Wednesday, 29 July 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.07.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 July 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जुलै २०२० सकाळी ७.१० मि.
****
·      येत्या सात सप्टेंबरपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन.
·     राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार.
·      राज्यात आणखी सात हजार ७१७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, २८२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      औरंगाबाद जिल्ह्यात नऊ, नांदेडमध्ये दहा, बीड दोन तर जालना, लातूर, उस्मानाबाद आणि परभणीमध्ये प्रत्येकी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू, हिंगोलीत १० नवे रुग्ण.
·      राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्याचं कापलेलं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
आणि
·      हिंदी चित्रपट सृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री कुमकुम आणि प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री ललिता केंकरे यांचं निधन.
****
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सात सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. काल मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. हे अधिवेशन येत्या तीन ऑगस्टला सुरु होणार होतं, मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ते पुढं ढकललं आहे.
मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत हे अधिवेशन घ्यावं असा प्रस्ताव सरकारनं मांडला होता, मात्र असं करणं, हा त्या आमदारांना संविधानानं दिलेला हक्क हिरावण्यासारखं असल्यानं आम्ही तो नाकारला, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. 
दरम्यान, मराठा आरक्षण मुद्यावर दोन दिवसाचं विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी या बैठकीत केली.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ट्वीटरवर ही माहिती दिली. विद्यार्थी आपला निकाल डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एनआयसी डॉट कॉम किंवा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर पाहू शकतात.
****
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारनं मांडलेल्या भूमिकेबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत सामाजिक आरोग्य तसंच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग वगळून इतर कोणत्याही विभागात, मराठा समाजासाठीच्या १२ टक्के आरक्षणाची तरतूदीचा अवलंब करून भरती करणार नाही, असं आश्वासन नुकतंच राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिलं होतं. यावर फडणवीस यांनी आपल्याला आश्चर्य आणि दुःख वाटल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र सरकारनं दिलेलं आश्वासन हे याआधीच चार मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार होतं असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांनीही ते मुख्यमंत्री असताना डिसेंबर २०१८ मधे न्यायालयाला असंच आश्वासन दिलं होतं असंही चव्हाण यांनी नमूद केलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत वकीलांना शासकीय अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळणं महत्वाचं असल्यानं मुख्यमंत्र्यानी यात तातडीनं लक्ष द्यावं अशी विनंती विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांमार्फत योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचं सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. गेल्या सात महिन्यांपासून राज्य मागासवर्ग आयोग अस्तित्त्वात नाही आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीनं योग्य सहकार्य नसल्याचीही बाब गंभीर असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.
****
कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतले घटक म्हणून करण्याचे आणि कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचं विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिले. यासंदर्भातला सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ‘महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम, १९६९’ नुसार राज्यात ३६ माथाडी मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या नोंदणीकृत माथाडी मंडळातल्या कामगारांना हा निर्णय लागू होणार असून, केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या रेल्वेच्या माथाडी कामगारांना हा निर्णय लागू नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
जगातल्या एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात असून, वाघांच्या संख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असल्याचं, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्लीत जावडेकर यांच्या हस्ते अखिल भारतीय वाघ अनुमान अहवाल प्रकाशित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. १९७३ मध्ये देशात फक्त ९ व्याघ्र अभयारण्यं होती, आता ती संख्या ५० झाली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार करत असलेली खाजगी रुग्णालयं, पीपीई किट आणि इतर वैद्यकीय साधनांपोटी रुग्णांना जास्तीचे दर आकारून त्यांची आर्थिक लूट करणार नाहीत, याची सुनिश्चिती करण्यासाठी, सरकारनं नियमन करणारी यंत्रणा उभारली आहे की नाही याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडे विचारणा केली आहे. पीपीई किट आणि इतर वैद्यकीय साधनांसाठी खाजगी रुग्णालयं जास्तीचे दर आकारत असल्याविरोधात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली. वैद्यकीय कर्मचारी पीपीई किट किंवा मास्क यासारखी साधनं प्रत्येक रुग्णासाठी बदलत नाहीत, त्यामुळे जर त्यापोटी प्रत्येक रुग्णाला शुल्क आकारलं जात असेल, तर त्यातून खाजगी रुग्णालयं अवाजवी नफा मिळवत असतील, असं निरीक्षणही मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या पीठानं नोंदवलं. या संदर्भात सरकारनं आणि याचिकेत नमूद केलेल्या रुग्णालयांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या याचिकेवरची पुढची सुनावणी सात ऑगस्टला होणार आहे.
****
राज्यात काल आणखी सात हजार ७१७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या तीन लाख ९१ हजार ४४० इतकी झाली आहे. काल २८२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४ हजार १६५ झाली आहे. तर काल दहा हजार ३३३ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत दोन लाख ३२ हजार २७७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या राज्यात एक लाख ४४ हजार ६९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यभरात आतापर्यंत १९ लाख ६८ हजार ५५९ चाचण्या करण्यात आल्या.  
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये खोकडपुऱ्यातल्या ५८ वर्षीय आणि ४६ वर्षीय, अहिल्याबाई पुतळा परिसरातल्या ७० वर्षीय, रोजाबागमधल्या ६१ वर्षीय, आंबेडकर नगरमधल्या ३१ वर्षीय, कन्नड इथल्या ६० वर्षीय, राम नगरमधल्या ६८ वर्षीय पुरुष रुग्णांसह, रोजाबाग इथल्या ६५ वर्षीय आणि विद्यानगरमधल्या ३५ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ४५८ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ११७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १३ हजार ३६९ झाली आहे. तर काल ३८५ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार ३३८ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन हजार ५७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. औरंगाबाद शहरात काल विविध ठिकाणी करण्यात आलेल्या तीन हजार १२३ अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्यांमधून ४१ जण बाधित आढळले.
****
नांदेड जिल्ह्यात काल दहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नांदेड शहरातले पाच, तर मुदखेड, किनवट, बिलोली तालुक्यातल्या कासराळी, भोकर तालुक्यातल्या रिठा आणि देगलूर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं ७० जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल १३४ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या रुग्णांमध्ये हा उच्चांक आहे. यामध्ये नांदेड शहरातले ४६, मुखेड तालुक्यातले २२, बिलोली दहा, धर्माबाद आणि नायगाव प्रत्येकी सात, कंधार चार, हदगाव तीन, भोकर आणि परभणी इथले प्रत्येकी दोन, तर किनवट, जालना, हिंगोली, लोहा, नांदेड तालुका, बेटसावंगी आणि पुसद इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या एक हजार ५२८ झाली आहे. तर काल ३० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ७७० रुग्ण बरे झाले असून, सध्या ६७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर आणखी ३७ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये बीड शहरातले २१, अंबाजोगाई आठ, परळी पाच, गेवराई दोन तर आष्टीतला एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ६५२ झाली आहे. 
दरम्यान, बीड जिल्ह्यात बाधित रुग्णाला कोविड-19 कक्षाची माहिती मिळण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
****
जालना शहरातल्या कन्हैयानगर भागातल्या ६४ वर्षीय पुरुषाचा काल कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात आणखी ७४ रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ५४ झाली आहे. जालना शहरात काल करण्यात आलेल्या अँटिजेन चाचणीमधून आठ जण बाधित आढळले. तर काल ६५ जणांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. जालना जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ३२७ रुग्ण बरे झाले असून, सध्या ५८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
लातूर शहरातल्या ३२ वर्षीय महिलेचा काल कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या ८३ झाली आहे. 
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ८१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यापैकी ४० जण हे अँटिजेन चाचणीतून बाधित आढळले. यातले ७८ रुग्ण हे पूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कातले आहेत, तर तीन जण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार ७८६ झाली आहे. त्यापैकी एक हजार ७३ रुग्ण बरे झाले असून, सध्या ४८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं ४० जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी ६६ रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद तालुक्यातले १८, उमरगा तालुक्यातले २३, तुळजापूर नऊ, कळंब सात, वाशी सहा, परंडा दोन, तर लोहारा तालुक्यातल्या एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता ७२९ झाली आहे. त्यापैकी ४६५ रुग्ण बरे झाले असून, सध्या २२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ८८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा काल मृत्यू झाला. जिल्ह्यात या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता २५ झाली आहे.
जिल्ह्यात काल आणखी ३० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये परभणी शहरातले बारा, तर ग्रामीण भागातले १८ रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ५६२ झाली आहे. तर काल ११ रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत २६३ रुग्ण बरे झाले असून, सध्या २७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
दरम्यान, परभणी जिल्हा रुग्णालयात कोरोना कामकाजात अनियमितता वाढत असल्यानं जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी याप्रकरणी या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी बी एच बिबे याची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
परभणी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातले व्यापारी, दुकानदार, भाजी, फळ विक्रेते यांची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. काल ही तपासणी सुरु झाली. सहा पथकांच्या मार्फत ही तपासणी करण्यात येत आहे.
पूर्णा शहरातही दुकानदार, व्यापाऱ्यांची आज आणि उद्या अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल दहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये हिंगोलीतले नऊ तर वसमत इथला एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ५८५ झाली आहे. तर काल १३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ३८५ रुग्ण बरे झाले असून, सध्या १९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईत काल आणखी ७१७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५५ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल दोन हजार ६१८ नवे रुग्ण, आणि ५५ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात काल १६९ रुग्ण आढळले, तर पाच जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात २३३, सोलापूर २२६, जळगाव २०५, सातारा १८६, सांगली १३९, अहमदनगर १६१, बुलडाणा ९६, रत्नागिरी ४३, गडचिरोली ३८, तर वाशिम जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. 
****
पुण्यातल्या लोकमान्य टिळक समारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ञ आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांना दिला जाणार आहे. एक लाख रुपये; आणि स्मृतीचिन्ह तसंच सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्याचं कापण्यात आलेलं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. त्यानुसार चालू महिन्याचं वेतन बिल कोषागाराकडून मंजूर करुन घ्यावं, त्यानंतर मार्च महिन्याच्या उर्वरित वेतनाचं बिल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना उर्वरित ६० टक्के, अ आणि ब गटातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना ५० टक्के तर क गटातल्या कर्मचाऱ्यांना उर्वरित २५ टक्के वेतन मिळणार आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलेली वाढीव वीज देयकं ही तफावत नसून लूट असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालून वीज देयकांत तात्काळ सूट द्यावी असं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा दहीहंडी उत्सव साजरा करणार नसल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
केंद्रीय पथकाच्या शिफारसीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात “सेरो सर्वेक्षण” करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेला प्रादुर्भाव लक्षात यावा आणि त्या दृष्टीने उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत व्हावी यासाठी या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी तसंच महानगरपालिका प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी केलं आहे.
****
हिंदी चित्रपट सृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री कुमकुम यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या ८६ वर्षांच्या होत्या. झेबुन्निसा असं मूळ नाव असलेल्या कुमकुम यांनी मदर इंडिया, कोहिनूर, उजाला, नया दौर, प्यासा, आरपार अशा सुमारे शंभराहून अधिक चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्यावर चित्रीत झालेल्या मधुबन में राधिका नाचे रे, कभी आर कभी पार, ये है बॉम्बे मेरी जान, आदी गाण्यांतून त्या अधिक प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या पार्थिव देहावर मुंबईत माझगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री ललिता केंकरे यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ८५ वर्षांच्या होत्या. ललिता केंकरे यांनी बहीण सुधा करमरकर यांच्यासोबत साहित्य संघ आणि ललित कलादर्शच्या अनेक नाटकांमध्ये काम केलं. सई परांजपे यांच्या ‘कथा’ या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.
****
हैदराबाद संस्थानचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान यांची कन्या साहेबजादी बशीरुन्नीसा बेगम यांचं काल हैदराबादमध्ये निधन झालं, त्या ९३ वर्षांच्या होत्या. निजाम यांच्या सात अपत्यापैकी जिवंत असलेल्या त्या शेवटचं अपत्य होत्या. त्यांना नैसर्गिक मृत्यू आल्याचं निजामचा नातू नवाब नजफ अली खान यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या चिखली इथं काल तीन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही मुलं नदीत पोहण्यासाठी गेली होती. मृतांपैकी दोघे १४ वर्षांचे तर एक मुलगा ११ वर्षांचा मुलगा आहे.
****
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. मात्र, गर्भात असतानाच कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. देशातली ही अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचा दावा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी केला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी -
पुण्यातील हडपसर परिसरात राहणारी एक २२ वर्षीय गर्भवती महिला प्रसुतीच्या एक दिवस अगोदर ताप आल्यानं ससून रुग्णालयात दाखल झाली होती. महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तिला कोरोना संसर्ग झाल्याचं निदान झालं होतं. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या नाकातील स्वॅब त्याचबरोबर नाळ आणि नाभीच्या तपासणीनंतर बाळाला गर्भातच कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. बाळाला २४ ते ४८ तासांच्या आतच लक्षणं दिसून आली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. हे सगळं खूप आव्हानात्मक होतं असं बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आरती केणेकर यांनी सांगितलं. तीन आठवड्यानंतर बाळ पूर्णपणे बरं झालं असून आई आणि बाळाला घरी सोडण्यात आलं आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी, भूषण राजगुरू, पुणे.
****
नांदेड शहरात काल जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित ईतवारा पोलीस स्टेशन परिसरात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या हस्ते ४५० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे उपस्थित होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लावणं, त्यांच संवर्धन करणं महत्त्वाचं असल्याचं इटनकर यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्हा परिषदेच्या नविन वास्तूच्या प्रांगणात लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तीन जून २०१५ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवण्यासंदर्भात ठराव मंजूर झाला होता, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनानं घरनिहाय तपासणी मोहीम सुरू केली आहे. नांदेड महानगरासाठी १५ प्रभागांची निर्मिती करुन सुमारे ४६० अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक प्रभागाला समन्वयासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी महानगरपालिका तसंच महसूल यंत्रणा विशेष लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं काल नगरपरिषदेच्या पथकानं मास्क न लावणाऱ्या, तसंच एकमेकांत अंतर न राखणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. यावेळी चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
****
हिंगोली जिल्ह्यातलं इसापूर धरण पन्नास टक्के भरलं आहे. सध्या धरणात ४८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत नगरपरिषदेनं शहरातल्या फेरीवाल्यांचं बायोमेट्रीक पद्धतीने सर्वेक्षण करण्यास कालपासून सुरुवात केली. या सर्वेक्षणाच्या आधारे फेरीवाल्यांना ओळखपत्र, विक्री प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
****
दोन दिवसांच्या खंडानंतर नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४३ पूर्णांक ५० टक्के इतका पाऊस झाला आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यातही रात्रभर पाऊस सुरु होता. जिंतूर तालुक्यात काही वेळ जोरदार पाऊस झाला.
वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, मानोरा, मालेगांव आणि वाशीम तालुक्यात काही ठिकाणी रात्री उशिरा पाऊस पडला.
****

No comments: