Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात
कोविड बाधितांची संख्या १६ लाखांवर पोहोचली आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासात
देशभरात तब्बल ५५ हजार ७८ नवे रुग्णं आढऴले आहेत. ही आता पर्यतची सर्वाधिक वाढ
आहे. त्यामुळे आता देशातली कोविड बाधितांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७० झाली आहे.
यापैकी १० लाख ५७ हजार रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले असून, सध्या देशात ५
लाख ४५ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ६४ पूर्णांक ५४
शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ३५ हजार ७४७ रुग्णांचा या संसर्गाने
मृत्यू झाला आहे. मृतांचं हे प्रमाण दोन पूर्णांक १८ शतांश टक्के झाल्याचं आरोग्य
मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान,
देशात एक हजार ३३१ प्रयोगशाळांच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी ८८ लाख
नमुन्यांची कोविड संसर्ग चाचणी करण्यात आली आहे.
****
पुणे
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले ३ हजार ६५८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे
पुणे जिल्ह्यात या रुग्णांची संख्या ८१ हजार ७७१ झाली आहे. यापैकी २ हजार ४०२
रुग्ण महापालिका क्षेत्रातले आहेत. या आजारानं काल जिल्ह्यात ६४ रुग्णांचा मृत्यू
झाला, त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गाने दगावलेल्यांची संख्या १ हजार ९२२ झाली आहे.
पिंपरी चिंचवड परिसरात काल दिवसभरात ८९३ नवे कोविड बाधित आढळले, त्यामुळे पिंपरी
चिंचवड इथली रुग्णसंख्या २० हजार ६८६ वर पोहोचली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज सकाळी ४८ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यात महानगरपालिका
हद्दीतल्या ३२ आणि ग्रामीण भागातल्या १६ रूग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात
तीन हजार ४६० रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णांची एकूण संख्या तेरा हजार ८९० झाली
आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित ४११ रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना
रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ३६० रुग्ण कोरोना
विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
परभणी
शहरात दर्गा रोड परिसरातल्या ६० वर्षीय कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा आज
उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातील
सेवानिवृत्त कर्मचारी असणाऱ्या या व्यक्तीला १७ जुलैला उपचारांसाठी दाखल केलं
होतं.
****
अमरावती
जिल्ह्यात आज कोविड-19 चे नवे १३ रुग्ण आढळले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून
ही माहिती देण्यात आली. जिल्ह्यात एकूण कोविड बाधितांची संख्या आता २ हजार ७८ झाली
आहे.
****
महाविकास
आघाडीत मतभेद असले तरी तिघांत चांगला समन्वय असून, चांगलं काम व्हावं हीच आमची
भावना आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाऴासाहेब थोरात यांनी
म्हटलं आहे. ते आज एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. समान
किमान कार्यक्रमावर आमचा भर असून कोणताही निर्णय आम्ही एकमतानं घेतो, असं ही थोरात
म्हणाले. टाळेबंदीमुळे महसूल कमी झाला असून वस्तू आणि सेवा कराच्या कमतरतेमुळे
अर्थ खात्याला अडचणी असल्याचंही थोरात यांनी सांगितलं.
****
कोरोना
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या टाळेबंदीच्या काळात अनेक उद्योग,
व्यवसाय ठप्प झाले. मात्र मिशन बिगेन अगेन मध्ये अनेक उद्योगधंद्यांना परवानगी
दिल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. ते आज एका खासगी
वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. महापरवाना योजने अंतर्गत ४८ तासांत
उद्योगांना परवानगी देण्यात येत असल्याचंही उद्योग मंत्र्यांनी नमूद केलं.
****
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, असं विधानसभेचे विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या
मुलाखतीत ते बोलत होते. उद्धव ठाकरे प्रथमच मुख्यमंत्री झाले असले तरीही आता बराच
काळ झाला आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांच्या समन्वयातून निर्णयक्षमतेचा वापर व्हायला
हवा, असं मतंही फडणवीस यांनी व्यक्त केलं. तीन चाकांच्या सरकारला अपेक्षित गती
साधता येत नसल्याचं सांगतानाच, मुख्यमंत्री – मंत्री आणि प्रशासन यांच्यात
समन्वयाचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली.
****
उस्मानाबाद
शहरातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता
जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद शहरात उद्या एक ऑगस्टपासून दुचाकी वाहनांना प्रतिबंध
केला आहे. या आदेशानुसार फक्त शासकीय अधिकारी - कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतल्या
व्यक्तींनाच या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
****
जम्मू
काश्मीरमध्ये शहरं, गावं तसंच खेड्यांमध्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीस
सेवा सुविधा पोहोचाव्यात यासाठी अनेक ठोस पावलं उचलली जात आहेत. याच अनुषंगाने
सरकारी कार्यालयातले पाच हजार अधिकारी आणि कर्मचारी गावागावात थेट जनतेशी संपर्क
साधून विकासासंदर्भातल्या अडचणींचं निराकरण करत आहेत. या राज्यात राबवला जाणारा
अशाप्रकारचा हा पहिलंच अभियान आहे.
****
No comments:
Post a Comment