यात येणार आहे. खासगी आणि सार्वजनिक उच्च शिक्षण संस्थांना समान नियम लागू असतील, कला, क्रीडा, संगीत, योग, समाज सेवा या विषयांना अभ्यासक्रमातच समाविष्ट करण्यात लं आहे.
****
राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत टाळेबंदी वाढवण्यात आली आहे. मात्र मिशन बिगिन अंतर्गत काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारनं काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या. पाच ऑगस्टपासून मॉल्स आणि बाजार संकुलातली दुकानं सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मॉल्स मधले सिनेमागृह बंद राहील तर हॉटेल्स, फुड कोर्टमधून फक्त पार्सल सेवा सुरू करता येईल. गोल्फ कोर्स, जिम्नॅस्टिक, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब यासारखे खुल्या मैदानातल्या खेळांना परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी समाजिक अंतर राखणं, मास्क वापरणं यासारखे सरकारनं लागू केलेल्या नियमांचं पालन करावं लागेल. जलतरण तलाव खुले करण्यास मात्र राज्य सरकारनं परवानगी दिलेली नाही. इतर बाबीतले निर्बंध सध्या आहेत तसेच कायम राहणार आहे. आंतर जिल्हा बंदी कायम असून, बससेवा, रेल्वे सेवा बंदच राहणार आहे. विवाहासाठी ५० जण आणि अंत्ययात्रेसाठी २० लोकांची मर्यादा कायम आहे. कुठल्याही कार्यक्रमाला अनावश्यक गर्दी होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असं सरकारनं सांगितलं आहे.
****
केंद्र सरकारनंही काल मार्गदर्शक सूचना जारी करून टाळेबंदी उठवण्याच्या तिसऱ्या टप्प्याची - अनलॉक थ्री ची घोषणा केली. एक ऑगस्टपासून हा तिसरा टप्पा सुरु होणार आहे.
अनलॉक थ्री मध्ये प्रतिबंधित क्षेत्रात- कंटेनमेंट झोनमधली टाळेबंदी ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र ठरवण्याचे आणि परिस्थितीनुसार नियमात बदल करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शाळा, महाविद्यालयं, इतर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेस ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहतील. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, देशांतर्गत रेल्वे वाहतूक बंदच राहणार आहे. मेट्रो रेल्वे, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, मनोरंजनात्मक, क्रीडा विषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सुरु करण्यासंदर्भात नंतर निर्णय घेतला जाणार आहे. देशभरात लागू असलेली रात्रीची संचारबंदी एक ऑगस्टपासून हटवण्यात आली आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, १० वर्षांच्या आतील बालकं, गर्भवती, गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना बाहेर न पडण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. याशिवाय सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेश आपापल्या राज्यातल्या परिस्थितीनुसार नियमांत बदल करु शकतील, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. सामाजिक अंतर पाळून, सर्व नियमांचं काटेकोर पालन करुन स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या आणि विशाल प्रकल्पांच्या सुधारित निकषास मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यानुसार आकांक्षित जिल्हे- गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद, हिंगोली यांच्यासाठी मोठ्या प्रकल्पातली गुंतवणूक ५० ते शंभर कोटी रुपये असेल तर १०० कोटी रूपयांपेक्षा अधिक अथवा २०० रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प असेल.
मराठवाडा, विदर्भ, धुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रकल्पातली गुंतवणूक ५० ते २०० कोटी रुपये असेल तर २०० कोटी रूपयांपेक्षा अधिक अथवा ३०० रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प असेल.
उर्वरित महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रकल्पातली गुंतवणूक आता ५० ते २५० कोटी रुपये असेल तर २५० कोटीपेक्षा अधिक अथवा ५०० रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प असेल.

आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क या प्रकल्पास मान्यता आणि आशियाई विकास बॅंकेसोबत करार करण्यास काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यामुळे फळे आणि भाजीपाला उत्पादनास मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळून शेतकऱ्यांना लाभ होईल. राज्यात पुढच्या पाच वर्षांपर्यंत फळे आणि भाजीपाल्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन तसंच विविध टप्प्यांमध्ये फळ भाजीपाल्यांचं होणारं नुकसान लक्षात घेता या मॅग्नेट नेटवर्कमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव ही नैसर्गिक आपत्ती गृहीत धरून शासकीय कंत्राटदारांच्या अडचणींवर उपाय करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यामुळे शासनाची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत सोसाव्या लागत असलेल्या अडचणींसंदर्भात उपाययोजना आणि सहाय्य करण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
राज्यात दहावीचा निकाल ९५ पूर्णांक ३० शतांश टक्के लागला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काल पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यामध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८ पूर्णांक ७७ शतांश टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ९२ टक्के लागला आहे. मराठवाड्यात लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९३ पूर्णांक शून्य नऊ शतांश टक्के लागला आहे. विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९६ पूर्णांक ५१ शतांश टक्के लागला असून उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ९४ पूर्णांक २५ शतांश टक्के, नांदेड जिल्ह्याचा निकाल ८९ पूर्णांक ५३ शतांश टक्के लागला आहे.
औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९४ पूर्णांक शून्य चार शतांश टक्के इतका लागला आहे. औरंगाबाद ९२ पूर्णांक १० शतांश टक्के तर परभणी जिल्ह्याचा निकाल ८८ पूर्णांक ४८ शतांश टक्के लागला आहे.
गुण पडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याचं, शिक्षण मंडळातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
राज्यात ग्रामीण भागातल्या नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासकीय रुग्णालयं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नविन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नविन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं. या नविन रुग्णवाहिका २५३ प्राथमिक आरोग्य केंद्रं, १३७ ग्रामीण रुग्णालयं, १०६ जिल्हा आणि उप जिल्हा तसंच स्त्री रुग्णालयं आणि चार प्रादेशिक मनोरुग्णालयांना देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं चार लाखांचा टप्पा पार केला आहे. काल आणखी नऊ हजार २११ रुग्णांची नोंद झाल्यानं राज्यातली एकूण रुग्णसंख्या चार लाख ६५१ झाली आहे. काल २९८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १४ हजार ४६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल सात हजार ४७८ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत दोन लाख ३९ हजार ७५५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यभरात आतापर्यंत २० लाख १६ हजार २३४ चाचण्या करण्यात आल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हडको मधल्या ७१ वर्षीय, कैसर कॉलनीतल्या ५९ वर्षीय, रोशनगेट इथल्या ७० वर्षीयम फाजलपुऱ्यातल्या ४६ वर्षीय, आणि सिल्लोड तालुक्यातल्या ५८ वर्षीय पुरुष रुग्णांसह, गवळीपुऱ्यातल्या ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ४६४ जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव इथल्या ५० वर्षीय महिलेचाही औरंगाबाद इथं घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी १९७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १३ हजार ५६६ झाली आहे. तर काल ३४२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार ६८० रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये सहा रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातले असून, उमरगा आणि कळंब तालुक्यातला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यात या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या ४८ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी १३० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातले ६३, उमरगा ४७, वाशी सात, तुळजापूर आणि कळंब तालुक्यात प्रत्येकी पाच, तर परंडा तालुक्यातले तीन रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ८५९ झाली आहे. त्यापैकी ४८२ रुग्ण बरे झाले असून, सध्या ३२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
****
नांदेड जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नांदेड शहरातले दोन, तर किनवट आणि तामसा इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ७४ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात काल आणखी ४० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार ५६८ झाली आहे. तर काल २० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७९० रुग्ण बरे झाले असून, सध्या ६९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली शहरातल्या ५० वर्षीय पुरुष रुग्णाचा काल कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये हिंगोली शहरातले सहा, तर कळमनुरी आणि वसमत शहरातला प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ५९३ झाली आहे. तर काल ३६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ४२१ रुग्ण बरे झाले असून, सध्या १६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी ४१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ९७ झाली आहे. अँटीजेन चाचण्यांमध्ये बाधित आढळून आलेल्या एका रुग्णाचा यात समावेश आहे.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथल्या ५० वर्षीय पुरुषाचा काल जालना इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गाने झालेल्या एकूण मृतांची संख्या आता ६५ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ३३ रुग्णांना काल सुटी देण्यात आली. जिल्ह्यातले एक हजार ३६० रुग्ण आतापर्यंत या आजारातून बरे झाले असून, बाधित ६१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी १०२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये ३५ जण अँटिजेन चाचणीत बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या एक हजार ८९१ झाली आहे. त्यापैकी एक हजार १२३ रुग्ण बरे झाले असून, सध्या ५०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, लातूर इथं काल सकाळी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या नातेवाईकानं एका डॉक्टरवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टर गंभीररीत्या जखमी झाले. शहरातल्या अल्फा रुग्णालयात हा प्रकार घडला असून सध्या या डॉक्टरांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, लातूर इथल्या सर्व डॉक्टरांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. दोषींवर तातडीनं कारवाईची मागणी डॉक्टरांनी केली आहे.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी ५८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड शहरातले ३०, परळी १३, आष्टी सात, अंबाजोगाई पाच, गेवराई दोन तर पाटोद्यातला एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ६९७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ३५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, गेवराई शहरात आठ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल आणखी १३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये पूर्णा शहरातले सात, परभणी शहरातले चार, गंगाखेड आणि परभणी तालुक्यातला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ५७५ झाली आहे. तर काल सहा रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत २६९ रुग्ण बरे झाले असून, सध्या २८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.     
जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरासह लगतच्या तीन किलोमीटर परिसरातल्या संचारबंदीत येत्या ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत. कोरोना विषाणू बाधित व्यक्तींच्या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्तीदेखील कोरोना विषाणू बाधित आढळून येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या संचारबंदी दरम्यान, अत्यावश्यक सेवा, सुरू राहणार आहेत.
****
मुंबईत काल एक हजार ११८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ६० जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात दोन हजार ६१३ नवे रुग्ण आणि ६६ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात काल ५७० रुग्ण आढळले, तर १२ जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एक हजार ५३९, रायगड ३९८, जळगाव ३४२, अहमदनगर २६१, सांगली १६७, सातारा १४१, धुळे १३३, तर वाशिम जिल्ह्यात काल आणखी २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. 
****
जालना शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर न पाळणाऱ्या, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर काल महसूल, पोलीस आणि नगरपालिकेच्या पथकानं दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेत एक हजार ९६९ व्यक्तींकडून चार लाख ३९ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
****
उस्मानाबाद इथं काल जिल्हा उद्योग केंद्राचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय कोलते आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद च्या माध्यमातून ग्रामीण भागात महिला बचत गटाच्या महिलांनी उभारलेल्या विविध उद्योगांना यामुळे पाठबळ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -
उमेद अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला स्वयं सहाय्यता समुहाच्या वतीनं सुरू असलेल्या अकृषी उद्योगांना चालना देणं, उद्योगांचा विकास आराखडा तयार करणं, या उद्योगांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचं पॅकिंग, ब्रँडिंग, मार्केटींग, बँकांशी समन्वय ठेवून पतपुरवठा करणं या सुविधा या केंद्रामार्फत पुरवल्या जाणार आहेत. उद्योग व्यवसाय वाढीसाठी स्वतंत्र तज्ञांचं वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. त्यातून उद्योजकांना उद्योजक आराखडे तयार करून देणं, त्यानुसार बँकांचा वित्तीय पतपुरवठा भांडवल उभारणं यासह सर्व मार्गदर्शन आणि पाठबळ देण्याचे कार्य केलं जाणार आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
लातूर महापालिका क्षेत्रात कोविड नियंत्रणासाठी धारावी पद्धत वापरण्याची सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. काल या संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महापालिकेनं प्रत्येक प्रभागात कोविड नमुना संकलन केंद्र उभारावं, एक हजार रुग्णखाटांची व्यवस्था करावी, आदी सूचना त्यांनी यावेळी केल्या.
****

No comments: