Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात
कोविड बाधितांची संख्या साडे १५ लाखांवर पोहोचली आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासात
देशभरात तब्बल ५२ हजार १२३ नवे रुग्णं आढऴले आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ
आहे. त्यामुळे आता देशातली कोविड बाधितांची संख्या १५ लाख ८३ हजार ७९२ झाली आहे.
यापैकी १० लाखांवर रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले असून, सध्या देशात ५ लाख
२८ हजार २४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ६४ पूर्णांक ४४
शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ३४ हजार ९६८ रुग्णांचा या संसर्गाने
मृत्यू झाला आहे. मृतांचं हे प्रमाण दोन पूर्णांक २३ शतांश टक्के असल्याचं आरोग्य
मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान,
कालपर्यंत देशभरात एक कोटी ७७ लाख ४३ हजार ७४० कोविड नमुन्यांची तपासणी करण्यात
आल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद- आय सी एम आरनं दिली आहे. सध्या
एक हजार ३१६ प्रयोगशाळांमधून कोविड संसर्ग चाचण्या केल्या जात आहेत. यापैकी ९०६
सरकारी प्रयोगशाळा तर ४१० खासगी प्रयोगशाळा आहेत.
****
परभणी
जिल्ह्यात गंगाखेड इथल्या जैदिपुरा भागातल्या ३२ वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा
परभणी इथं एका खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोविड
१९ मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता २८ झाली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज सकाळी ९६ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यात
महानगरपालिका हद्दीतल्या २३ आणि ग्रामीण भागातल्या ७३ रूग्णांचा समावेश आहे. सध्या
जिल्ह्यात तीन हजार ५१८ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णांची एकूण संख्या तेरा
हजार सहाशे बासष्ट झाली आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित २२२ रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना
रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ९४३ रुग्ण कोरोना
विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
अमरावती
जिल्ह्यातल्या वऱ्हाकुऱ्हा इथल्या एका ५५ वर्षीय कोविड बाधित पुरुष व्यक्तीचा
अमरावती इथं एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा शल्यचिकित्सक
कार्यालयानं ही माहिती दिली. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या कोरोना विषाणू बाधितांची
संख्या आता ५४ वर पोहोचली आहे.
****
सातारा
जिल्ह्यात काल रात्री आणखी १३५ रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर एका
बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद
गडीकर यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळ
जिल्हातल्या राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली इथं कुलरचा शॉक लागून तीन बहिणींचा
मृत्यू झाला. आज सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रिया गजानन भूसेवार, संचिता
गजानन भूसेवार आणि मोनिता गजानन भुसेवार अशी या मुलींची नावं आहेत. तिघी अनुक्रमे
आठ, सहा आणि चार वर्ष वयाच्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जळगाव
जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यात दोन महिला नदीच्या पुरात वाहून गेल्या. या दोघी
महिला अंदाजे ६५ वर्ष आणि ३५ वर्ष वयाच्या असून दोघी सासू सुना असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. वाळू चाळून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिला नदीपात्रात काम करत
असताना, वाघूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यानं, हा
प्रकार घडला. या दोघींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
दरम्यान,
जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १७ पूर्णांक
७४ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या
पावसामुळे धरणाचे चोवीस दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून धरणातून आज सुमारे ५३ हजार
घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात गेल्या २४ तासात १७ महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली असून कंधार
तालुक्यातल्या कुरूळा महसूल मंडळात सर्वाधिक ५० मिलीमीटर तर मुखेड तालुक्यातल्या
मुक्रमाबाद महसूल मंडळात ४८ मिलीमीटर पाऊस झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
बचतगटातील
महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी रुरल मार्टच्या माध्यमातून
महिला सक्षमीकरणाला आणखी चालना मिळण्यास मदत झाली असल्याचं महिला आणि बाल विकास
मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक
नाबार्डच्या सहाय्याने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्या वतीनं
सुरू करण्यात आलेल्या रुरल मार्टचं उदघाटन करतांना त्या बोलत होत्या.
****
No comments:
Post a Comment