Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
बहुचर्चित राफेल लढाऊ विमानं
परवा बुधवारी २९ जुलै रोजी भारतात दाखल होणार आहेत. पाच राफेल विमानांची पहिली खेप
परवा हरयाणातल्या अंबाला इथं पोहोचेल. भारतानं फ्रान्सकडून खरेदी केलेली ही विमानं
भेदक मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत.
****
केंद्रातील भाजप सरकार सत्ता
आणि पैशाचा गैरवापर करत विविध राज्यातली विरोधी पक्षांची सरकारं पाडण्याचा प्रयत्न
करत असल्याचा आरोप करत, काँग्रेस पक्षानं आज देशव्यापी आंदोलन छेडलं आहे. मुंबईत राजभवनाच्या
प्रवेशद्वाराबाहेर निदर्शनांसह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री
अशोक चव्हाण, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनात
सहभाग नोंदवला. राजस्थानातल्या सत्ता संघर्षाच्या पाठीमागे भाजपचं षडयंत्र असल्याचा
आरोपही काँग्रेसने केला आहे.
****
देशभरात कोविड संसर्गातून बरे
झालेल्यांची संख्या ९ लाखावर पोहोचली आहे. त्यामुळे या संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांचं
प्रमाण ६३ पूर्णांक ९२ शतांश टक्के एवढं झालं असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून
सांगण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत या आजाराने बाधितांची संख्या १४ लाख ३५ हजार ८५३
झाली असून सध्या देशात ४ लाख ८५ हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३२
हजार ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचं हे प्रमाण दोन पूर्णांक २८ शतांश टक्के
असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, देशात सध्या एक हजार
३१० प्रयोगशाळांमधून कोविड संसर्ग चाचण्या केल्या जात आहेत. यापैकी ९०६ सरकारी प्रयोगशाळा
तर ३७८ खासगी प्रयोगशाळा आहेत. आतापर्यत देशभरात एक कोटी ६८ लाख ६ हजार ८०३ कोविड नमुन्यांची
तपासणी करण्यात आल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद- आय सी एम आरनं दिली
आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
६६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातली बाधितांची एकूण संख्या
१३ हजार १०४ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतले २३ तर ग्रामीण भागातल्या
४३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ५३६ रुग्ण बरे झाले असून, ४४३
रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना
विषाणू बाधित ३४० रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २८५ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले
आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर
मंदिरांसह जिल्ह्यातली अनेक शिवमंदिरं आज श्रावणी सोमवारीही बंद आहेत. श्रावण महिन्यात
त्र्यंबकेश्वर इथं दरवर्षी होणारी ब्रह्मगिरीची महाप्रदक्षिणा यंदा रद्द करण्यात आली
आहे.
****
जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात
दाचू गावांतला दहशतवाद्यांचा अड्डा सुरक्षा दलांनी शोधून काढला आहे. या ठिकाणाहून हातगोळे,
काडतुसं, १ एके ४७ रायफल, १ रेडियो तसंच काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.
****
केंद्रीय राखीव पोलिस दल -
सीआरपीएफच्या ८२व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीआरपीएफचे पोलिस आणि त्यांच्या
कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सैनिकांचं शौर्य आणि कामातील अचूकतेचं कौतुक
असून, हे पोलीस पुढेही अधिक चांगली कामगिरी करतील असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात
म्हटलं आहे. हे सैनिक म्हणजे शौर्य, धैर्य आणि बलिदानाची प्रेरणा असून त्यांनी नेहमीच
अभिमानास्पद कार्य केलं, कोविड प्रार्दूभावाच्या काळातही या सैनिकांनी देशाची अतुलनीय
सेवा केली असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे.
****
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ
एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या
नायडू यांनी कलाम यांना एका ट्विट संदेशातून अभिवादन केलं आहे. कलाम यांनी आपल्या भाषणातून
तसंच कार्यातून सर्व देशवासियांना विशेषत: तरुणांना प्रेरित केलं, राष्ट्र उभारणीच्या
कार्यात दिलेल्या योगदानासाठी कलाम यांचं नेहमी स्मरण केलं जाईल, असं नायडू यांनी म्हटलं
आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांनी कलाम यांना अभिवादन करताना, कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचा विज्ञानापासून राजकारणापर्यंत
सर्वच क्षेत्रावर प्रभाव पडला असल्याचं, म्हटलं आहे.
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश
जावडेकर यांनीही कलाम यांना आदरांजली अर्पण केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस राज्य
आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल, असं पंतप्रधानांनी आपल्या
शुभेच्छा संदेशात म्हटल्याचं, मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment